“ड्रग्ज घेतात राहुल गांधी, त्यांची चाचणी..”; असं का म्हणाल्या कंगना राणौत?
राहुल गांधी यांच्या 'चक्रव्यूह' आणि 'शिवजी की बारात' या वक्तव्यांवरून आता अभिनेत्री आणि खासदार कंगना राणौत यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. राहुल गांधी यांची ड्रग्जची चाचणी झाली पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली आहे.
महाभारतात रचलेल्या ‘चक्रव्यूहा’ची तुलना करून लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी सोमवारी केंद्र सरकारवर हल्लाबोल केला. त्यावर आता अभिनेत्री आणि खासदार कंगना राणौत यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. “मला तर असं वाटतं की त्यांची टेस्ट झाली पाहिजे की ते कोणतं ड्रग्ज वगैरे घेतात का”, असं त्यांनी म्हटलंय. अर्थसंकल्पावरील चर्चेदरम्यान केलेल्या भाषणात राहुल गांधी यांनी शेतकरी, तरुणवर्ग, महिला, कामगार, लघु-उद्योजक, दलित-आदिवासी, ओबीसींची तुलना अभिमन्यूशी केली. सहा जणांनी अभिमन्यूची हत्या केली. आताच्या आधुनिक चक्रव्यूहात आधुनिक अभिमन्यूंना अडकवलं जात आहे, असं राहुल गांधी म्हणाले होते.
काय म्हणाले राहुल गांधी?
पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा, सरसंघचालक मोहन भागवत, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल, उद्योगपती मुकेश अंबानी आणि गौतम अदानी या सहा जणांनी हा आधुनिक चक्रव्यूह रचल्याचा आरोप राहुल गांधी यांनी केला. या लोकसभेतच ‘इंडिया’ आघाडी हमीभावाचा कायदा आणि जातगणना संमत करेल, असा विश्वास व्यक्त करतानाच मध्यमवर्गही भाजपपासून दूर जात असल्याचा दावा गांधी यांनी केला.
कंगना राणौत यांची प्रतिक्रिया
राहुल गांधी यांनी संसदेत केलेल्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना कंगना म्हणाल्या, “आपल्या लोकशाहीत पंतप्रधान हे लोकतांत्रिक पद्धतीने निवडले जातात. लिंग, वय, जात किंवा वर्ग पाहून पंतप्रधान निवडलं जातं का? आज ते असं म्हणाले, मग उद्या म्हणतील की वर्णावरून पंतप्रधान निवडले जातात. त्यांना लोकशाहीचा आदर नाही का? राहुल गांधी त्यांच्या अशा वक्तव्यांमुळे दररोज संविधानाला दुखावतात.”
View this post on Instagram
“कालसुद्धा संसदेत कॉमेडी शो झाला होता. त्यांना प्रतिष्ठाच नाही. काल ते तिथे म्हणत होते की आम्ही शिवजींची वरात आहोत आणि हे चक्रव्यूह आहे. मला असं वाटतं की त्यांची टेस्ट झाली पाहिजे की ते ड्रग्ज घेतात का? ज्या स्थितीत ते संसदेत पोहोचून वाईट पद्धतीने भाष्य करतात, ते पाहून मी काल आश्चर्यचकीत झाले होते. संसदेत त्यांनी म्हटलं की ही जी स्पर्धा आहे, ही शिवजींची वरात आहे आणि चक्रव्यूहात आहेत. त्यांच्या अशा वक्तव्यांवरून वाटत नाही का, की त्यांची ड्रग्जची चाचणी झाली पाहिजे? मला तर वाटतं की त्यांची तपासणी झाली पाहिजे. एकतर ते दारूच्या नशेत किंवा ड्रग्जच्या नशेत आहेत. शुद्धीत असलेली कोणती व्यक्ती असं भाष्य करेल”, असा सवाल कंगनाने केला.
अर्थसंकल्पावर राहुल गांधींची टीका
अर्थसंकल्प तयार करणाऱ्या अधिकाऱ्यांबरोबर अर्थमंत्र्यांनी हलवा खाऊन तोंड गोड करण्याची परंपरा आहे. त्याचा उल्लेख करत राहुल गांधींनी, अर्थसंकल्प तयार करण्याच्या प्रक्रियेमध्ये समाजातील 73 टक्क्यांचा म्हणजेच दलित, आदिवासी, ओबीसींचा समावेश नव्हता, अशी बोचरी टीका केली. त्याचप्रमाणे ‘चक्रव्यूहा’चं दुसरं नाव ‘पद्मव्यूह’ असंही आहे, असंही ते म्हणाले. “कमळाच्या आकाराचं व्यूह असा याचा अर्थ आहे. आधुनिक कमळरुपी चक्रव्यूहात अख्ख्या देशाची होरपळ सुरू आहे. सगळीकडे हिंसा आणि भीतीचं वातावरण आहे, अशा शब्दांत राहुल गांधी यांनी टीका केली.