गावगाड्याचा निकाल काय सांगतो?, महाआघाडी, भाजपचं आगामी राजकारण कसं असेल?; वाचा स्पेशल रिपोर्ट

गावगाड्याचे अर्थात ग्रामपंचायतीचे निकाल जाहीर झाले आहेत. (Analysis of gram panchayat election result in maharashtra)

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 13:57 PM, 19 Jan 2021
गावगाड्याचा निकाल काय सांगतो?, महाआघाडी, भाजपचं आगामी राजकारण कसं असेल?; वाचा स्पेशल रिपोर्ट
अहमदनगर जिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणुकीच्या निकालाचा चांगलाच जल्लोष पाहायला मिळाला. संगमनेरमधील देवगाव येथे मिरवणुकीसाठी थेट जेसीबीच वापरल्याचं दिसलं.

मुंबई: गावगाड्याचे अर्थात ग्रामपंचायतीचे निकाल जाहीर झाले आहेत. या निकालाच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांनी दावे-प्रतिदावे करत आपणच ग्रामपंचायतीत मुसंडी मारल्याचं सांगण्यास सुरुवात केली आहे. मात्र, प्रत्यक्षात या निकालाने सर्वच राजकीय पक्षांना एका निर्णायक वळणावर आणून ठेवले आहे. भविष्यातील राजकारणाची दिशा कोणत्या दिशेने न्यायची हे या निकालाने दाखवून दिले आहे. त्यामुळे आगामी काळात सर्वच राजकीय पक्षांना काही ठोस राजकीय निर्णय घ्यावे लागणार आहेत. या राजकीय पक्षांची भविष्यातील दिशा काय असू शकते? यावर टाकलेला हा दृष्टीक्षेप. (Analysis of gram panchayat election result in maharashtra)

निवडणूक निकालात काय?

ग्रामपंचायतीच्या 1600 जागा बिनविरोध निवडून आल्या आहेत. त्यापैकी सर्वाधिक जागांवर शिवसेना जिंकलेली आहे. उरलेल्या 13,833 जागांपैकी 13,769 जागांचे निकाल जाहीर झाले आहेत. काही जागांचे निकाल तांत्रिक कारणामुळे रखडले आहेत. जाहीर झालेल्या निकालांपैकी भाजपने 3,263, राष्ट्रवादीने 2,999, शिवसेनेने 2,808, काँग्रेसने 2,151, मनसेने 38 आणि स्थानिक गटांनी 2,510 जागा जिंकल्या आहेत. या निकालावरून महाविकास आघाडी आणि युती अशी तुलना केल्यास महाविकास आघाडीला सर्वाधिक म्हणजे सुमारे 8 हजाराहून अधिक जागा मिळाल्या आहेत. तर युतीकडे तीन हजाराहून अधिक जागा आलेल्या दिसत आहेत. त्यामुळे महाविकास आघाडीने मैदान मारल्याचं दिसून येत आहे. परंतु, राजकीय पक्षनिहाय विचार करता सर्वाधिक जागा जिंकून भाजप हा राज्यातील सर्वात मोठा पक्ष म्हणून पुढे आला आहे. त्या खालोखाल राष्ट्रवादी, शिवसेना आणि काँग्रेसने जागा जिंकल्या आहेत. मनसे, रिपाइं, वंचित बहुजन आघाडीलाही या निवडणुकीत जेमतेम जागा मिळाल्या आहेत.

चिन्हं नाही, पण जनमताचा कौल सबकुछ

ग्रामपंचायतीच्या निवडणुका पक्षाच्या चिन्हांवर लढवल्या जात नाहीत. बडे राजकीय नेतेही प्रचाराला जात नाहीत. स्थानिक नेत्यांच्या हवाली या निवडणुका सोडलेल्या असतात. त्यामुळे कोणत्या पक्षाची सरशी झाली हे सांगणं कठिण असतं. मात्र राजकीय पक्षाचे नेते स्थानिक आघाड्या तयार करतात. या आघाड्या पक्षाच्याच असतात. स्थानिक खासदार, आमदारांच्या नावानेही या आघाड्या निर्माण होतात. शिवाय प्रत्येक गावातील मतदार कोणत्या पक्षाचे आहेत, हे सहज कळून येतं. त्यामुळे निकाल लागल्यानंतर कोणत्या पक्षाची सरशी झाली हे सांगता येतं. त्यामुळे जनमताचा कौल कोणत्या दिशेने आहे, याचा अंदाज येतो, असं राजकीय निरीक्षक सांगतात.

मित्रपक्षाशिवाय सत्ता शक्य नाही

राज्यातील विधानपरिषदेपाठोपाठ ग्रामपंचायतीच्या निकालावरून भाजपला मित्रपक्षाशिवाय गरज नसल्याचं पुन्हा एकदा अधोरेखित झालं आहे. उद्या महाविकास आघाडी म्हणून लढणाऱ्या तीन पक्षांना रोखायचं असेल तर भाजपला एकट्याच्या बळावर फारसं यश मिळणार नसल्याचं स्पष्ट झालं आहे. आगामी निवडणुकांमध्ये सर्वाधिक जागा मिळवून भाजप नंबर वनचा पक्ष होईलही. पण सत्तेच्या समीकरणात महाविकास आघाडीच बाजी मारून जाईल, असं तरी चित्रं आहे. विधानसभा निवडणुकीत भाजप सर्वात मोठा पक्ष ठरला. पण महाविकास आघाडीने एकत्रित येऊन बहुमत सिद्ध केल्याने महाविकास आघाडीच्या हाती सत्ता आली. हे उदाहरण भाजपसाठी पुरेसं बोलकं आहे. त्यामुळे उद्या राज्यात मोठी झेप घ्यायची असेल तर भाजपला मनसे आणि वंचित बहुजन आघाडीला सोबत घेऊनच पुढची वाटचाल करावी लागेल किंबहुना ती भाजपची राजकीय गरज ठरणार आहे.

भाजप-मनसे किमान समान कार्यक्रमावर एकत्र येणार?

भाजपला राज्यात सत्तेत पोहोचायचे असेल तर मित्र पक्ष म्हणून भाजपला मनसे हा सर्वात चांगला पर्याय आहे. मनसेला सोबत घेण्याचे भाजपने तसे संकेतही दिले आहेत. पण त्यासाठी परप्रांतियांचा मुद्दा सोडण्याची अट भाजपने मनसेला घातली आहे. मात्र, आगामी काळात मनसेचा परप्रांतियांचा मुद्दा कायम ठेवूनही भाजपला मनसेसोबत जाण्यासाठी हालचाली कराव्या लागतील. महाविकास आघाडीच्या धर्तीवर किमान समान कार्यक्रमावर हे दोन्ही पक्ष एकत्र येऊ शकतात. शिवसेनेचा हिंदुत्वाचा मुद्दा, परप्रांतियांचा मुद्दा आणि इतर वादग्रस्त मुद्दे कायम ठेवून किमान समान कार्यक्रमावर काँग्रेस, राष्ट्रवादी शिवसेनेसोबत गेली. त्यामुळे राज्यात त्यांची सत्ता आली. याच धर्तीवर मनसे आणि भाजपला राज्यात एकत्र यावे लागेल. नाही तर भाजपला सत्तेपासून दूरच राहावं लागेल, असं राजकीय जाणकार सांगतात. (Analysis of gram panchayat election result in maharashtra)

यश हवंय तर आघाडी हवी

राज्यात पंचायतीपासून ते राज्यातील सर्वोच्च सत्तेपर्यंत जायचं असेल आघाडी शिवाय पर्याय नाही, हे आधी विधान परिषद आणि आता ग्रामपंचायतीच्या निवडणुकीतून सिद्ध झाले आहे. त्यामुळे मुंबई महापालिकेत स्वबळावर लढण्याची वक्तव्य करणाऱ्या काँग्रेसला ग्रामपंचायतीच्या निकालानंतर पुन्हा गांभीर्याने विचार कारावा लागेल. राज्यात महाविकास आघाडीने एकत्र लढून सर्वाधिक जागा जिंकल्या असल्या तरी पक्षनिहाय विचार करता राज्यात भाजपच नंबर वन ठरला आहे. तर काँग्रेस चौथ्या क्रमांकावर फेकला गेला आहे. आघाडी न करता निवडणुका लढवल्या असत्या तर भाजपला प्रचंड यश मिळालं असतं आणि काँग्रेसची प्रचंड वाताहत झाली असती. महाविकास आघाडी एकत्र असली तरी भाजपची लाट अजूनही ओसरलेली नाही, हे या निकालातून पुन्हा एकदा अधोरेखित झालं आहे. त्यामुळे काँग्रेसला पुढील सर्व निवडणुकांना समोरे जाताना व्यवहारी राजकीय निर्णय घ्यावे लागतील, असं राजकीय निरीक्षक सांगतात. (Analysis of gram panchayat election result in maharashtra)

 

संबंधित बातम्या:

Gram Panchayat Election Results 2021 Maharashtra LIVE | ‘भाजप सहा हजार पेक्षा जास्त ग्रामपंचायतींवर विजयी होईल’, चंद्रकांत पाटलांचा दावा

महाराष्ट्र ग्रामपंचायत निकाल 2021 : शिवसेनेचं बालेकिल्ल्यातील वर्चस्व अबाधित; अंबरनाथचा गड राखला

अहमदनगरमध्ये वेगळाच ट्विस्ट, ‘नोटा’ला सर्वाधिक 502 मतं, विजयी कोण?

(Analysis of gram panchayat election result in maharashtra)