राष्ट्रवादीकडून काँग्रेसला 111 जागांची ऑफर?

विशेष म्हणजे काँग्रेसच्या नेत्यांनी राष्ट्रवादीकडून आलेली ऑफरही टीव्ही 9 मराठीला सांगितली. यानुसार काँग्रेसला 111 जागांची ऑफर (NCP congress seat sharing formula) देण्यात आली आहे.

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 22:26 PM, 5 Sep 2019

मुंबई : एकीकडे शिवसेना आणि भाजप यांच्या युतीच्या जागा वाटपाचा तिढा एवढ्या सहजासहजी सुटणार नाही, असंच दिसतंय. तर तिकडे काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांच्या आघाडीच्या जागा वाटपाबाबत (NCP congress seat sharing formula) सकारात्मक चर्चा झाल्याचं काँग्रेसच्या नेत्यांचं म्हणणं आहे. विशेष म्हणजे काँग्रेसच्या नेत्यांनी राष्ट्रवादीकडून आलेली ऑफरही टीव्ही 9 मराठीला सांगितली. यानुसार काँग्रेसला 111 जागांची ऑफर (NCP congress seat sharing formula) देण्यात आली आहे.

आघाडीचा अंतिम फॉर्म्युला अजून जाहीर झालेला नसला, तरी काँग्रेस कामाला लागली आहे. दिल्लीत छाननी समितीची बैठक पार पडली. यात सध्याच्या सर्वच आमदारांची नावं काँग्रेसने जवळपास निश्चित केली आहेत. दुसरीकडे आघाडीबाबत सकारात्मक चर्चा झाल्याचं काँग्रेस नेते आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाणांनी म्हटलंय. राष्ट्रवादीने 111 जागांची काँग्रेसला ऑफर दिल्याची माहिती काँग्रेस नेते माणिकराव ठाकरेंनी दिली..

सध्या राष्ट्रवादीने काँग्रेससाठी 111 जागांची तयारी दर्शवली असली तरी मित्रपक्षांना 38 जागा सोडून 125 /125 जागांचा फॉर्म्युला काँग्रेसच्या मनात आहे.

विधानसभेसाठी वेळेत पूर्ण तयारी करण्याचं काँग्रेसने ठरवलं आहे. त्यामुळे उमेदवारांची निश्चितीही काँग्रेसने सुरु केली आहे. आता उमेदवारांच्या नावांवर शिक्कामोर्तब करण्यासाठी काँग्रेसने आघाडी घेतली आहे. पण नजरा आघाडीच्या फॉर्म्युल्याकडे आहेत.

काँग्रेसचे 60 उमेदवार निश्चित

विधानसभेसाठी काँग्रेसचे 60 उमेदवार ठरले असून पहिली यादी 10 सप्टेंबरला जाहीर केली जाणार आहे. काँग्रेस नेते ज्योतीरादित्य शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली छाननी समितीची दिल्लीत बैठक झाली. या बैठकीनंतर ज्योतीरादित्य शिंदे यांनी ही माहिती दिली. शिवाय पुढची बैठक ही 10 सप्टेंबरला होणार असून त्याच दिवशी पहिली यादी जाहीर होईल आणि इतर नावेही ठरवली जातील, असंही शिंदे म्हणाले.

दरम्यान, गेल्या निवडणुकीत काँग्रेसचे 42 आमदार निवडून आले होते. त्यापैकी काही जणांनी यावेळी भाजपात प्रवेश केलाय, तर अजून काही जण भाजपच्या वाटेवर आहेत. त्यामुळे उर्वरित विद्यमान आमदारांना पुन्हा एकदा संधी मिळण्याची दाट शक्यता आहे.