नाशिककरांना शिवसेना-भाजप नेत्यांच्या नावे समीर भुजबळांना मतदानाचे मेसेज

नाशिककरांना शिवसेना-भाजप नेत्यांच्या नावे समीर भुजबळांना मतदानाचे मेसेज


नाशिक : लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्याच्या प्रचार तोफा थंडावल्या असताना आणि मतदानाला अगदी थोडा वेळ शिल्लक असताना नाशिकमध्ये राजकीय डावपेच पाहायला मिळत आहेत. मतदानाला 1 दिवस शिल्लक असताना राजकीय पक्ष काय क्लृप्त्या करु शकतात याचा हा नमुना आहे. नाशिककरांना नाशिकच्या उज्वल भविष्यासाठी राष्ट्रवादी-काँग्रेस आघाडीचे उमेदवार समीर भुजबळ यांना विजयी करा, असे मेसेज येत आहेत. विशेष म्हणजे हे मेसेज राष्ट्रवादी-काँग्रेसकडून नाही, तर भाजप आणि शिवसेनेचे नेते, आमदार यांच्या नावाने येत आहेत. त्यामुळे मोठी खळबळ उडाली.

याप्रकरणी शिवसेना नेत्यांनी निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल केली आहे. शिवसेना जिल्हाप्रमुख विजय करंजकर आणि पालिका विरोधी पक्षनेते अजय बोरस्ते यांनी नाशिक पोलीस आयुक्तांकडेही याबाबत तक्रार केली आहे. यानंतर पोलिसांचे सायबर सेल या प्रकरणाचा कसून तपास करत आहेत. संबंधित मेसेज ‘BW-NASHIK’ या बल्क मेसेज हँडलवरुन येत आहेत, अशीही माहिती समोर आली आहे.

नाशिक लोकसभा मतदारसंघात शिवसेना-भाजप युतीकडून विद्यमान खासदार हेमंत गोडसे, राष्ट्रवादी-काँग्रेसकडून समीर भुजबळ, अपक्ष माणिकराव कोकाटे आणि वंचित बहुजन आघाडीकडून पवन पवार हे निवडणूक मैदानात आहेत. नाशिकमध्ये उद्या (29 एप्रिलला) चौथ्या टप्प्यात मतदान होणार आहे. या चौथ्या टप्प्यातील निवडणूक प्रचाराच्या तोफा शनिवारी सायंकाळी थंडावल्या. मात्र, प्रचार थांबल्यानंतर नाशिककरांना अचानक राष्ट्रवादीचे उमेदवार समीर भुजबळ यांना नाशिकच्या भविष्यासाठी मतदानाचे आवाहन करणारे मेसेज सुरु झाले.

‘मेसेज पाठवण्यामागे राष्ट्रवादीचाच हात असल्याचा शिवसेनेला संशय’

दरम्यान, कोणीतरी मुद्दाम हे कृत्य करत असल्याचा आरोप शिवसेनेने केला आहे. संबंधित मेसेज पाठवण्यामागे राष्ट्रवादीचाच हात असल्याचा संशय शिवसेना व्यक्त करत आहे. त्यामुळे मतदानाच्या पार्श्वभूमीवर दोन्ही पक्षांमध्ये तणाव निर्माण झाला आहे. या प्रकरणी शिवसेना-भाजपने निवडणूक आयोग आणि पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे. शिवसेना आमदार राजाभाऊ वाजे, भाजप आमदार सीमा हिरे, शिवसेना जिल्हा प्रमुख विजय करंजकर आणि मनपा विरोधी पक्षनेते अजय बोरस्ते यांनी या तक्रारी केल्या. तसेच दोषींवर तातडीने कारवाई करण्याची मागणीही त्यांनी केली.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI