एमएमआरडीए घरघोटाळा : राष्ट्रवादीच्या नगरसेवकांचं धरणे आंदोलन; महेश आहेर यांना निलंबित करा, परांजपे आक्रमक

एमएमआरडीए घरघोटाळा : राष्ट्रवादीच्या नगरसेवकांचं धरणे आंदोलन; महेश आहेर यांना निलंबित करा, परांजपे आक्रमक
ठाण्यात राष्ट्रवादी काँग्रेसचं आंदोलन

या घोटाळ्यामध्ये स्थावर मालमत्ता विभागाचे अधीक्षक महेश आहेर यांचाच सहभाग असल्याने त्यांना निलंबित करुन कारवाई करावी, अशी मागणी आनंद परांजपे यांनी केली. तर, शानू पठाण यांनी धनदांडग्यांकडून पैसे घेऊन गोरगरीबांची घरे लाटण्यात आलेली आहेत. या घोटाळ्याच्या मास्टरमाईंडवर कारवाई करावी, अशी मागणी केली.

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: सागर जोशी

Jan 17, 2022 | 9:11 PM

ठाणे : विविध प्रकल्पांमध्ये बाधीत झालेल्या नागरिकांना घरे देण्याऐवजी बोगस लाभार्थ्यांना घरांचे वाटप करण्यात आलेले आहे. या घोटाळ्याची चौकशी करण्यासाठी समिती नेमून भ्रष्ट अधिकार्‍यांना निलंबित करावे, या मागणीसाठी गृहनिर्माण मंत्री डॉ. जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) आणि शहराध्यक्ष आनंद परांजपे (Anand Paranjape) यांच्या मार्गदर्शनाखाली विरोधी पक्षनेते अश्रफ शानू पठाण यांच्या नेतृत्वाखाली बेमुदत धरणे आंदोलन सुरु करण्यात आले आहे. यावेळी या घोटाळ्यामध्ये स्थावर मालमत्ता विभागाचे अधीक्षक महेश आहेर यांचाच सहभाग असल्याने त्यांना निलंबित करुन कारवाई करावी, अशी मागणी आनंद परांजपे यांनी केली. तर, शानू पठाण यांनी धनदांडग्यांकडून पैसे घेऊन गोरगरीबांची घरे लाटण्यात आलेली आहेत. या घोटाळ्याच्या मास्टरमाईंडवर कारवाई करावी, अशी मागणी केली.

ठाणे महानगर पालिकेच्या वतीने बाधितांचे पुनर्वसन करताना घरे देण्यात आली आहेत. एमएमआरडीएने ठामपाकडे घरे वर्ग केली आहेत. त्यानुसार ठामपाने यादी तयार करून घरांचे वाटप करण्यात आले. सन 2016 मधील रस्ता रूंदीकरणातील बाधितांना घरे दिली. या प्रकरणात गैरव्यवहार झाल्याने घरांमध्ये राहणार्‍या लोकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बोगस बायोमेट्रिक सर्वे, संगणकीय चाव्या तयार करण्यात आल्या आहेत. पालिका अधिकार्‍यांच्या संगनमताशिवाय हा प्रकार घडू शकत नाही. त्यामुळेच या प्रकरणाचा छडा लावण्यासाठी महापौरांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती गठीत करून झारीतील शुक्राचार्यांचा शोध घेऊन कारवाई करावी, या मागणीसाठी विरोधी पक्षनेते अश्रफ शानू पठाण यांच्या नेतृत्वाखाली धरणे आंदोलन सुरु करण्यात आले आहे. या आंदोलनामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व नगरसेवक सहभागी झाले होते. यावेळी आंदोलकांनी, “ गांधी लढे थे गोरोसे; हम लडेंगे चोरोंसे, चोर है चोर है, ठामपा अधिकारी चोरे है; पालिका आयुक्त होश मे आवो; अशा प्रकारच्या घोषणा दिल्या.

NCP Andolan 1

ठाण्यात आनंद परांजपे यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादी काँग्रेसचं आंदोलन

‘आयुक्तांच्या आशीर्वादाने हा घोटाळा होत आहे का?’

यावेळी शहराध्यक्ष आनंद परांजपे म्हणाले की, विरोधी पक्षनेते शानू पठाण यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन सुरु करण्यात आलेले आहे. एमएमआरडीएच्या सदनिकांमध्ये घोटाळा झालेला आहे. रस्ता रुंदीकरण, विविध विकास प्रकल्प यामध्ये गोरगरीबांची घरे बाधीत झालेली आहेत. त्या गोरगरीबांना न्याय हक्काने घरे मिळाली पाहिजेत. मात्र, या घरांमध्येच ठामपाच्या अधिकार्‍यांनी मोठा घोटाळा केला पाहिजे. या अधिकार्‍यांची चौकशी झाली पाहिजे; या सर्व घोटाळ्याच्या मागे महेश आहेर हेच कारणीभुत आहेत. ते अकरावी नापास आहेत. त्यांची चौकशी करण्यासाठी मी पत्र दिले; पुरावेही दिले होते. मात्र, अतिरिक्त आयुक्त संजय हेरवाडे यांनी थातूरमातूर जबाब घेऊनही कारवाई करण्यात आलेली नाही. गोरगरीबांना घरे देण्याऐवजी धनदांडग्यांसाठी खोटे कागदपत्र आणि शिक्के बनवून ज्यांनी हे कृत्य केले आहे त्याचे मुख्य सूत्रधार महेश आहेर हेच आहेत. त्यांच्यावर कारवाई करायला पालिकेचे आयुक्त डॉ. शर्मा हे तयार नाहीत. त्यामुळे आयुक्तांच्या आशीर्वादाने हा घोटाळा होत आहे का? असा प्रश्न निर्माण होत आहे. जर खर्‍या अर्थाने निष्पक्ष चौकशी व्हायची असेल तर आहेर यांना तत्काळ निलंबित केले पाहिजे. जोपर्यंत त्यांना पदावरुन हटवित नाहीत. तो पर्यंत ह्या घोटाळ्याचा तपास योग्यरितीने होणार नाही. आपण ठाणे पोलिसांनाही विनंती करीत आहोत की, त्यांनीही दबावाला बळी न पडता या मास्टरमाईंडवर कारवाई केलीच पाहिजे. जर पोलिसांनी दबावाला बळी पडून कारवाई केली नाही तर आपण गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांच्याकडे तक्रार करणार आहोत;आयुक्तांना आपण या निमित्ताने जाहीर आवाहन करीत आहोत की त्यांनीही महेश आहेर यांना निलंबित करावे अन्यथा आम्ही असे समजू की आयुक्तांचे भ्रष्ट अधिकार्‍यांना पाठबळ आहे.

बेमुदत आंदोलन सुरुच राहणार, पठाण यांचा इशारा

दरम्यान, शानू पठाण यांनी ठामपामध्ये वारंवार भ्रष्टाचाराचे आरोप होत आहेत. हे भ्रष्टाचार अधिकार्‍यांच्या संगनमताशिवाय होत नाहीत. एकीकडे गोरगरीब बाधीतांना घरे दिली जात नाहीत; तर दुसरीकडे धनदांडग्यांकडून पैसे घेऊन बनावट कागदपत्रे आणि चाव्या बनविण्यात आलेल्या आहेत. याचा मास्टरमाईंड जो आहे; त्या अधिकार्‍यावर कारवाई करावी. आयुक्तांनी आपली जबाबदारी ओळखून संबधित दोषी अधिकार्‍यांवर कारवाई करावी, अशी मागणी करुन चौकशी समिती जाहीर केली नाही तर आपण कोविडचे नियम पाळत ठामपा मुख्यालयासमोर बेमुदत आंदोलन सुरूच ठेवण्यात येईल, असा इशारा दिला.

या आंदोलनात प्रदेश चिटणीस सुहास देसाई, कळवा प्रभाग समिती सभापती वर्षा मोरे, महिला बालकल्याण समिती सभापती राधाबाई जाधवर, नगरसेवक बाबाजी पाटील, राजन किणे, मोरेश्वर किणे, जफर नोमानी, नगरसेविका अनिता किणे, हाफिजा नाईक, फरझाना शेख, रूपाली गोटे, अंकिता शिंदे, आरती गायकवाड, परिवहन समिती सदस्य शमीम खान, राष्ट्रवादी महिलाध्यक्षा सुजाता घाग, युवक अध्यक्ष विक्रम खामकर, गजाजन चौधरी, सचिन पंधारे, विद्यार्थी अध्यक्ष प्रफुल कांबळे, राजू चापले, दीपक क्षत्रिय, कैलास हावळे, रवी पालव , सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते आदी उपस्थित होते.

इतर बातम्या :

‘नानाभाऊ केवळ शारीरिक उंची असून चालत नाही…’ फडणवीसांचं प्रत्युत्तर, तर चंद्रकांतदादांचे सर्व जिल्हाध्यक्षांना महत्वाचे आदेश

Mumbai Corona Update : महानगरातील कोरोना रुग्णांच्या संख्येत घट, मुंबईत दिवसभरातील रुग्णसंख्या 6 हजाराच्या आत

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें