माझ्या यापुढच्या सर्व सभा मोदी-शाहांच्या विरोधात असतील : राज ठाकरे

माझ्या यापुढच्या सर्व सभा मोदी-शाहांच्या विरोधात असतील : राज ठाकरे

मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी लोकसभा निवडणुकीबाबत भूमिका जाहीर केली आहे. युती किंवा आघाडी यामध्ये आपल्याला रस नसून फक्त मोदीमुक्त भारत हे ध्येय असल्याचं त्यांनी जाहीर केलं. यापुढच्या माझ्या सर्व सभा या मोदी-शाह यांच्याविरुद्ध असतील. येणारी लोकसभा निवडणूक ही मोदी-शाह विरुद्ध संपूर्ण देश अशी असेल, असंही राज ठाकरे म्हणाले.

राज ठाकरे यांनी आघाडीत यावं, असं काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादीचे नेते अजित पवार म्हणाले होते. यावरही राज ठाकरेंनी उत्तर दिलं. अजित पवारांच्या या वक्तव्यानंतर त्यांना भेटण्यासाठी बोलावलं. या भेटीमध्ये आपण कोणतीही अशी मागणी केली नाही, असं अजित पवार यांनी सांगितलं. त्याचप्रमाणे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनाही हेच सांगितलं, असं राज ठाकरे म्हणाले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या चौकीदार या मोहिमेवरही राज ठाकरेंनी टीका केली. मी चौकीदार हे कॅम्पेन सुरु आहे, इतका खालचा विचार कसा असू शकतो? या देशाची वाट लावल्याने चौकीदार हा फास पुढे केला जात आहे, त्यात अडकू नका, असं आवाहन राज ठाकरेंनी केलं.

भाजप आणि मोदी-शाह यांच्या विरोधात प्रचार करा, महाराष्ट्र सैनिकांना आदेश आहे की तुम्ही ही जोडी सत्तेच्या बाहेर काढा. आत्ताची लढाई ही पक्षाशी नाही तर मोदी आणि अमित शाह यांच्या विरोधात आहे आणि म्हणूनच त्यांच्या उमेदवारांना मतदान न करणं आणि त्यांना मदत न करणं हाच उद्देश आहे, अशी भूमिका राज ठाकरेंनी जाहीर केली.

पंडित नेहरूंना, इंदिरा गांधींना शिव्या द्या ह्या पलीकडे मोदींनी गेल्या पाच वर्षात काय केलं? जर मोदींच्या मते नेहरू इतके वाईट आणि त्यांची तुलना सारखी सरदार वल्लभभाई पटेल ह्यांच्याशी करताय, मग सरदारांचा पुतळा ज्या सरदार सरोवरात उभा आहे, त्याचं भूमीपूजन पंडित नेहरूंनी केलं आहे. देशाच्या नव्या प्रारंभासाठी मोदी-शाह हे राजकीय पटलावरून बाजूला होणं गरजेचं आहे. देश या दडपशाहीतून मुक्त होणं गरजेचं आहे. महाराष्ट्र सैनिकांनो  मोदी, शाहांविरुद्ध प्रचार करा, असे आदेश राज ठाकरेंनी दिले.

दरम्यान, या भाषणात राज ठाकरेंनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचाही समाचार घेतला. शिवाय पंतप्रधान मोदींची जुनी भाषणं दाखवून त्यांनी माणूस कसा बदलतो, हे सांगितलं.

Published On - 7:16 pm, Tue, 19 March 19

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI