विचारधारेमुळे अनेक राज्यांत भाजप कार्यकर्त्यांच्या हत्या : मोदी

 • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
 • Published On - 16:27 PM, 27 May 2019
विचारधारेमुळे अनेक राज्यांत भाजप कार्यकर्त्यांच्या हत्या : मोदी

लखनऊ : लोकसभा निवडणुकांमध्ये मिळवलेल्या घवघवीत यशानंतर वाराणसी मतदार संघाचे खासदार नरेंद्र मोदी आज त्यांच्या मतदार संघात पोहोचले. वराणसीत पोहोचल्यानंतर मोदींनी सर्वातआधी विश्वनाथ मंदिरात जाऊन दर्शन घेतलं. यावेळी भाजप अध्यक्ष अमित शाह आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यानाथ हे देखील उपस्थित होते. यानंतर मोदींनी भाजप कार्यकर्त्यांना संबोधित केलं.

मोदींच्या वाराणसी येथील भाषणातील काही महत्त्वाचे मुद्दे

 • मी भारतीय जनता पक्षाचा एक कार्यकर्ता असल्याच्या नात्याने पक्ष आणि कर्यकर्ता मला जो आदेश देतील, मी त्याचं पालन करण्याचा प्रयत्न करतो.
 • निवडणुकांवेळी कदाचितच कुठला उमेदवार इतकी निश्चिंत राहिला असेल, जेव्हढा मी होतो. याचं कारण कार्यकर्त्यांची मेहनत आणि काशीवासियांचा विश्वास आहे. मतदान आणि निकाल या दोन्ही प्रसंगी मी निश्चिंत होतो. तेव्हा मी केदारनाथमध्ये ध्यानसाधना करत होतो.
 • इथल्या मुलींनी जी स्कुटी यात्रा काढली, त्याची संपूर्ण देशात आणि सोशल मीडियावर चर्चा झाली.
 • उत्तर प्रदेशच्या राजकारणाला एक नवी दिशा मिळत आहे. 2014, 2017 आणि आता 2019 ही हॅट्रिक लहान गोष्ट नाही. उत्तर प्रदेशचा गरीब व्यक्तीही आता देशाला एक सक्षम नेतृत्त्व आणि योग्य दिशा देण्याचा विचार करतो आहे आणि त्यासाठी प्रयत्नही करतो आहे.
 • आदर्श आणि संकल्प यांची जी केमिस्ट्री आहे, ती कधी-कधी सर्व गणित बदलून टाकते. या निवडणुकांमध्येही अंक गणिताला केमिस्ट्रीने हरवलं आहे.
 • आम्ही लोकशाहीत विश्वास ठेवणारे लोक आहोत. जनतेच्या अविश्वासामुळे विरोधकांची संख्या जरी कमी असली तरी, जिथे-जिथे आम्हाला संधी मिळाली तिथे आम्ही विरोधकांना महत्त्व दिलं.
 • या निवडणुकांमध्ये आम्हाला दोन मोठ्या संकटांना सामोरे जावं लागलं. ती संकटं म्हणजे राजकीय हिंसा आणि राजकीय अस्पृश्यता.
 • राजकीय विचारधारणेमुळे देशात अनेक राज्यांत आमच्या कार्यकर्त्यांच्या हत्या झाल्या. सध्या देशात राजकीय अस्पृश्यता मोठ्या प्रमाणात वाढत चालली आहे.
 • आम्ही दोन गोष्टींना महत्त्व देतो, पहिली – भारताचा महान वारसा आणि दूसरी – आधुनिक व्हिजन. आम्हाला आमच्या भारतीय संस्कृतीला न विसरता वर्तमान परिस्थितीही सांभाळायची आहे.