माझा हिशोब देणारच, सोबत दुसऱ्यांचाही घेणार : मोदी

माझा हिशोब देणारच, सोबत दुसऱ्यांचाही घेणार : मोदी


मेरठ: पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रचाराला जोरदार सुरुवात केली आहे. आज मेरठमध्ये एका प्रचारसभेत बोलताना त्यांनी विरोधकांवर खरमरीत टीका केली. यावेळी ते म्हणाले, ‘मी जे काम केले त्याचा हिशोब तर देणारच, सोबत दुसऱ्यांचाही हिशोब घेईन. दोन्ही हिशोब एकाचवेळी चालतील.’

आपल्या भाषणात मोदी म्हणाले, ‘जमीन असो की आकाश प्रत्येक ठिकाणी सर्जिकल स्ट्राईक करण्याची हिंमत याच चौकीदाराने दाखवली. आमचे सरकार निर्णय घेणारे, तर दुसरे निर्णय ताणणारे आहे. आमच्या सरकारने देशाला गुंडगिरी, दहशतवादापासून सुरक्षित बनवले आहे.’ यावेळी मोदींनी सैनिकांच्या ‘वन रँक, वन पेन्शन’च्या मुद्द्यालाही हात घातला. तसेच 40 वर्षांपासून सैनिकांच्या रखडलेल्या मागण्या याच चौकीदाराने पूर्ण केल्याचेही ते म्हणाले. मोदींनी उपस्थितांना 2014 पूर्वीच्या आणि आत्ताच्या परिस्थितीची तुलना करण्यास सांगितले. तसेच मागील काळात बाँबस्फोट दररोजचे झाल्याचा दावा केला.

मोदींनी काँग्रेसवर पुन्हा एकदा घराणेशाही आणि भ्रष्टाचाराचे आरोप करत हल्लाबोल केला. तसेच, आपल्या कामाची यादी सांगताना ते म्हणाले, ‘याच चौकीदाराने 12 कोटी लोकांना 75 हजार कोटींची योजना दिली. 50 कोटी जनतेला 5 लाखांपर्यंत मोफत उपचार दिला. देशाच्या जवळपास 50 लाख कुटुंबाना मोफत आरोग्य दिले. सामान्य गरीब लोकांना 10 टक्के आरक्षण द्यायचा निर्णयही आम्हीच घेतला. 15 कोटींहून अधिक लोकांना विना गॅरंटी कर्जवाटप केले. इमानदार करदात्यांना 5 लाखांपर्यंत करसवलत दिली आणि समाजातील एकाही व्यक्तीला विकासापासून वंचित ठेवले नाही.’

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI