नागपूर पदवीधर मतदारसंघ स्पेशल रिपोर्ट : भाजप बालेकिल्ला राखणार, की काँग्रेस गड खेचून आणणार?

नवीन मतदार याद्यांमुळे कुणाला फायदा होणार आणि कुणाला तोटा होणार? नागपूर पदवीधर मतदारसंघावर स्पेशल रिपोर्ट

  • गजानन उमाटे, टीव्ही 9 मराठी, नागपूर
  • Published On - 12:56 PM, 20 Nov 2020
Nagpur MLC election Maharashtra 2020 results Congress Abhijit vanjari takes lead over bjp Sandip Joshi

नागपूर : नागपूर पदवीधर मतदारसंघावर (Nagpur Graduate Constituency Election) आजपर्यंत भाजपचं वर्चस्व राहिलं आहे. त्यामुळे भाजपसाठी ही प्रतिष्ठेची लढत झाली आहे. एकूण 19 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात असले, तरी या मतदारसंघात भाजप आणि काँग्रेस यांच्यातच थेट लढत आहे. भाजपने दिग्गज नेत्यांना प्रचाराच्या मैदानात उतरवत संदीप जोशी (Sandeep Joshi) यांच्यासाठी संपूर्ण ताकद पणाला लावली आहे, तर दुसरीकडे काँग्रेस उमेदवार अभिजित वंजारी (Abhijeet Vanjari) यांच्यासाठीही शिवसेना-राष्ट्रवादी-काँग्रेस या तिन्ही पक्षांच्या महाविकास आघाडीने जोर लावला आहे. नव्याने तयार करण्यात आलेल्या मतदार याद्यांमुळे 28 टक्के मतदार घटले, याचा कुणाला फायदा होणार आणि कुणाला तोटा होणार? याकडेही सर्वांचं लक्ष लागलं आहे. (Nagpur Graduate Constituency Election Candidates Special Report)

भाजपच्या गडात ही निवडणूक होत असल्याने पक्षासाठी ही प्रतिष्ठेची निवडणूक आहे. भाजपने यावेळेस देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय आणि महापौर संदीप जोशी यांना उमेदवारी दिली आहे. कधी काळी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व केलं आहे. शिवाय आतापर्यंत भाजपचं वर्चस्व असल्याने, या निवडणुकीतही संदीप जोशी यांचा नक्की विजय होईल, असा विश्वास भाजपचे निवडणूक प्रमुख चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केला आहे.

भाजपचा गड असलेला मतदारसंघ खेचून आणण्यासाठी काँग्रेसनेही जोर लावला आहे. महाविकास आघाडीतर्फे काँग्रेसचे अभिजीत वंजारी निवडणुकीच्या रिंगणात आहेत. गेल्या दीड वर्षांपासून ते या निवडणुकीची तयारी करत आहेत. 60 पेक्षा जास्त तालुके आणि पाच जिल्हे येणाऱ्या या मतदारसंघातील मतदारांपर्यंत पोहोचल्याचा दावा ते करतात. जिंकण्याचा विश्वासही काँग्रेसने व्यक्त केला आहे.

मतदार याद्या नव्याने तयार

न्यायालयाच्या निर्देशानंतर यावेळेस नागपूर मतदारसंघातील मतदार याद्या नव्याने तयार करण्यात आल्या. त्यात गेल्या निवडणुकीच्या तुलनेत 28 टक्के मतदार घटले. याचा कुणाला फायदा होईल, किंवा कुणाला फटका बसेल, याकडेही लक्ष लागलं आहे. नागपूर पदवीधर मतदारसंघात दोन लाख सहा हजार 454 मतदार आहेत. यातील सर्वाधिक मतदार नागपूर जिल्ह्यात असल्याने प्रचारात सर्वच पक्षांनी नागपूरवर अधिक जोर दिला आहे. (Nagpur Graduate Constituency Election Candidates Special Report)

नागपूर पदवीधर मतदारसंघात प्रचाराचे अवघे काही दिवस उरले आहेत. त्यामुळे दोन्ही पक्षांकडून प्रचाराची रणधुमाळी जोरात सुरु आहे. भाजपकडून निवडणूक प्रमुख चंद्रशेखर बावनकुळे, विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यासह भाजपचे सर्व आमदार आणि खासदार मैदानात आहेत. तर काँग्रेसकडून मंत्री विजय वडेट्टीवार, नितीन राऊत, सुनील केदार यांच्यासह सर्व आमदार मैदानात आहेत. त्यामुळे या निवडणुकीची चुरस वाढली आहे.

संबंधित बातम्या 

पुणे पदवीधर स्पेशल रिपोर्ट : दोन ‘पाटील’ प्रदेशाध्यक्षांची प्रतिष्ठा पणाला, मनसेमुळे तिरंगी लढत

अमरावती शिक्षक मतदारसंघ स्पेशल रिपोर्ट : पक्ष की बहीण? भाजप नेत्यासमोर द्विधा, लढत चौरंगी

(Nagpur Graduate Constituency Election Candidates Special Report)