भाजपच्या गडाला महाविकास आघाडी लावणार का सुरूंग? नागपूर मतदारसंघात रंगली रस्सीखेच

एकीकडे भाजप आपला गड साबूत ठेवण्याचा प्रयत्न करत आहे तर दुसरीकडे काँग्रेस या गडाला सुरूंग लावून काबिज करण्याच्या प्रयत्नात आहे.

  • सुनील ढगे, टीव्ही 9 मराठी, नागपूर
  • Published On - 18:52 PM, 27 Nov 2020

नागपूर : नागपूर पदवीधर मतदार संघात (Nagpur Graduate Constituency Election) भाजप आणि काँग्रेसमधील रस्सीखेच चांगलीच रंगल्याचं चित्र आहे. एकीकडे भाजप आपला गड साबूत ठेवण्याचा प्रयत्न करत आहे तर दुसरीकडे काँग्रेस या गडाला सुरूंग लावून काबिज करण्याच्या प्रयत्नात आहे. त्यामुळे यात कोणाला यश मिळतं हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. (Nagpur graduate constituency election war between BJP and Congress)

नागपूर पदवीधर मतदार संघ हा भाजपचा गड आहे. या मतदार संघावर आतापर्यंत भाजपचाच झेंडा पाहायला मिळाला. मग ते गंगाधर राव फडणवीस यांच्या रूपाने असो नाहीतर मग केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या रूपात असो. भाजपने नेहमीच हा मतदारसंघ बांधून ठेवला. यावेळी फडणवीसांचे निकटवर्तीय संदीप जोशी (Sandeep Joshi) यांना मैदानात उतरवण्यात आलं आहे. यासाठी भाजपकडून जोरदार प्रचारही करण्यात येत आहे.

भाजपचे मोठे नेतेसुद्धा प्रचारासाठी मैदानात उतरले आहेत. सध्या राज्यात महाविकास आघाडीचं सरकार आहे. त्यांनी अभिजित वंजारी (Abhijeet Vanjari) यांना उमेदवारी देत भाजपला आव्हान केलं आहे. महाविकास आघाडीनेसुद्धा प्रचारात चांगलीच आघाडी घेतली आहे. या निवडणुकीत तीन पक्ष सोबत असल्याचा त्यांना फायदा होण्याची शक्यता आहे. मात्र, लढाई चुरशीची होणार यात शंका नसल्याचं राजकीय विश्लेषकांचं म्हणणं आहे.

भाजपने या मतदार संघासाठी आधीपासूनच जुळवाजुळव केली तर काँग्रेससुद्धा कामाला लागली होती. मात्र, पदवीधर मतदार संघात सहा जिल्ह्यांचा समावेश आहे. मतदान क्षेत्र मोठं आहे. अशात मतदारानापर्यंत कोण किती प्रमाणात पोहचतो आणि कशा प्रकारे आपला प्रचार करून मत पारड्यात पाडून घेतात हे सुद्धा महत्वाचं ठरणार आहे. त्यामुळे हा गड भाजप राखेल की काँग्रेसला यश मिळेल हे निवडणुकीच्या निकाल नंतरच समोर येईल. (Nagpur graduate constituency election war between BJP and Congress)

नागपूर पदवीधरवर यंदा कुणाचा झेंडा?

नागपूर पदवीधर मतदारसंघावर आजपर्यंत भाजपचं वर्चस्व राहिलं आहे. त्यामुळे भाजपसाठी ही प्रतिष्ठेची लढत झाली आहे. एकूण 19 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात असले, तरी या मतदारसंघात भाजप आणि काँग्रेस यांच्यातच थेट लढत आहे. भाजपने दिग्गज नेत्यांना प्रचाराच्या मैदानात उतरवत संदीप जोशी यांच्यासाठी संपूर्ण ताकद पणाला लावली आहे तर दुसरीकडे काँग्रेस उमेदवार अभिजित वंजारी यांच्यासाठीही शिवसेना-राष्ट्रवादी-काँग्रेस या तिन्ही पक्षांच्या महाविकास आघाडीने जोर लावला आहे. नव्याने तयार करण्यात आलेल्या मतदार याद्यांमुळे 28 टक्के मतदार घटले, याचा कुणाला फायदा होणार आणि कुणाला तोटा होणार? याकडेही सर्वांचं लक्ष लागलं आहे.

इतर बातम्या – 

‘भाजपचा अभिमान तोडायचा आहे’, नागपूर पदवीधर मतदारसंघ निवडणूक प्रचारात नितीन राऊतांचा हल्लाबोल

Special report | नागपूर पदवीधर निवडणुकीत कुणाचं पारडं जड? भाजप आपला गड राखणार?

(Nagpur graduate constituency election war between BJP and Congress)