भीमा कोरेगाव प्रकरणी शरद पवारांच्या उपस्थितीत काँग्रेस-राष्ट्रवादीच्या मंत्र्यांची बैठक

मुंबईतील वाय. बी. चव्हाण सेंटरमध्ये भीमा कोरेगावच्या मुद्द्यावर शरद पवारांची प्रमुख मंत्र्यांसोबत बैठक आयोजित करण्यात आली होती. (Bhima Koregaon Sharad Pawar)

भीमा कोरेगाव प्रकरणी शरद पवारांच्या उपस्थितीत काँग्रेस-राष्ट्रवादीच्या मंत्र्यांची बैठक

मुंबई : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या मंत्र्यांची बैठक झाली. भीमा कोरेगावच्या मुद्द्यावर चर्चेसाठी पवारांनी मंत्री आणि अधिकाऱ्यांना बोलावले होते. भीमा कोरेगाव आयोगाला मुदतवाढ मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. (NCP Congress Ministers Meeting on Bhima Koregaon in presence of Sharad Pawar)

मुंबईतील वाय. बी. चव्हाण सेंटरमध्ये शरद पवारांची प्रमुख मंत्र्यांसोबत बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला उपमुख्यमंत्री अजित पवार, गृहमंत्री अनिल देशमुख, जलसंपदा मंत्री जयंत पाटील, तर काँग्रेसकडून ऊर्जा मंत्री नितीन राऊत, शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड उपस्थित होत्या. गृह मंत्रालयाचे अतिरिक्त सचिव सीताराम कुंटे, प्रधान सचिव अमिताभ गुप्ताही उपस्थित होते.

याआधी शरद पवार यांनी मुंबईचे पोलीस आयुक्त परमवीर सिंह यांच्याशीही चर्चा केली होती. त्यांच्या भेटीचा तपशील गुलदस्त्यात आहे.

भीमा कोरेगाव प्रकरणाचा तपास चुकीच्या पद्धतीने झाला आणि निरपराध व्यक्तींना त्यात गुंतवण्यात आले, असा आरोप शरद पवार यांनी पूर्वी केला होता. भीमा कोरेगाव प्रकरणाचा तपास राष्ट्रीय तपास यंत्रणा (एनआयए) ला देण्यावरुन केंद्र आणि राज्य सरकारमध्ये वादाची ठिणगी पडली होती. त्यामुळे महाविकास आघाडी सरकार सत्तेत आल्यानंतर भीमा कोरेगाव प्रकरणाची एसआयटीमार्फत चौकशी व्हावी, अशी भूमिका शरद पवार यांनी घेतली होती.

भीमा कोरेगाव प्रकरणाचा तपास करण्यासाठी स्थापन केलेल्या आयोगाची मुदत एप्रिल महिन्यात संपली होती. त्यानंतर त्याला मुदतवाढ मिळाली, मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर त्याचे काम ठप्प होते. आता भीमा कोरेगाव आयोगाला तीन महिन्यांची मुदतवाढ मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

दरम्यान, शरद पवार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यात काल ‘वर्षा’ बंगल्यावर साधारण पाऊण तास चर्चा झाली होती. सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाबाबत दिलेला निर्णय, आयएएस आणि आयपीएस अधिकारी बदल्या यावर प्रामुख्याने चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली होती. कंगना रानौत या विषयावर शरद पवार यांनी जे मत व्यक्त केले, त्यामागील नेमकी भूमिका काय होती हे त्यांनी मुख्यमंत्र्यांना सांगितल्याचे समजते.

संबंधित बातम्या :

भीमा कोरेगाव प्रकरणात शरद पवारांना साक्षीसाठी बोलावणार

कोरेगाव-भीमा प्रकरणी माहिती लपवण्याचा केंद्राचा डाव, शरद पवारांचा पुनरुच्चार

(NCP Congress Ministers Meeting on Bhima Koregaon in presence of Sharad Pawar)

Published On - 1:11 pm, Thu, 10 September 20

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI