धनंजय मुंडेंच्या विजयातील मदतीची परतफेड, काँग्रेस नेत्याला राष्ट्रवादीच्या जागेवर विधान परिषद उमेदवारी

स्वतः शरद पवार यांनी धनंजय मुंडे यांना विधानसभेत मदत करणाऱ्या काँग्रेस नेत्याच्या मदतीची परतफेड केली आहे.

धनंजय मुंडेंच्या विजयातील मदतीची परतफेड, काँग्रेस नेत्याला राष्ट्रवादीच्या जागेवर विधान परिषद उमेदवारी
राजकारणाच्या अगदी सुरुवातीला भारतीय जनता पक्षाचे विद्यार्थी आघाडी प्रमुख म्हणून त्यांनी काम पाहिलं.

बीड : परळी विधानसभा निवडणुकीत धनंजय मुंडे यांच्या विजयाने पंकजा मुंडे यांना चेकमेट केलं. धनंजय मुंडे यांच्या या विजयामागे काँग्रेसचे संजय दौंड यांचा मोठा वाटा राहिला (NCP give MLC seat to Congress leader). त्यांनी धनंजय मुंडे यांना निवडून आणण्यासाठी चांगलीच ताकद लावली. आता स्वतः शरद पवार यांनी त्यांच्या याच मदतीची परतफेड केली आहे. दौंड यांना राष्ट्रवादी काँग्रेसच्या विधान परिषद जागेवरुन उमेदवार देण्यात आली आहे.

धनंजय मुंडे यांनी विधानसभा निवडणुकीतील विजयानंतर रिक्त झालेल्या विधान परिषदेच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला. त्यानंतर या रिक्त जागेवर काँग्रेसचे संजय पंडितराव दौंड यांना उमेदवारी मिळाली आहे. त्यामुळे परळीत भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्या राजकीय अडचणीत आता मोठी वाढ होण्याची शक्यता आहे.

संजय दौंड यांच्या रुपाने बीडला आणखी एक आमदार मिळणार आहे. त्यांच्या आमदारकीमुळे बीड परळी विधानसभा मतदारसंघातील राजकीय समीकरणे बदलू शकतात. माजी मंत्री पंकजा मुंडे यांचा परळीतून पराभव करण्यात संजय दौंड यांचा मोठा वाटा होता. आता दौंड विधान परिषदेवर आमदार म्हणून निवड झाल्यास बीडमध्ये पंकजा मुंडे यांच्या अडचणीत मोठी वाढ होईल, असं मत राजकीय विश्लेषक भागवत तावरे यांनी व्यक्त केलं आहे.

संजय दौंड 1990 पासून जिल्हा परिषदेसह स्थानिक राजकारणात सक्रिय आहेत. त्यांचे परळी विधानसभा मतदारसंघात ग्रामीण भागात मोठा जनसंपर्क आहे. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये त्यांनी राष्ट्रवादी-काँग्रेससोबत राहून धनंजय मुंडेंना मोठी मदत केली. सध्या त्यांच्या पत्नी काँग्रेसकडून जिल्हा परिषद सदस्य आहेत. पट्टी वडगाव गटात संजय दौंड यांचे विशेष प्राबल्य आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या मंत्रिमंडळात संजय दौंड यांचे वडील पंडितराव दौंड मंत्री होते. त्यामुळे जरी संजय दौंड काँग्रेसमध्ये असले तरी दौंड कुटुंबीय शरद पवार यांच्या निकटवर्ती मानले जातात.

गेली 11 वर्षे स्थानिक स्वराज्य संस्थांमधून विविध पदावर संजय दौंड यांनी काम केलं आहे. त्यामुळे परळी विधानसभा मतदारसंघातील धर्मापुरी आणि पट्टीवडगाव जिल्हा परिषद गटात संजय दौंड यांचा दांडगा जनसंपर्क आहे. मार्केट कमिटी सदस्य म्हणून संजय दौंड यांनी 5 वर्ष काम केलं आहे. याशिवाय त्यांच्या पत्नी आशाताई दौंड या 5 वर्ष जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्षा होत्या. आता दौंड विधान परिषदेवर आमदार म्हणून गेल्यास परळीला दोन आमदार मिळणार आहेत. आगामी निवडणुकांमध्ये यामुळे पंकजा मुंडे यांच्यासमोर कडवं आव्हान उभं राहिल. त्यामुळे पंकजा मुंडे यांची राजकीय वाट बिकट होईल, असंच चित्र निर्माण झालं आहे.

Published On - 10:40 pm, Tue, 14 January 20

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI