सचिनवर देशाचा विश्वास होता, पवार कुटुंबावर कुणाचाच नाही, निलेश राणेंचा रोहित पवारांवर हल्ला

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी शरद पवार यांच्यावर केलेल्या टीकेनंतर रोहित पवार यांनी चंद्रकांत दादांचा चांगलाच समाचार घेतला होता. त्यावरुन भाजप नेते निलेश राणे यांनी रोहित पवार यांना ट्विटरद्वारे जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 12:15 PM, 23 Nov 2020

मुंबई: भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर केलेल्या टीकेचा राष्ट्रवादीसह महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून जोरदार समाचार घेतला जात आहे. शरद पवार यांचे नातू आणि आमदार रोहित पवार यांनीही चंद्रकांत पाटील यांना सचिन तेंडुलकरची बॅटिंग आणि त्यावरील मित्राची प्रतिक्रिया याचं एक उदाहरण देत चिमटा काढला. त्यावर भाजप नेते निलेश राणे यांनी रोहित पवारांना ट्विटरद्वारे जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. (Nilesh Rane  on Rohit Pawar’s criticism of Chandrakant Patil)

“सचिनकडून एखादा बॉल सुटला तर पोटावरील पॅकेटमधून एकेक पॉपकॉर्न खात घरात पाय पसरुन टीव्हीवर मॅच पाहणाचा मित्र ओरडायचा… अर्रर्रर्र सचिनला खेळताच येत नाही!, पवारसाहेबांबाबत चंद्रकांत दादांनी केलेलं वक्तव्य ऐकून त्या मित्राचीच आठवण झाली आणि खूप हसूही आलं,” असं ट्वीट करत रोहित पवार यांनी चंद्रकांत पाटील यांच्यावर खोचक टीका केली होती.

रोहित पवार यांच्या टीकेला निलेश राणे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. “सचिनची तुलना कोणाबरोबर होऊ शकत नाही. सचिन आऊट जरी झाला तरी देशाला त्याच्यावरती विश्वास होता की जे काही करेल ते सचिनच करेल, देशाचं सोडा पण महाराष्ट्र मध्ये पण कोणालाही पवार कुटुंबावर विश्वास नाही. साखर कारखान्यांच्या पलीकडे ज्यांना महाराष्ट्र दिसत नाही त्यांनी बोलू नये,” असं ट्वीट निलेश राणे यांनी केलं आहे.

चंद्रकांत पाटलांवर राष्ट्रवादीचे नेते घसरले

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची अवस्था मानसिक संतुलन ढासळलेल्या मनोरुग्णासारखी झाली आहे. महाराष्ट्रातील सत्ता गेल्याने चंद्रकांत पाटील ते असे वक्तव्य करत आहेत. चंद्रकांत पाटील यांच्या डोक्यावर परिणाम झाल्यासारखं खुळ्यासारखं बडबडत आहेत, अशी घणाघाती टीका राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी केली.

चंद्रकांत पाटील यांच्यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही निशाणा साधला आहे. काही लोक काहीही बरळत आहेत. तोल गेल्यासारखं हे बरळणं सुरू आहे, असं सांगतानाच अशा लोकांना समाजात काही किंमत आहे का?, अशा शब्दात अजित पवार यांनी चंद्रकांत पाटील यांच्यावर टीका केली आहे.

चंद्रकांत पाटील काय म्हणाले होते?

राजकारणात येण्यापूर्वी शरद पवार मला खूप मोठे नेते वाटायचे. मात्र, राजकारणात आल्यावर ते खूप छोटे नेते असल्याचं दिसून आलं. त्यांचा अभ्यास नसतो, अशी टीका चंद्रकांत पाटील यांनी केली होती. तसेच विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस मात्र अभ्यासू नेते आहेत, असं पाटील म्हणाले होते. यानंतर राष्ट्रवादीच्या नेत्यांनी त्यांच्या या टीकेला प्रत्युत्तर दिलं होतं.

यानंतर चंद्रकांत पाटील यांनी त्यावर सारवासारव करत केलेल्या वक्तव्याबाबत स्पष्टीकरण दिलं, “मला पवार साहेबांबद्दल चुकीचं बोलायचं नव्हतं. पण तुम्ही मोदींवर, शाहांवर बोलता ते चालतं. देवेंद्र फडणवीस यांना टरबूज्या म्हणता ते चालतं, मला चंपा म्हणतात ते चालतं का?” असं चंद्रकांत पाटील म्हणाले.

संबंधित बातम्या:

काही लोक काहीही बरळत आहेत, त्यांना समाजात किंमत आहे का?; अजित पवारांची चंद्रकांतदादांवर खोचक टीका

चंद्रकांत पाटील यांच्या डोक्यावर परिणाम, सत्ता गेल्याने त्यांची अवस्था मनोरुग्णासारखी, हसन मुश्रीफ यांचा घणाघात

Nilesh Rane  on Rohit Pawar’s criticism of Chandrakant Patil