… त्या दिवशी सेनेचा विषय संपेल, पण नितेशची साथ मरेपर्यंत सोडणार नाही : निलेश राणे

... त्या दिवशी सेनेचा विषय संपेल, पण नितेशची साथ मरेपर्यंत सोडणार नाही : निलेश राणे

मुंबई : मीडियाने माझ्या ट्वीटचा गैर अर्थ काढला, नितेशची साथ मी मरेपर्यंत सोडणार नाही. पण ज्या दिवशी शिवसेना राणेसाहेबांची बदनामी थांबवेल, तेव्हा माझा आणि शिवसेनेचा विषय संपेल, अशी भूमिका माजी खासदार निलेश राणे (Nilesh Rane Clarification about Nitesh) यांनी घेतली आहे. आदित्य ठाकरेंच्या खांद्याला खांदा लावून काम करण्याची तयारी बंधू नितेश राणे यांनी दाखवली असतानाच निलेश राणे यांनी ट्विटरवरुन असहमती दर्शवली होती.

‘कालच्या माझ्या ट्विटचा मीडियाने गैर अर्थ काढला असून नितेशची साथ मी मरेपर्यंत सोडणार नाही. नितेशनी मला जे अधिकार दिले त्यातून मी त्याला समजवले. राहिला विषय शिवसेनेचा, ज्या दिवशी शिवसेना राणे साहेबांची बदनामी आणि त्रास देणे थांबवेल त्यादिवशी शिवसेनेचा आणि माझा विषय संपेल.’ असं ट्वीट निलेश राणेंनी केलं आहे.

आदित्य ठाकरे यांनी विधीमंडळात येण्याबाबत घेतलेला निर्णय स्वागतार्ह आहे. मी त्यांच्या खांद्याला खांदा लावून काम करण्यास तयार आहे, असं नितेश राणे यांनी एका मुलाखतीत म्हटलं होतं.

नितेश राणे हे कणकवली मतदारसंघातून भाजपतर्फे निवडणूक लढवत आहेत. विशेष म्हणजे महायुती असूनही शिवसेनेने केवळ नितेश राणे यांच्याविरोधात कणकवलीतून अधिकृत उमेदवार उभा केला आहे. सतीश सावंत यांना सेनेने तिकीट दिल्यामुळे शिवसेना-भाजपमध्येच चुरस निर्माण झाली आहे.

आदित्य ठाकरेंसोबत नितेश राणेंना काम करण्याची इच्छा, निलेश राणेंचाच विरोध

मतदानाला काही दिवस राहिले असतानाच नितेश राणेंनी मवाळ भूमिका घेतल्यामुळे शिवसेनेचा विरोधही निवळेल, अशी शक्यता वर्तवली जात होती.

नितेश राणेंच्या मुलाखतीनंतर, ‘नितेशच्या ह्या विषयाशी मी जराही सहमत नाही. ज्या पक्षाने राणे साहेबांना त्रास दिला, माझ्यासारख्या अनेक कार्यकर्त्यांनी सेनेशी दोन हात केले, केसेस घेतल्या, संघर्ष केला त्यांना हे कधीच सहन होणार नाही. राजकारण आपल्या ठिकाणी पण वार मी समोरूनच करणार.’ अशा शब्दात निलेश राणेंनी विरोध केला होता. त्यामुळे राणेबंधूंमध्ये मतभेद असल्याची चर्चा रंगली. परंतु आता निलेश राणे (Nilesh Rane Clarification about Nitesh) यांनी मीडियावर वक्तव्याचा विपर्यास केल्याचं खापर फोडलं.

नितेश राणे काय म्हणाले?

नितेश राणे यांनी वरळी मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांना मैत्रीचा हात पुढे केला. ‘राज्याच्या विकासासाठी आदित्य ठाकरेंना सहकार्य आणि त्यांच्यासोबत काम करण्यास मी तयार आहे. आदित्य यांची विधानसभेच्या पायऱ्यांवर भेट व्हावी अशी माझी इच्छा आहे. त्यांनी घेतलेली भूमिका अतिशय सकारात्मक आहे.’ असं नितेश राणे म्हणाले होते.

नारायण राणे यांचा महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष येत्या 15 ऑक्टोबर रोजी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये विलीन करण्यात येणार आहे. खुद्द नारायण राणे यांनी याविषयी माहिती दिली होती. काँग्रेसमधून बाहेर पडल्यानंतर नारायण राणे यांनी महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाची स्थापना केली. त्यानंतर राणे यांच्या भाजप प्रवेशाबाबत अनेक चर्चा सुरु होत्या.

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI