भाजपने स्वार्थ बाजूला ठेवत प्रज्ञा ठाकूरला पक्षातून काढावे : कैलाश सत्यार्थी

  • टीव्ही 9 मराठी, डिजीटल टीम
  • Published On - 21:00 PM, 18 May 2019

नवी दिल्ली : भाजपच्या भोपाळमधील लोकसभा उमेदवार आणि मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपी प्रज्ञा ठाकूरने राष्ट्रपिता महात्मा गांधींचा हत्यारा नथुराम गोडसेला देशभक्त म्हटल्यानंतर सर्वच स्तरातून तीव्र प्रतिक्रिया येत आहेत. नोबेल पुरस्कार विजेते कैलाश सत्यार्थी यांनी देखील प्रज्ञा ठाकूरच्या वक्तव्याचा निषेध केला. प्रज्ञा ठाकूरने हे वक्तव्य करुन गांधींच्या आत्म्याचीच हत्या केल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.

कैलाश सत्यर्थी यांनी याबाबत ट्विट करत आपले मत व्यक्त केले. ते म्हणाले, “गोडसेने गांधींच्या शरीराची हत्या केली होती. मात्र, प्रज्ञा ठाकूरसारखे लोक गांधींच्या आत्म्याची हत्या करत आहेत. ते गांधींच्या आत्म्यासह अहिंसा, शांती, सहिष्णुता या मुल्यांचीही हत्या करत आहेत. गांधीजी कोणत्याही सत्ता आणि राजकारणापेक्षा श्रेष्ठ आहेत. भाजपच्या नेतृत्वाने छोट्या फायद्याचा स्वार्थ सोडून तात्काळ ठाकूर यांना पक्षातून काढून टाकावे आणि राजधर्माचे पालन करावे.”

कैलाश सत्यार्थी ‘बचपन बचाओ आंदोलना’चे प्रमुख आहेत. या आंदोलनांतर्गत आतापर्यंत 87 हजारपेक्षा अधिक मुलांना बालमजूरी आणि मानवी तस्करीतून सोडवण्यात आले आहे. या कामासाठी त्यांना 2014 मध्ये जगातील सर्वात मोठा पुरस्कार नोबेलने सन्मानित करण्यात आले.

आगर मालवामध्ये निवडणूक प्रचारादरम्यान प्रज्ञा ठाकूर यांनी हे आक्षेपार्ह वक्तव्य केले होते.

“नथुराम गोडसे देशभक्त होते, आहेत, आहेत आणि राहतील. जे त्यांना दहशतवादी म्हणत आहे. त्यांनी आधी स्वतःला तपासावे. या निवडणुकीत नथुराम यांना दहशतवादी म्हणणाऱ्यांना जनता उत्तर देईल.”

– प्रज्ञा ठाकुर

या वक्तव्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही नाराजी व्यक्त करत प्रज्ञा ठाकूरला या वक्तव्यासाठी माफ करणार नाही, असे म्हटले होते. मात्र, कठोर कारवाईबाबत कोणतेही भाष्य करणे मोदींनी टाळले होते.

वक्तव्यानंतर चहुबाजूने टीकेची झोड उठल्यानंतर भाजपने त्यांच्या वक्तव्यापासून अंग झटकले आणि ते त्यांचे व्यक्तीगत मत असल्याचे म्हटले. तसेच ठाकूर यांना माफी मागण्यासही सांगण्यात आले. प्रज्ञा ठाकूरने माध्यमांसमोर येण्याऐवजी ट्विट करत माफी मागितली. ठाकूर म्हणाल्या, ‘मी देशातील जनतेची माफी मागते. माझे वक्तव्य चुकीचे होते. मी महात्मा गांधींचा खूप सन्मान करते.’