राहुल गांधींना धक्काबुक्की झालीच नाही, त्यांचा तोल गेला असावा : रावसाहेब दानवे

उत्तर प्रदेश पोलिसांनी राहुल गांधींसोबत केलेल्या वर्तनाबद्दल अनेकजण रोष व्यक्त करत असतानाच भाजप नेते रावसाहेब दानवे यांनी दावा केला आहे की, राहुल गांधींना कोणीही धक्काबुक्की केली नाही. त्यांचा तोल गेला असेल.

राहुल गांधींना धक्काबुक्की झालीच नाही, त्यांचा तोल गेला असावा : रावसाहेब दानवे

जालना : हाथरस सामूहिक बलात्कार प्रकरणातील पीडितेच्या कुटुंबीयांची भेट घेण्यासाठी गेलेल्या काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यासोबत उत्तर प्रदेश पोलिसांनी धक्काबुक्की केल्याची बातमी काल समोर आली होती. या घटनेवरुन मोठं राजकीय वादळ उठलं आहे. आतापर्यंत देशभरातील अनेक पक्षांनी, नेत्यांनी या घटनेचा निषेध व्यक्त केला आहे. आता या घटनेबाबत केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. (Nobody pushed Rahul Gandhi Says Raosaheb Danve)

दानवे म्हणाले की, राहुल गांधींना कोणीही धक्काबुक्की केली नाही. गर्दीतून जात असताना त्यांचा तोल गेला असावा. एवढ्या मोठ्या नेत्याला कोणीही धक्काबुक्की करु शकत नाही. अशा गर्दीत आम्हीदेखील अनेक वेळा जातो. पब्लिकचा रेटा असतो. तिथे नेत्यांच्या पुढे पुढे करणाऱ्यांची गर्दी असते, त्यामुळे कदाचित अस झालं असावं.

सर्व माध्यमांनी राहुल गांधींना पोलिसांनी धक्काबुक्की केल्याच्या बातम्या प्रसिद्ध केल्या आहेत. काँग्रेससह अनेक पक्षांच्या बड्या नेत्यांनी या घटनेबाबत संताप व्यक्त केला आहे. त्यातच रावासाहेब दानवे यांनी धक्काबुक्की झालीच नाही असा दावा केला आहे.

राहुल गांधींची कॉलर पकडून धक्काबुक्की म्हणजे लोकशाहीवरील गँगरेप : संजय राऊत 

या घटनेबाबत शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी संताप व्यक्त केला आहे. संजय राऊत म्हणाले की, “राज्यातील एका मुलीवर बलात्कार करुन तिचा खून करण्यात आला आहे. याबाबत विरोधी पक्षाने आवाज उठवायचा नाही, ही कुठली लोकशाही? जर कोणी आवाज उठवला तर तुम्ही त्याची कॉलर पकडून खाली पाडणार असाल तर हा या देशाच्या स्वातंत्र्यावरचा, इथल्या लोकशाहीवरचा सामूहिक बलात्कार आहे.”

राऊत म्हणाले की, “विरोधी पक्षाने बोलू नये, ही सरकारची भूमिका पूर्णपणे चुकीची आहे. आता या देशातील प्रमुख पक्षांनी, त्या पक्षांच्या प्रमुख नेत्यांनी जागं व्हायला पाहीजे. नाहीतर त्यांचीदेखील कॉलर पकडून त्यांना खाली पाडण्यात येईल. परंतु या देशाचं दुर्दैव आहे की, इथल्या प्रमुख नेत्यांना अद्याप जाग आलेली नाही.”

लोकशाही मूल्ये पायदळी : शरद पवार

गुरुवारी या घटनेनंतर राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनीदेखील ट्विटरद्वारे संताप व्यक्त केला. शरद पवारांनी त्यांच्या ट्वीटमध्ये म्हटलं आहे की, ”उत्तर प्रदेश पोलिसांनी राहुल गांधींसोबत केलेले वर्तन हे अत्यंत निंदनीय आहे. अशा पद्धतीने लोकशाही मूल्ये पायदळी तुडवली जात आहेत. कायदा हातात घेतला जातोय.”

सरकारच्या दडपशाहीचा खासदार सुप्रिया सुळेंकडून निषेध

राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनीदेखील याबाबत प्रतिक्रिया दिली. सुळे यांनी म्हटले की, त्या ठिकाणी यूपी सरकारकडून दडपशाही होणार असेल तर त्याचा मी जाहीर निषेध करते. पोलिसांनी न्याय्य मागणीसाठी जाणाऱ्या लोकप्रतिनिधी वा कुठल्याही व्यक्तीची कॉलर धरणं कितपत योग्य आहे?

संबंधित बातम्या

UP Police | राहुल गांधींना उत्तर प्रदेश पोलिसांची धक्काबुक्की; संतप्त कार्यकर्त्यांची पोलिसांविरोधात निदर्शने

Rahul Gandhi Hathras Live Update | “इंदिरा का पोता है, राजीव का बेटा है, न डरेगा और न ही रुकेगा”

(Nobody pushed Rahul Gandhi Says Raosaheb Danve)

Published On - 3:01 pm, Fri, 2 October 20

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI