’26 जूनच्या आंदोलनाच्या आगीत सरकार जळून जाईल’, ओबीसी आरक्षणावरुन सुधीर मुनगंटीवारांचा घणाघात

ठाकरे सरकारनं ओबीसी समाजावर अन्याय केलाय, तर मराठा आरक्षण देण्यातही हे सरकार फेल ठरलंय. 26 तारखेच्या आंदोलनात आम्ही प्रतिकात्मक शक्तीप्रदर्शन करणार आहोत. मात्र पुढे हे आंदोलन अधिक तीव्र होईल, असं मुनगंटीवार यांनी नागपुरात सांगितलं.

'26 जूनच्या आंदोलनाच्या आगीत सरकार जळून जाईल', ओबीसी आरक्षणावरुन सुधीर मुनगंटीवारांचा घणाघात
सुधीर मुनगंटीवार, भाजप नेते


नागपूर : ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरुन राज्यातील राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. त्यातच राज्य निवडणूक आयोगाने 5 जिल्हा परिषद आणि त्या अंतर्गत येणाऱ्या पंचायत समिती पोटनिवडणुकीची घोषणा करण्यात आली आहे. या विरोधात भाजपने 26 जून रोजी राज्यव्यापी आंदोनलाची घोषणा करण्यात आली आहे. या आंदोलनाच्या आगीत राज्यातील महाविकास आघाडी सरकार जळून जाईल असा घणाघात भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी केलाय. ठाकरे सरकारनं ओबीसी समाजावर अन्याय केलाय, तर मराठा आरक्षण देण्यातही हे सरकार फेल ठरलंय. 26 तारखेच्या आंदोलनात आम्ही प्रतिकात्मक शक्तीप्रदर्शन करणार आहोत. मात्र पुढे हे आंदोलन अधिक तीव्र होईल, असं मुनगंटीवार यांनी नागपुरात सांगितलं. (Sudhir Mungantiwar aggressive on OBC reservation issue)

महाराष्ट्र सरकार गेल्या 2 वर्षात कोमात असल्याप्रमाणे वागत आहे. ओबीसी आरक्षण टिकवण्यात हे सरकार अपयशी ठरलं. हे सरकार कुंभकर्णापेक्षाही मोठी झोप घेत आहे, अशी टीका मुनगंटीवार यांनी केलीय. जिल्हा परिषद आणि पंचायत समिती पोटनिवडणूक घेऊ नये म्हणून 26 जूनला राज्यभरात चक्काजाम आंदोलन करण्यात येणार असल्याचंही त्यांनी सांगितलं. इम्पेरिकल डेटासाठी केंद्राकडे बोट दाखवलं जातं. पण मागासवर्गीय आयोग स्थापन करण्यास उशीर का झाला? असा सवालही मुनगंटीवार यांनी केलाय. सरकारचं पितळ उघडं पडू नये म्हणून फक्त दोन दिवसाचं अधिवेशन ठेवण्यात आलं असल्याची टीकाही त्यांनी केलीय.

‘त्या’ जागांवर फक्त ओबीसी उमेदवार देणार – फडणवीस

देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात भाजपच्या शिष्टमंडळाने आज राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली. त्यावेळी त्यांनी राज्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समिती पोटनिवडणुकीच्या मुद्द्यावरुन आक्रमक पवित्रा घेतल्याचं दिसून आलं. ओबीसी आरक्षणाचा मुद्दा निकाली निघाल्याशिवाय राज्यात कोणत्याही निवडणुका होऊ देणार नाही, अशी भूमिका भाजप नेत्यांनी यापूर्वीच व्यक्त केली आहे. त्यानंतर मंत्री विजय वडेट्टीवार यांनीही ओबीसीचा मुद्दा सुटल्याशिवाय निवडणुका होणार नाहीत असं जाहीर केलं होतं. मात्र, वडेट्टीवार यांनी घोषणा केल्याच्या दुसऱ्याच दिवशी राज्य निवडणूक आयोगाने राज्यातील 5 जिल्हा परिषद आणि 33 पंचायत समिती निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला. या मुद्द्यावर आता भाजप अधिक आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे.

‘..मग जिंकलो किंवा हरलो तरी पर्वा नाही’

जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका घोषित झाल्या आहे. यात एकही जागा ओबीसींकरता राखीव राहणार नाहीत. आम्ही राज्यपालांकडे या निवडणुका पुढे ढकलण्याची मागणी केली आहे. आम्ही हा निर्णय केलाय की याबाबत आम्ही आंदोलन करणार आहोतच. पण सरकारचा डाव असेल की निवडणुका घ्यायच्याच. तर आम्ही या सर्व जागावर फक्त ओबीसी उमेदवार देऊ. मग जिंकलो किंवा हरलो तरी आम्हाला पर्वा नाही. त्या जागा ओबीसींसाठी आरक्षित आहेत असं समजूनच आम्ही त्या निवडणुका लढवू, अशी आक्रमक भूमिका फडणवीस यांनी स्पष्ट केलीय.

संबंधित बातम्या :

केंद्राच्या भूमिकेमुळे ओबीसींचे नुकसान; निवडणुका पुढे ढकलण्याच्या निर्णयावर ठाम : छगन भुजबळ

OBC Reservation : जिल्हा परिषद आणि पंचायत समिती पोटनिवडणुकीविरोधात न्यायालयात जाणार – पंकजा मुंडे

Sudhir Mungantiwar aggressive on OBC reservation issue

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI