Osmanabad Lok sabha result 2019 : उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघ निकाल

Osmanabad Lok sabha result 2019 : उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघ निकाल

उस्मानाबाद : उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघात शिवसेना -भाजप युतीचे उमेदवार ओमराजे निंबाळकर विजयी झाले. उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघासाठी दुसऱ्या टप्प्यात 19 एप्रिल 2019 रोजी मतदान झालं. उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघात काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीचे उमेदवार राणा जगजितसिंह पाटील आणि शिवसेना भाजप युतीचे उमेदवार ओमराजे निंबाळकर यांच्यात सरळ लढत पाहायला मिळाली असली, तरी वंचित बहुजन विकास आघाडीचे उमेदवार अर्जुन सलगर यांनीही कडवी झुंज दिली. 2019 मध्ये 63.42 टक्के इतके मतदान झाले असून, इथे 14 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत.

2019 च्या लोकसभेसाठी 18 लाख 86 हजार 238 मतदारापैकी 11 लाख 96 हजार 166 मतदारांनी 2 हजार 127 मतदान केंद्रावर मतदानाचा हक्क बजावला. 2014 मध्ये लोकसभेसाठी 64.41 टक्के मतदान झाले होते. यंदा मतदानात 0.99 टक्के घट झाली असली, तरी 2019 मध्ये मतदार संख्या वाढल्याने 80 हजार 175 इतके मतदान जास्त झाले आहे.

वाढलेले मतदान कुणाच्या पारड्यात आणि पथ्यावर पडते यावरच निवडणुकीचा निकाल अवलंबून आहे. उस्मानाबाद लोकसभेसाठी २००९ मध्ये ५४.४७ टक्के, २०१४ मध्ये ६४.४१ टक्के तर २०१९ मध्ये ६३.४२ टक्के मतदान झाले.

२०१४ मध्ये ११ लाख १५ हजार ९९१ इतके मतदान झाले असून २०१९ मध्ये ११ लाख ९६ हजार १६६ इतक्या मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. २०१४ च्या तुलनेत ८० हजार १७५ इतके मतदान जास्त झाले आहे.

पक्षउमेदवारनिकाल
भाजप/शिवसेनाओमराजे निंबाळकर (शिवसेना)विजयी
काँग्रेस/ राष्ट्रवादीराणा जगजितसिंह पाटील (राष्ट्रवादी)
अपक्ष/इतरअर्जुन सलगर (VBA)

जुना संघर्ष, नवी लढत

उस्मानाबाद लोकसभेत डॉ पदमसिंह पाटील आणि दिवंगत पवनराजे निंबाळकर या परिवारातील सत्तासंघर्ष पाहायला मिळाला. डॉ पदमसिंह पाटील यांचे पुत्र आमदार राणाजगजितसिंह पाटील राष्ट्रवादीकडून तर पवनराजे निंबाळकर यांचे पुत्र ओमराजे निंबाळकर हे शिवसेनेकडून लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उभे ठाकले. 

निवडणुकीतील मुद्दे

उस्मानाबाद लोकसभा निवडणुकीत पवनराजे निंबाळकर हत्याकांड, तेरणा ट्रस्टसह तेरणा साखर कारखाना, उस्मानाबाद जिल्ह्यातील बंद पडलेले साखर कारखाने, सहकारी संस्था, सोलापूर-तुळजापूर रेल्वे मार्ग, २१ टीएमसी पाणी, कायम दुष्काळ, डॉ पाटील परिवाराची 40 वर्षाची घराणेशाही, राष्ट्रवादीचे उमेदवार राणा पाटील यांचे पाच वर्षात 56 पटीने वाढलेले उत्पन्न, उद्योग आणि रोजगाराचे मुद्दे चांगलेच चर्चिले गेले.

कार्टून वॉर, व्हायरल क्लीप

पवनराजे निंबाळकर यांच्यावरील दूधवाला कार्टून नंतर शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यात कार्टून वॉर चांगलेच रंगले. राष्ट्रवादीचे डॉ पाटील यांच्या घराणेशाहीसह त्यांनी लुटलेल्या तेरणा ट्रस्टच्या कारभारावर ठग्स ऑफ उस्मानाबाद या कार्टून सीरिजने निवडणूक रंगात आली. शिवसेनेचे उमेदवार ओमराजे यांची त्यांच्या पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांबाबत केलेल्या शिवराळ भाषेची व्हायरल क्लिपच्या मुद्यासह दिलीप ढवळे शेतकरी आत्महत्या प्रकरण, शिवसेनेचे विद्यमान खासदार रवींद्र गायकवाड यांनी शिवसेनेचे उमेदवार ओमराजे निंबाळकर यांच्यावर दाखल केलेला गुन्हा हे विषय गाजले.

पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी जाहीर सभेत शिवसेनेचे खासदार रवींद्र गायकवाड आणि त्यांचा मुलगा किरण याची जबाबदारी घेतल्याचे जाहीर केले, तरी रवींद्र गायकवाड यांनी गटबाजी करीत शेवटपर्यंत शिवसेनेला साथ दिली नाही. तसेच मतदानाच्या दिवशी घड्याळला मतदान करा या मुद्यावर त्यांना शिवसैनिकांनी केलेली धक्काबुक्की सूचक होती.

उस्मानाबाद जिल्हा परिषदेसह अनेक स्थानिक स्वराज संस्थेत राष्ट्रवादी भाजप, काँग्रेस शिवसेना अशी युती असली तरी लोकसभेच्या निवडणुकीत या सर्वच राजकीय पक्षांनी युती आणि आघाडीचा धर्म पहिल्यांदाच पाळला असल्याचे पाहावयाला मिळाले. राष्ट्रवादीच्या घड्याळला काँग्रेसच्या हाताने या निवडणुकीत चांगली साथ दिली. तर मोदी यांना पंतप्रधान करण्यासाठी सेना-भाजपने कंबर कसल्याचे दिसले. शिवसेनेला अंतर्गत गटबाजी तर राष्ट्रवादीला घराणेशाहीच्या नाराजीला सामोरे जावे लागले.

महत्त्वाच्या सभा

शिवसेना भाजप युतीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मंत्री पंकजा मुंडे, आमदार नीलम गोऱ्हे यांनी प्रचारसभा घेतल्या. तर काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीची शरद पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, धनंजय मुंडे, जितेंद्र आव्हाड, हर्षवर्धन पाटील यांनी प्रचार केला.

वंचित बहुजन विकास आघाडीची प्रकाश उर्फ बाळासाहेब आंबेडकर आणि आमदार इम्तियाज जलील यांनी सभा घेत निवडणुकीत रंग आणला. वंचित आघाडीच्या सभेला आणि उमेदवाराला चांगला प्रतिसाद मिळाल्याचे चित्र दिसल्याने, वंचित आघाडीवर विजयाचे गणित अवलंबून आहे.

उस्मानाबाद लोकसभा मतदार संघासाठी काटे की टक्कर पाहायला मिळाली. सुरुवातीला प्रचारात राष्ट्रवादीचे राणा पाटील यांनी आघाडी घेतली होती, मात्र शिवसेनेचे उपनेते तानाजीराव सावंत आणि भाजप आमदार सुजितसिंह ठाकूर यांच्या नियोजनाने ओमराजे यांनी कडवी झुंज दिली. काँग्रेस आमदार मधुकर चव्हाण आणि बसवराज पाटील यांच्या भरवशावर राष्ट्रवादी निश्चिंत आहे.

 उस्मानाबाद लोकसभा – विधानसभानिहाय मतदान

विधानसभा        2014 मतदान%             2019 मतदान %

औसा                        ६५.८५                         ६४.२४

उमरगा                     ६२.८८                         ६०.४३

तुळजापूर                 ६५.१०                           ६४.७५

उस्मानाबाद               ६५.७२                          ६४.७९

परंडा                       ६४.३६                         ६३.८५

बार्शी                         ६२.४३                             ६१.९९

एकूण                      ६४.४१                      ६३.४२

2009 च्या लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीचे डॉ पद्मसिंह पाटील हे केवळ ६ हजार ७८७ मतांनी निवडून आले होते. डॉ पाटील यांना ४ लाख ८ हजार ८४० तर रवींद्र गायकवाड यांना ४ लाख २ हजार ५३ मते पडली. पद्मसिंह पाटील यांना ४४.२२ टक्के तर रवींद्र गायकवाड यांना ४३.४९ टक्के मते पडली.

२०१४ च्या निवडणुकीत शिवसेनेचे रवींद्र गायकवाड यांनी डॉ पदमसिंह पाटील यांचा २ लाख ३५ हजार ३२५ मतांनी दारुण पराभव केला. रवींद्र गायकवाड यांना ६ लाख ७ हजार ६९९ मते तर पद्मसिंह पाटील यांना ३ लाख ७३ हजार ३७४ मते पडली. पदमसिंह पाटील यांना 33 टक्के तर रवींद्र गायकवाड यांना 54 टक्के मते पडली.

२०१९ च्या लोकसभा निवडणुकीत शिवसेना आणि राष्ट्रवादी यांच्यात काट्याची टक्कर पाहायला मिळाली आहे.

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI