पराभव साजरा करायलाही नशीब लागतं; पंकजाताईंकडून धनंजय मुंडेंना चोख प्रत्युत्तर

पराभव साजरा करण्यात काय गैर आहे? मी पराभव खिलाडूवृत्तीने स्वीकारला. | Pankaja Munde

पराभव साजरा करायलाही नशीब लागतं; पंकजाताईंकडून धनंजय मुंडेंना चोख प्रत्युत्तर

पुणे: काहीजण पराभवाच्या वर्षपूर्तीसाठी जिल्ह्यात येतात, या धनंजय मुंडे यांच्या खोचक टीकेला मंगळवारी पंकजा मुंडे यांनी प्रत्युत्तर दिले. पराभव साजरा करण्यात काय गैर आहे? मी पराभव खिलाडूवृत्तीने स्वीकारला. इतके दिवस मी घरात राहिले तर घरात का बसलात, असा प्रश्न विचारला जायचा आणि आता बाहेर पडले तर पराभव साजरा करायला बाहेर आल्या, अशी टीका माझ्यावर होते. परंतु, पराभव साजरा करायलाही नशीब लागते, अशा शब्दांत पंकजा मुंडे यांनी धनंजय मुंडे यांच्या टीकेला प्रत्युत्तर दिले. (Pankaja Munde hits back over Dhananjay Munde comment)

धनंजय मुंडे यांनी सोमवारी बीडमधील एका कार्यक्रमात पंकजा मुंडे यांना टोला लगावला होता. काहीजण पराभवाच्या वर्षपूर्तीसाठीच जिल्ह्यात येतात. एरवी जिल्ह्यातील लोकांकडे बघायला त्यांना वेळ नसतो, असे धनंजय मुंडे यांनी म्हटले होते. गेल्यावर्षीच्या विधानसभा निवडणुकीत परळी मतदारसंघातील लढतीत धनंजय मुंडे यांनी पंकजा यांचा पराभव केला होता. तेव्हापासून पंकजा मुंडे या बीडमध्ये फारशा फिरकल्या नव्हत्या. अखेर अतिवृष्टीग्रस्त भागाच्या दौऱ्याच्यानिमित्ताने पंकजा मुंडे यांना तब्बल आठ महिन्यानंतर बीड जिल्ह्यात येण्याचा मुहूर्त सापडला होता. हाच धागा पकडत धनंजय मुंडे यांनी बीडमधील एका कार्यक्रमात पंकजा यांना टोला लगावला होता.

पंकजा मुंडे यांनी मंगळवारी पुण्यात प्रसारमाध्यमांशी बोलताना यावर भाष्य केले. एखादी पराभूत व्यक्ती नांदेडपासून आठ जिल्ह्यांमध्ये स्वागत सत्कार घेतल्यानंतर मोठा मेळावा घेत असेल तर ही पुण्याईच म्हणावी लागेल. अशाप्रकारे पराभव साजरा करायचं नशीब कुणाला लाभतं, असे पंकजा मुंडे यांनी म्हटले.

ऊसतोड कामगारांच्या संपाचा तिढा सोडवण्यासाठी पुण्याच्या वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटमध्ये आयोजित करण्यात आलेल्या बैठकीच्यानिमित्ताने पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे एकत्र आले होते. या बैठकीनंतर दोन्ही नेत्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी धनंजय मुंडे यांना पंकजा यांच्याशी संवाद साधला का, अशी विचारणा करण्यात आली. तेव्हा धनंजय मुंडे यांनी, ‘एखाद्या प्रश्नावर प्रामाणिकपणे काम करण्याची इच्छा असेल तर संवाद झाला तर काय वाईट आहे’, असे उत्तर दिले. पंकजा मुंडे यांनीही जनतेच्या प्रश्नावर एकत्र येण्यात काही वावगे नसल्याचे सांगितले. परंतु, याचा अर्थ मागचं सगळं मिटल असाही नाही, असेही सांगायला पंकजा मुंडे विसरल्या नाहीत.

संबंधित बातम्या:

काहीजण पराभवाच्या वर्षपूर्तीसाठी बीडमध्ये येऊन गेले; धनंजय मुंडेंचा पंकजाताईंना टोला

गोपीनाथ मुंडे ऊसतोड कामगार कल्याण महामंडळाला बळकटी मिळणार : धनंजय मुंडे

(Pankaja Munde hits back over Dhananjay Munde comment)

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI