राष्ट्रवादीतील अंतर्गत वाद पेटला, आदिती तटकरेंचे बॅनर हटवले, ‘राष्ट्रवादी बचाव’च्या घोषणा

सतीश पाटील हटाव, पनवेल राष्ट्रवादी बचाव, अशी आक्रमक भूमिका कार्यकर्त्यांनी शनिवारी खारघर येथे आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत घेतली (Panvel NCP Aditi Tatakare poster )

राष्ट्रवादीतील अंतर्गत वाद पेटला, आदिती तटकरेंचे बॅनर हटवले, 'राष्ट्रवादी बचाव'च्या घोषणा
राष्ट्रवादीच्या ओबीसी सेलची घोषणाबाजी

नवी मुंबई : पनवेल राष्ट्रवादी काँग्रेसमधील अंतर्गत वादाला जोरदार सुरुंग लागला असून गटातटाचे राजकारण उफाळून आले आहे. खारघर शहर अध्यक्ष पदावरुन सुरू झालेला वादंग आता पनवेलमधील अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या राजीनाम्यापर्यंत पोहोचला आहे. राष्ट्रवादी पनवेल शहर जिल्हा अध्यक्ष सतीश पाटील यांच्याविरोधात कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. इतकंच नाही, तर रायगडच्या पालकमंत्री आदिती तटकरे यांचे बॅनर कार्यालयावरील हटवले गेले. (Panvel NCP Volunteers protest Aditi Tatakare poster removed)

सतीश पाटील हटाव, पनवेल राष्ट्रवादी बचाव, अशी आक्रमक भूमिका कार्यकर्त्यांनी शनिवारी खारघर येथे आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत घेतली. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि खासदार सुनील तटकरे, पालकमंत्री अदिती तटकरे आणि रायगड जिल्हा अध्यक्ष सुरेश लाड यांनी याबाबत गंभीरपणे दखल घेऊन योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी यावेळी पत्रकार परिषदेत करण्यात आली. अन्यथा, पनवेलमधील सुमारे 250 हून अधिक पदाधिकारी आणि कार्यकर्ते पदाचा तसेच सदस्यत्वाचा राजीनामा देऊ, अशी भूमिका देखील मांडण्यात आली.

खारघर येथे आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेला राष्ट्रवादी काँग्रेस ओबीसी सेल पनवेल शहर-जिल्हा कार्याध्यक्ष राजूभाई मुलानी, पनवेल शहर जिल्हा ओबीसी सेलचे अध्यक्ष विजय मयेकर, पनवेल शहर जिल्हा उपाध्यक्ष जसविंदर सिंग, उपाध्यक्ष सचिन गावडे, खारघर शहर अध्यक्ष ओबीसी सेल नरेश पाटील, उपाध्यक्ष कल्पेश मयेकर, राष्ट्रवादी कांग्रेस सोशल मीडिया रायगड जिल्हा सदस्य मयूर जगताप, कैलास पाटील, लहू पाटील, तसेच कामोठे आणि खारघर येथील राष्ट्रवादीचे माजी पदाधिकारी आणि सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.

“सतीश पाटील निष्क्रिय अध्यक्ष”

राष्ट्रवादी काँग्रेसचे पनवेल शहर जिल्हा ओबीसी सेलचे अध्यक्ष विजय मयेकर यांचे केलेले निलंबन नियमबाह्य असून निलंबन रद्द करावे, अशी मागणी यावेळी कार्याध्यक्ष राजुभाई मुलानी यावेळी पत्रकार परिषदेत केली. सतीश पाटील हे पनवेलला मिळालेले निष्क्रिय अध्यक्ष असून त्यांनी आतापर्यंत फक्त गटातटाच्या राजकारणाला खतपाणी घातले असून त्यामुळे पक्षाची वाढ झाली नसल्याची भूमिका राजूभाई मुलानी यावेळी व्यक्त केली.

“सतीश पाटील यांची दुटप्पी भूमिका”

पनवेल अध्यक्ष सतीश पाटील यांनी खारघरला सुरेश राजवण आणि बळीराम नेटके हे दोन अध्यक्ष देऊन कार्यकर्त्यांमध्ये गट निर्माण करायला खतपाणी घातले. सतीश पाटील यांची दुटप्पी भूमिका पक्षाला घातक ठरत असल्याने पक्षाच्या वरिष्ठांकडे तक्रार करण्याची आम्ही भूमिका घेतली. मात्र, वरिष्ठांनी याबाबत काहीही न विचारता थेट निलंबनाची नोटीस पाठवणे दुर्दैवाचे असल्याची भूमिका यावेळी विजय मयेकर यांनी मांडली.

पनवेल शहर जिल्हा अध्यक्ष सतीश पाटील यांनी खारघर मधील दोन्ही अध्यक्षांना स्थगिती दिली असून कार्यकारिणी बरखास्त आहे. ओबीसी सेलचे निलंबित पनवेल अध्यक्ष विजय मयेकर यांच्या बाजूने अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते एकवटले आहेत. राष्ट्रवादीत उफाळलेल्या वादाकडे राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्यांनी जर वेळीच गांभीर्याने लक्ष दिले नाही तर पनवेलमध्ये राष्ट्रवादीला मोठे नुकसान सहन करावे लागेल, असे चित्र दिसत आहे.

मतभेद दूर करा, सुरेश लाड यांचे आवाहन

दरम्यान, पनवेलमध्ये राष्ट्रवादी पक्ष वाढीसाठी संघटनात्मक ऐक्य गरजेचे आहे. पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी कोणतेही मतभेद ठेवू नये. पक्षाचे नुकसान होईल अशी भूमिका कोणत्याही पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी घेऊन नये. सध्या कोरोनाची परिस्थिती असल्याने बैठक घेत नाही, मात्र, लवकरच सर्वांना एकत्र बसवून योग्य तो निर्णय घेऊ, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे रायगड जिल्हाध्यक्ष आणि माजी आमदार सुरेश लाड यांनी व्यक्त केली आहे.

खारघर राष्ट्रवादीला लवकरच अध्यक्ष

तर, राष्ट्रवादी वाढवण्यासाठी मी निष्ठेने काम करत आहे. खारघर शहरातील दोन्ही अध्यक्षांना स्थगिती दिली असून अकरा जणांची एक कोअर कमिटी नेमण्यात आली आहे. लवकरच खारघर शहराला सक्षम अध्यक्ष देण्यात येईल. विजय मयेकर यांनी पक्षविरोधी कारवाई केल्याने राष्ट्रवादी ओबीसी सेलचे प्रदेशाध्यक्ष ईश्वर बाळबुधे यांनी त्यांच्यावर निलंबनाची कारवाई केल्याची प्रतिक्रिया पनवेल शहर जिल्हाध्यक्ष सतीश पाटील यांनी व्यक्त केली.

संबंधित बातम्या :

राष्ट्रवादीकडून रायगड अध्यक्षाची उचलबांगडी, तटकरेंचा विश्वासू जिल्हाध्यक्षपदी

(Panvel NCP Volunteers protest Aditi Tatakare poster removed)

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI