राणे-सेना राड्यानंतर आमदार प्रसाद लाड यांना जीवे मारण्याची धमकी, लाड म्हणतात, ‘घाबरत नाही, जशास तसं उत्तर देईन!’
केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि शिवसेनेत काल झालेल्या राड्यानंतर भाजप आमदार प्रसाद लाड यांना धमकीचे फोन आलेले आहेत. अज्ञात नंबरवरुन जीवे मारण्याची धमकी देण्यात आली, असं भाजप आमदार प्रसाद लाड यांनी टीव्ही 9 मराठीशी बोलताना सांगितलं.

मुंबई : केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) आणि शिवसेनेत काल झालेल्या राड्यानंतर भाजप आमदार प्रसाद लाड यांना धमकीचे फोन आलेले आहेत. अज्ञात नंबरवरुन जीवे मारण्याची धमकी देण्यात आली, असं भाजप आमदार प्रसाद लाड यांनी टीव्ही 9 मराठीशी बोलताना सांगितलं. मुंबईच्या सायन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करणार असल्याचं देखील प्रसाद लाड यांनी सांगितलं आहे. तसंच असल्या धमक्यांना मी घाबरत नाही, जशास तसं उत्तर देण्यास तयार असल्याचं लाड म्हणाले.
केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना काल नाट्यमयरित्या अटक करण्यात आली तसंच रात्री उशिरा त्यांना जामीनही मिळाला. हे सगळं होत असताना भाजप आमदार प्रसाद लाड त्यांच्यासोबत होते. पोलिसांनी नारायण राणे यांच्यासोबत असभ्य वर्तन केलं, तसंच त्यांचं जेवणाचं ताट हिसकावून घेतलं, असा आरोप करत लाड यांनी खळबळ उडवून दिली. एकंदरित प्रसाद लाड काल राणेंसोबत प्रत्येक क्षणी हजर होते. यानंतर जेव्हा उशीरा राणेंना जामीन मिळाला आणि राणे महाडवरुन मुंबईकडे निघाले तेव्हा प्रसाद लाड यांना धमकीचे फोन यायला सुरुवात झाली, असा आरोप लाड यांनी केला आहे.
प्रसाद लाड काय म्हणाले…?
“रात्री 2 वाजून 51 मिनिटांपासून मला धमकीचे फोन यायला सुरु झाले, जे अद्याप चालू आहेत. मला एक नाहीतर मला अनेक धमकीचे फोन आलेले आहेत. अज्ञात नंबरवरुन हे फोन येत आहेत. फोनमधील व्यक्ती अर्वाच्या भाषेत शिवीगाळ करुन मला जीवे मारण्याची धमकी देत आहेत. वाईट पद्धतीने मेसेज टाकत आहेत.”
“मी आताच सायन पोलिस स्टेशनच्या वरिष्ठ पोलिस निरीक्षकांसोबत बोललो. मी त्यांना पत्र लिहिलं आहे. तसंच महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना आणि गृहमंत्र्यांना देखील याविषयी मी पत्र लिहिणार आहे आणि हा सगळा विषय त्यांना अवगत करणार आहे.”
“काही दिवसांपूर्वी मला सचिन वाझेकरवी सुपारी होती. सचिन वाझेकडे अग्रवाल नावाच्या व्यक्तीने तशा पद्धतीचं स्टेटमेंट दिलं होतं. त्यामुळे माझ्या जीवाला सातत्याने धोका वाढतोय. पण अशा धमक्यांना मी एक तरुण म्हणून, मराठी आमदार म्हणून मी भीक घालत नाही. अशा धमक्यांना मी जशास तसं उत्तर देईन”, असं प्रसाद लाड म्हणाले.
(Phone threat to MLC Prasad Lad After Shivsena Narayan Rane Controvercy)
हे ही वाचा :
VIDEO | नारायण राणेंना जामीन मिळाल्यानंतर देवेंद्र फडणवीसांचा फोन, म्हणाले “भाजप पक्ष…”
फुग्याला भोक तुमच्या पडलं, आमच्या नाही; चंद्रकांत पाटील यांचा शिवसेनेवर पलटवार
VIDEO : शिवसेनेचे नरेश म्हस्के खरंच म्हणाले का, नारायण राणे अंगार है?
