भाजपनं तिकीट नाकारलं, भाजपच्याच मातब्बर प्रतिस्पर्ध्याचा पराभव करत विधानसभेत; आमदार गीता जैन यांचा राजकीय प्रवास

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: |

Updated on: Aug 10, 2021 | 9:32 AM

गीता जैन या माजी खासदार मिठालाल जैन यांच्या स्नुषा आहेत. मिठालाल जैन हे तत्कालीन मोठं प्रस्थ मानलं जातं. मिरा-भाईंदर शहराला पाणी मिळवून देणारा नेता अशी मिठालाल जैन यांची आजही ओळख आहे. अशा मोठा राजकीय वारसा लाभलेल्या घरात सून म्हणून आल्यानंतर गीता जैन यांच्या राजकीय प्रवासाला सुरुवात झाली.

भाजपनं तिकीट नाकारलं, भाजपच्याच मातब्बर प्रतिस्पर्ध्याचा पराभव करत विधानसभेत; आमदार गीता जैन यांचा राजकीय प्रवास
आमदार गीता जैन, मिरा-भाईंदर

सागर जोशी, टीव्ही 9 मराठी, मुंबई : मिरा भाईंदर महापालिकेच्या महापौर राहिलेल्या गीता जैन यांनी 2019 च्या विधानसभा निवडणुकीत भाजपकडून निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली होती. मात्र, माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय मानले जाणारे नरेंद्र मेहता यांना भाजपनं निवडणूक रिंगणात उतरलं. जैन यांनी अपक्ष निवडणूक लढवत नरेंद्र मेहता यांचा पराभव केला. या विजयानंतर गीता जैन चांगल्याच चर्चेत आल्या. गीता जैन यांच्या राजकीय प्रवासाचा घेतलेला हा आढावा… (Political journey of MLA Geeta Jain of Mira Bhayander Assembly constituency)

गीता जैन या माजी खासदार मिठालाल जैन यांच्या स्नुषा आहेत. मिठालाल जैन हे तत्कालीन मोठं प्रस्थ मानलं जातं. मिरा-भाईंदर शहराला पाणी मिळवून देणारा नेता अशी मिठालाल जैन यांची आजही ओळख आहे. अशा मोठा राजकीय वारसा लाभलेल्या घरात सून म्हणून आल्यानंतर गीता जैन यांच्या राजकीय प्रवासाला सुरुवात झाली. गीता जैन यांचं महाविद्यालयीन शिक्षण अंधेरी आणि सांताक्रुझमध्ये झालं. त्यांनी पॉलिटेक्निकचा डिल्पोला केला आहे. त्याचबरोबर 1982 साली DMLT ही पदवी मिळवली.

सासरे मिठालाल जैन यांच्याकडून प्रेरणा

1984 साली भरत जैन यांच्याशी विवाह झाल्यानंतर गीता जैन यांची राजकीय वाटचाल सुरु झाली. सासरे मिठालाल जैन यांच्या राजकीय कार्यानं प्रेरित होऊन त्यांनी 2002 मध्ये पहिल्यांदा मिरा भाईंदर महापालिका निवडणूक लढवली आणि नगसेवक म्हणून त्यांनी महापालिकेत प्रवेश मिळवला. त्यानंतर त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. पुढे 2012 मध्ये त्या पुन्हा एकदा नगरसेवक म्हणून निवडून आल्या. 2015 मध्ये त्यांनी मिरा-भाईंदर महापालिकेचा महापौर होण्याचा मान मिळाला. त्यानंतर 2017 च्या निवडणुकीत त्या पुन्हा एकदा सर्वाधिक मतांनी नगरसेवक म्हणून निवडून आल्या. 2017 ला महापालिका निवडणुकीत निवडून आल्यावर त्यांना महापौर पदापासून दूर ठेवण्यात आलं. कारण त्या महापौर पदावर असताना स्थानिक नगरसेवक, तत्कालीन आमदार यांना त्यांचा कार्यभाग साधणं कठीण जात होतं. त्यामुळे तात्कालीन आमदाराने स्वतः च्या भावाच्या पत्नी यांना महापौर केले होते.

2019 च्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी भाजपकडे तिकीटाची मागणी केली. मात्र, देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय असलेल्या नरेंद्र मेहता यांना संधी मिळाली. शेवटी गीता जैन यांनीही निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला. त्यांनी अपक्ष उपमेदवारी अर्ज दाखल केला. जोरदार प्रचार आणि नगरसेवक, महापौर असताना मिरा-भाईंदर शहरात केलेली कामं, जनसंपर्क या जोरावर त्यांनी नरेंद्र मेहता यांना पराभवाची धूळ चारली.

मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत हाती शिवबंधन

महत्वाची बाब म्हणजे अपक्ष निवडणूक जिंकून आल्यानंतरही त्यांनी भाजपला समर्थन दिलं. त्यावेळी जैन यांना भाजप मिरा-भाईंदरची कमान आपल्या हातात देईल अशी अपेक्षा होती. मात्र, स्थानिक भाजपकडून त्यांना डावलण्याचा प्रयत्न होत होत राहिला. त्यामुळे त्यांची शिवसेनेशी जवळीक वाढली आणि 24 ऑक्टोबर 2020 रोजी त्यांनी शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते हाती शिवबंधन बांधलं. त्यावेळी आपल्या शिवसेना प्रवेशामुळे भाजपला धोका आहे की नाही ते भाजपनं ठरवावं अशी प्रतिक्रिया गीता जैन यांनी दिली होती. तसंच मिरा-भाईंदर शहरातील विकासकामांच्या आश्वासनामुळे आपण शिवसेनेत प्रवेश केल्याचं त्या म्हणाल्या होत्या.

जैन कुटुंबाबाबत सांगितला जाणारा खास किस्सा

गीता जैन आणि भरत जैन यांची राजकीय वर्तुळात अजून एक खास ओळख आहे. जेवढी संपती, जेवढी आय त्याचा चोख हिशेब आणि टॅक्सची पै न पै चुकवणारं कुटुंब म्हणून गीता जैन आणि भरत जैन यांच्याकडे पाहिलं जातं. त्याबाबतचा एक किस्साही सांगितला जातो. जैन यांच्या राजस्थानपासून सर्व ठिकाणंची घरं, कार्यालये, व्यवसायाच्या ठिकाणी एकाच दिवशी आयकर विभागाच्या जवळपास 150 अधिकाऱ्यांनी रेड टाकली. तब्बल तीन दिवस रेड चालली. मात्र, कुठल्याही प्रकारचा गैरव्यवहार त्यांना आढळून आला नाही. असं असताना जैन यांच्यावर 2 कोटी रुपयांचा क्लेम टाकण्यात आला. 2013 साली याबाबत केस पडली. 2017 मध्ये सर्वोच्च न्यायालयानं ही केस निकाली काढत जैन यांना निर्दोष घोषित केलं. पुढे केंद्र सरकारकडून त्यांनी सर्व पैसे परत मिळवले. त्याचबरोबर जैन यांच्यावर कुठल्याही प्रकारच्या मोठ्या गैरव्यवहाराचा आरोप आतापर्यंत झालेला नाही.

जैन यांचा मतदारसंघातील कोणत्या प्रश्नांवर भर?

गीता जैन या आपल्या मतदारसंघात आरोग्य वैद्यकीय मदत कक्ष स्थापन करणार आहेत. त्या माध्यमातून मतदारसंघातील गरजू लोकांना वैद्यकीय मदत पुरवण्याचा त्यांचा प्रयत्न असणार आहे. मिरा-भाईंदरमध्ये पुनर्विकासाची मोठी समस्या आहे. त्या पार्श्वभूमीवर आमदार पुनर्विकास प्रकल्प राबवण्याचं नियोजन जैन यांचं आहे. त्याचबरोबर शहरात असलेल्या पोलीस आणि अन्य शासकीय कर्मचाऱ्यांसाठी वसाहत निर्माण करण्याचाही त्यांचा मानस आहे. इतकंच नाही तर खासगी शाळांची वाढती फी लक्षात घेता, गरीब विद्यार्थ्यांसाठी सरकारी शाळेत क्वॉलिटी एज्युकेशनसाठी त्यांचा प्रयत्न सुरु आहे.

मुंबई-ठाणे-अहमदाबादला जोडणाऱ्या पश्चिम द्रुतगती महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी असते. त्यामुळे अनेक महत्वाच्या कामांसाठी लोकांना तब्बल तीन ते चार तास उशीर होता. हा वेळ कमी करण्यासाठी जलमार्ग वाहतूक सुरु करण्याचाही जैन यांचा प्रयत्न आहे. या माध्यमातून मिरा भाईंदर ते चर्चगेट हे अंतर अवघ्या 45 मिनिटांत पार करणं शक्य होणार आहे.

त्याचबरोबर पारंपरिक मच्छिमारांना नवीन टेक्नॉलॉजीसोबत जोडून विकासाचा प्रयत्न करणे, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या संकल्पनेतील कचरा व्यवस्थापन प्रकल्प उभारणे, या गोष्टीकडे त्यांचा प्राधान्यक्रम आहे. आमदार झाल्यापासून आतापर्यंत अडीच लाख वृक्षलागवड केली. आमदारकीच्या पाच वर्षाच्या कार्यकाळात 20 लाखापर्यंत झाडं लावण्याचा त्यांचा मानस आहे. महत्वाची बाब म्हणजे मिरा-भाईंदरमध्ये ड्रग्स घेणाऱ्यांचं प्रमाण वाढत आहे. अशा लोकांच्या व्यसनमुक्तीसाठी आरोग्यमंत्र्यांमार्फत जैन यांचे प्रयत्न सुरु आहेत.

संबंधित बातम्या :

घरातूनच राजकारणाचं बाळकडू मिळालेल्या राज्याच्या पहिल्या महिला शिक्षणमंत्री, कसा आहे वर्षा गायकवाड यांचा राजकीय प्रवास?

चाकणकरांची सून म्हणून आली आणि राष्ट्रवादीची महिला प्रदेशाध्यक्ष झाली! कसा आहे रुपाली चाकणकरांचा राजकीय प्रवास?

Political journey of MLA Geeta Jain of Mira Bhayander Assembly constituency

Non Stop LIVE Update

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI