‘काही डोमकावळे आता…’ अभिजात भाषेचा दर्जा देण्यावरुन भाजपा आमदाराचा जिव्हारी लागणारा वार
"मराठी भाषा महानच आहे. बाळासाहेबांची सगळी स्वप्न आज मोदीजी, शिंदे फडणवीस साहेब पूर्ण करत आहेत. जे त्यांच्या मुलाला जमलं नाही ते आमच्या सरकारने करुन दाखवलं" असा दावा भाजपा आमदाराने केला.

केंद्र सरकाराने काल एक मोठा निर्णय घेतला. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यावरुन आता राजकारण सुरु झालं आहे. “काल मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली एनडीए सरकारने परत एकदा ऐतिहासिक निर्णय घेऊन दाखवला. प्रामाणिक पद्धतीने ही मागणी लावून धरली होती. केंद्र सरकारचे मनापासून आभार” असं नितेश राणे म्हणाले. त्याचवेळी त्यांनी विरोधकांवर सुद्धा टीका केली. “काही डोमकावळे आम्ही केल असं बोलायला पुढे आलेले आहेत. दुसऱ्याच्या बारशाला जाऊन नाचण्याची ह्यांना सवय झाली आहे. संजय राऊत आणि उद्धव ठाकरे हे आम्हीच केलं असं सांगत आहेत” असं नितेश राणे म्हणाले.
“2014 ते 1019 पर्यंत सत्तेत होते तेव्हा आपल्या मेहुण्याला वाचवण्यासाठी आणि मातोश्री 2 साठी जेवढा आग्रह धरला तेवढा मराठी भाषेसाठी कधीच धरला नाही” अशी बोचरी टीका नितेश राणे यांनी केली. “आज पर्यंत कुठल्याही पंतप्रधाना जमलं नाही, ते मोदींनी करुन दाखवलं. थोडी जरी लाज असेल तर मोदी, शिंदे, फडणवीस यांचे आभार मानले पाहिजेत” असं नितेश राणे म्हणाले. “डोमकावळ्यांना चांगल्याला चांगल म्हणायची सवय नाही, संस्कार नाही” अशी टीका त्यांनी केली.
‘पत्राचाळमध्ये मराठी राहत होते, पाकिस्तानी नाही’
“मराठी माणूस व नोकरीं ह्यावर संजय राऊतने कमी बोलावं असा माझा सल्ला आहे. पत्राचाळमध्ये मराठी राहत होते, पाकिस्तानी नाही. मराठी भाषा महानच आहे. बाळासाहेबांची सगळी स्वप्न आज मोदीजी, शिंदे फडणवीस साहेब पूर्ण करत आहेत. जे त्यांच्या मुलाला जमलं नाही ते आमच्या सरकारने करुन दाखवलं” असा दावा नितेश राणे यांनी केला. “अजान स्पर्धा घेताना, जनाब बाळासाहेब बोलताना बाळासाहेब आठवले नाही का? सोयीनुसार बाळासाहेबांचे नाव वापरायचे ही राऊत आणि उद्धवची सवय झाली आहे” अशी टीका नितेश राणे यांनी केली.
