धनगर समाजाची फसवणूक, भविष्यात शिक्षण-नोकरीतूनही आरक्षण काढले जाणार : प्रकाश आंबेडकर

धनगर समाजाची फसवणूक, भविष्यात शिक्षण-नोकरीतूनही आरक्षण काढले जाणार : प्रकाश आंबेडकर
प्रकाश आंबेडकर, नेते, वंचित बहुजन आघाडी

पंढरपूर : वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी मागील अनेक सरकारांनी धनगरांची फसवणूक केल्याचा आरोप केलाय. तसेच आगामी काळात शिक्षण आणि नोकरीतूनही आरक्षण काढून टाकले जाणार असल्याचा इशारा दिलाय. ते पंढरपूरमध्ये वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार बिरप्पा मोटे यांचा प्रचार करण्यासाठी आले होते. त्यावेळी ते बोलत होते (Prakash Ambedkar comment on Dhangar reservation and government policy).

“आरक्षणाच्या नावाखाली काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना, भाजप या पक्षांनी धनगर समाजाची केवळ फसवणूक केली आहे. पंढरपूरच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस व भाजप या पक्षांनी धनगर समाजाला उमेदवारी नाकारून प्रस्थापितांना तिकीट दिले. त्यामुळे धनगर समाजाने वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार बिरप्पा मधुकर मोटे यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहून त्यांना निवडून आणावे. बिरप्पा मोटे हे धनगर समाजाचे असून ते निवडून आल्यास धनगरांच्या प्रश्नांना वाचा फोडतील,” असं आवाहन प्रकाश आंबेडकर यांनी केलंय.

आरक्षण न देता धनगर समाजाची फसवणूक

प्रकाश आंबेडकर म्हणाले, “माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वाखाली धनगर समाजाचा मेळावा पंढरपुरात घेण्यात आला होता. त्या वेळी धनगर समाजाला आरक्षण देण्याचे जाहीर करण्यात आले होते. मात्र आरक्षण न देता धनगर समाजाची फसवणूक करण्यात आली. अशीच फसवणूक काँग्रेस, राष्ट्रवादी व आताचे सत्ताधारी पक्ष करीत आहेत. आरक्षण देतो असे सांगितले. मात्र गेली पाच वर्षे त्याची अंमलबजावणी झालेली नाही. त्यामुळे धनगर समाज आता एकटा पडला आहे.”

“धनगर, ओबीसी हा समाज हा हिंदू नाही का?”

“धनगर समाजाला सध्या ओबीसीचे आरक्षण मिळत आहे. मात्र सुप्रीम कोर्टाच्या निर्णयामुळे आता हे आरक्षण काढून घेण्यात आले आहे. भविष्यात याच सिद्धांतावर शिक्षण तसेच नोकरीचे आरक्षण काढून घेतले जाईल. सत्तेत असलेले काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना तर केंद्रातील बीजेपी सरकार हिंदू धर्माला मानतात. मग धनगर, ओबीसी हा समाज हा हिंदू नाही का? त्यांचे आरक्षण का काढून घेतले जात आहे. त्याचे कारण म्हणजे जुन्या वर्णभेद प्रमाणे हे शूद्र आहेत व त्यांना सत्ताधारी होऊ द्यायचे नाही, त्यामुळे हा सर्व प्रकार चालू आहे,” असा आरोप प्रकाश आंबेडकर यांनी केलाय.

“धनगर समाजातील काही प्रतिष्ठांनाही भाजपने तिकिट नाकारलं”

प्रकाश आंबेडकर म्हणाले, “धनगर समाजातील काही प्रतिष्ठित मंडळी बीजेपी तसेच राष्ट्रवादीकडे तिकीट मागायला गेले होते. मात्र त्यांनाही तिकीट देण्यात आले नाही. हे तिकीट प्रस्थापितांना देण्यात आले. त्यामुळे अशा फसवणूक करणाऱ्या पक्षापासून धनगर समाजाने वेळीच सावध व्हावे. पंढरपूर येथील पोटनिवडणुकीत वंचित बहुजन आघाडीचे धनगर समाजाचे उमेदवार वीरप्पा मोटे हे उभे आहेत. त्यांना निवडून द्यावे.”

हेही वाचा :

‘वाघांच्या राज्यात लांडग्यांची चलती कशी?’, प्रकाश आंबेडकर यांचा ठाकरे सरकारला सवाल

‘मुख्यमंत्र्यांना कणा नाही हे त्यांनी दाखवून दिलं, हे सरकार बरखास्त करा’, प्रकाश आंबेडकरांची राज्यपालांकडे मागणी

ठाकरे सरकार चोरांचे, खुन्यांचे, लगोलग बरखास्त करा, प्रकाश आंबेडकर घेणार राज्यपाल कोश्यारी यांची भेट

व्हिडीओ पाहा :

Prakash Ambedkar comment on Dhangar reservation and government policy

Published On - 5:05 pm, Tue, 6 April 21

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI