मोठी बातमी! रेव्ह पार्टीमुळे पतीला अटक, आता रोहिणी खडसे पुणे पोलिसांच्या भेटीला, काय झाली चर्चा?
पुणे पोलिसांनी खराडी भागातील रेव्ह पार्टीतून ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांचे जावई प्रांजल खेवलकर यांना अटक केली आहे. आता एकनाथ खडसे यांची मुलगी रोहिणी खडसे यांनी पती प्रांजल खेवलकर यांच्या अटकेनंतर पुणे पोलिसांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची भेट घेतली आहे.

पुणे पोलिसांनी खराडी भागात छापेमारी करून रेव्ह पार्टीचा पर्दाफाश केला होता. या रेव्ह पार्टीतून ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांचे जावई प्रांजल खेवलकर यांना पोलिसांनी अटक केली आहे. त्यामुळे खडसे कुटुंबाच्या अडचणी वाढल्या आहेत. अशातच आता एकनाथ खडसे यांची मुलगी रोहिणी खडसे यांनी पती प्रांजल खेवलकर यांच्या अटकेनंतर पुणे पोलिसांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची भेट घेतली आहे. या भेटीत नेमकं काय घडलं याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.
रोहिणी खडसेंनी घेतली पुणे पोलिसांची भेट
पतीच्या अटकेनंतर आज रोहिणी खडसे यांनी आज पुणे पोलिसांची भेट घेतली. रात्री 8 वाजता रोहिणी खडसे पुणे पोलिस आयुक्तालयात गेल्या होत्या. यावेळी त्या पुणे पोलिसांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना भेटल्या. प्रांजल खेवलकर यांना काल अटक केल्यानंतर त्यांच्यावर कोणते गुन्हे दाखल झाले आहेत याची माहिती रोहिणी खडसे यांनी पोलिसांकडून घेतली असल्याचे समोर आले आहे.
काय आहे प्रकरण?
रविवारी मध्यरात्री पुणे पोलिसांनी खराडी परिसरात एका हाय-प्रोफाइल रेव्ह पार्टीवर छापेमारीची कारवाई केली. या कारवाई दरम्यान माजी मंत्री एकनाथ खडसे यांचे जावई प्रांजल खेवलकर यांच्यासह सात जणांना ताब्यात घेतलं होतं. ही पार्टी एका हॉटेलमधील फ्लॅटमध्ये ‘हाऊस पार्टी’च्या नावाखाली सुरू होती. पोलिसांनी त्यांना मिळालेल्या टीपच्या आधारावर ही कारवाई केली. एकनाथ खडसे यांचे जावई सापडल्यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली.
यापूर्वीही प्रांजल खेवलकर हे मोठ्या वादात गाडीमुळे सापडले होते. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी गंभीर आरोप केले होते. रेव्ह पार्टीमध्ये पुणे पोलिसांनी काही पुरूषांसोबतच महिलांना देखील ताब्यात घेतले आहे. पोलिसांना पार्टीच्या ठिकाणी हुक्का, दारू आणि मोठ्या प्रमाणात अंमली पदार्थ सापडली आहेत. त्यामुळे सर्वांच्या अडचणी वाढल्या आहेत.
प्रांजल खेवलकर कोण आहेत?
एकनाथ खडसेंचे जावई प्रांजल खेवलकर हे एक व्यावसायिक आहेत आणि त्यांचे रिअल इस्टेट, इव्हेंट मॅनेजमेंटमध्ये काम आहे. त्याच्या काही कंपन्या देखील आहेत. प्रांजल हे जरी मुक्ताईनगरमध्ये खडसे कुटुंबियांसोबत राहत असले तरीही त्यांचे पुण्यात कायमच येणे जाणे सुरू असते अशी माहिती समोर आली आहे.
