विखेंचं बाळासाहेब थोरातांच्या मतदारसंघातच कार्यालय सुरु

काँग्रेसला उभारी देण्यासाठी थोरातांना प्रदेशाध्यक्ष करण्यात आल्यानंतर आता राधाकृष्ण विखे पाटील यांनी थोरातांना शह देण्यासाठी त्यांच्या मतदारसंघातच संपर्क कार्यालय सुरू केलं आहे आणि थोरात विरोधकांची मोट बांधली आहे.

विखेंचं बाळासाहेब थोरातांच्या मतदारसंघातच कार्यालय सुरु

शिर्डी : एकमेकांचे राजकीय विरोधक असलेल्या विखे – थोरात यांच्यात आता राजकीय संघर्ष आणखी वाढलाय. पक्ष बदलामुळे आता काँग्रेसचा राजीनामा देऊन थेट भाजपकडून मंत्रिमंडळात दाखल झालेले गृहनिर्माण मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांनी (Radhakrishana Vikhe Patil) आता काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरातांविरोधात (Balasaheb Thorat) उघड भूमिका घ्यायला सुरूवात केली आहे. काँग्रेसला उभारी देण्यासाठी थोरातांना प्रदेशाध्यक्ष करण्यात आल्यानंतर आता राधाकृष्ण विखे पाटील यांनी थोरातांना शह देण्यासाठी त्यांच्या मतदारसंघातच संपर्क कार्यालय सुरू केलं आहे आणि थोरात विरोधकांची मोट बांधली आहे.

बाळासाहेब थोरात यांच्या गडाला सुरुंग लावण्यासाठी राधाकृष्ण विखे पाटील यांनी संगमनेर येथे आज संपर्क कार्यालयाचे उद्घाटन केलं. काँग्रेसमध्ये असतानाही या दोघांचे राजकीय युद्ध सुरु असल्याचं अनेकदा बघायला मिळालं. मात्र आता विखेंच्या भाजपा प्रवेशानंतर हे युद्ध आणखी तीव्र झाले आहे. बाळासाहेब थोरातांच्या मतदारसंघात म्हणजेच संगमनेर शहरात सेना-भाजप युतीच्या जनसंपर्क आणि माहिती सुविधा केंद्राचे उदघाटन करण्यात आलं. यावेळी विखेंनी नाव न घेता थोरात यांच्यावर टीका केली.

महाराष्ट्रात वाताहात झालेल्या काँग्रेसला स्थैर्य मिळवून देण्यासाठी बाळासाहेब थोरात यांची प्रदेशाध्यक्षपदी नेमणूक करण्यात आली आहे. मात्र विखे पाटलांनी प्रदेशाध्यक्षांच्याच गडाला सुरुंग लावण्याची तयारी सुरू केली आहे. आगामी विधानसभा निवडणुकीसाठी सर्वपक्षीय थोरात विरोधक विखेंच्या छत्राखाली आले आहेत.

“संगमनेर तालुका टँकर युक्त ठेवण्याचं थोरातांना भूषण असून तालुका दुष्काळग्रस्त कसा राहील हे मॉडेल त्यांनी सांभाळलं असल्याची टीका विखे यांनी थोरातांवर केली. आता हे मॉडेल आऊट डेटेड झालं त्यासाठी सर्वांनी एकत्र येण्याची गरज असून हम सब एक है असा नारा देत विखेंनी सर्वांना एकत्र येण्याचं आवाहन केलं.” त्यामुळे आता बाळासाहेब थोरात यांच्यापुढे विखे पाटलांनी मोठं आव्हान निर्माण केलं असून थोरात याचा सामना कसा करतात हे पहावं लागेल.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *