संग्राम जगतापचा फॉर्म भरायला जाणार नाही: राधाकृष्ण विखे पाटील

संग्राम जगतापचा फॉर्म भरायला जाणार नाही: राधाकृष्ण विखे पाटील

मुंबई: विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील आघाडी धर्म पाळणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचे नगर दक्षिणचे उमेदवार संग्राम जगताप यांचा उमेदवारी फॉर्म भरायला जाणार नसल्याचं राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगितलं. काँग्रेसची आज मुंबईत बैठक होत आहे. या बैठकीला आज राधाकृष्ण विखे पाटील यांनी हजेरी लावली. त्यावेळी त्यांनी याबाबतची माहिती दिली.

बंडाचा झेंडा फडकवत मुलगा सुजय विखे पाटील यांनी भाजप पक्षात प्रवेश केल्याने  राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासमोर नवा पेच उभा राहिला आहे. काँग्रेसचे स्टार प्रचारक असणारे विखे पाटील निवडणूक प्रचार संदर्भात बोलताना म्हणाले, ” मी राज्यात प्रचार करणार, आघाडीच्या सभांना जाणार, मात्र राष्ट्रवादीचे उमेदवार संग्राम जगताप यांचा फॉर्म भरायला मी जाणार नाही. मी काँग्रेसच्या बैठकीला आलो आहे.”

भाजपचे नगर दक्षिणचे खासदार दिलीप गांधी यांच्या भेटीनंतर राधाकृष्ण विखे पाटील यांना टीकेला सामोरे जावे लागले. या भेटीबाबत सांगताना विखे पाटील म्हणाले, “दिलीप गांधी मित्र आहेत. त्यांना नेहमी भेटतो. त्यांच्या भेटीत गैर नाही” असा दावा विखे पाटील यांनी केला आहे.

अहमदनगर जिल्हा काँग्रेसने भाजपचे उमेदवार सुजय विखे पाटील यांचा प्रचार करण्याचा निर्णय घेतल्यानंतर विखे पाटलांनी यावर सावध प्रतिक्रिया व्यक्त केली. ते म्हणाले, ” नगरमध्ये स्थानिक नेत्यांनी काय भूमिका घेतली यावर काय करायचं हे पक्ष ठरवेल.

दरम्यान, पुणे लोकसभा मतदार संघातील उमेदवारी संदर्भातील तिढा आज सुटण्याची शक्यता आहे. मराठा सेवा संघ संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड आज टिळक भवन येथे काँग्रेस पक्षात प्रवेश करणार आहेत. या पक्षप्रवेशानंतर प्रवीण गायकवाड यांना काँग्रेस पक्षाकडून पुण्याची उमेदवारी घोषित होण्याची शक्यता आहे.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI