सोशल मीडिया वापरणाऱ्या मनसैनिकांना राज ठाकरेंची ताकीद

भाषणाच्या सुरुवातीलाच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मनसैनिकांना काही संघटनात्मक गोष्टी सांगितल्या, शिवाय 'हे सांगितल्यावर मला तसं पुन्हा पक्षात होताना दिसता कामा नये', अशी ताकीदही दिली.

सोशल मीडिया वापरणाऱ्या मनसैनिकांना राज ठाकरेंची ताकीद

मुंबई : मनसेच्या महाअधिवेशनाची सांगता राज ठाकरे यांच्या भाषणाने होत आहे (MNS Adhiveshan). यावेळी भाषणाच्या सुरुवातीलाच मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी मनसैनिकांना काही संघटनात्मक गोष्टी सांगितल्या, शिवाय ‘हे सांगितल्यावर मला तसं पुन्हा पक्षात होताना दिसता कामा नये’, अशी ताकीदही दिली. यावेळी राज ठाकरेंनी मनसैनिकांना पक्षांतर्गत गोष्टी सोशल मीडियावर व्यक्त करण्यास मज्जाव केला. इतकंच नाही तर ‘तुम्हाला कुणाबद्दल जर काही भावना व्यक्त करायची असेल तर आम्ही आहोत आम्हाला सांगा’, असंही सांगितलं (Raj Thackeray Warn MNS Supporters).

राज ठाकरे म्हणाले, “पहिला भाग – सोशल मीडिया – फेसबुक, ट्विटर आणि सर्व गोष्टी – काही महाराष्ट्र सैनिक, काहींचा पक्षांशी संबंधही नाही. पण कुणी डावा आहे, उजवा आहे, काही प्रतिक्रिया व्यक्त करतात. मला संघटनात्मक कोणतीही गोष्ट वाईट पद्धतीने आलेली चालणार नाही. तुम्हाला कुणाबद्दल जर काही भावना व्यक्त करायची असेल तर आम्ही आहोत आम्हाला सांगा. मात्र, पक्षांतर्गत गोष्टी सोशल मीडियावर चालणार नाही. असं आढळलं तर मी त्या व्यक्तीला पदावरुन दूर करेन.शहराध्यक्ष असो किंवा तालुक्याध्यक्ष अथवा शाखाध्यक्ष, त्यांचं वय सारखं असेन. मात्र, पद नावाची एक गोष्ट असते. त्यामुळे पदाचा सन्मान झाला पाहिजे. जे उत्तम काम करता ते लिहा, ते लोकांपर्यंत गेलं पाहिजे.”

दुसरा मुद्दा : “संघटनात्मक बांधणीसाठी आपण एक सेल सुरु करतो आहोत. आता दोन व्यक्तींची निवड होईल. उद्या त्यांच्याखाली तुमच्यापैकी अनेक लोक असतील. संघटनेचं काम करणाऱ्यांनी रायगड येथे कार्यालयात येऊन नाव नोंदवावं आणि पक्षासाठी काम करायचं आहे, निवडणूक लढवायची नाही असं सांगावं. बारामतीचे पाटसकर आणि वसंत फडके यासाठी काम करतील. संघटनात्मक काम मजबूत करण्यासाठी जे काम करतील, जे काम करणार नाहीत त्यांचंही नाव माझ्यापर्यंत येईल.”

तिसरा मुद्दा : “शॅडो कॅबिनेट – पक्षाचे सरचिटणीस आणि त्यांच्या खालील टीम सरकारच्या प्रत्येक महत्त्वाच्या खात्याच्या कामावर देखरेख ठेवतील. या खात्यांचा संपूर्ण राज्यावर परिणाम होत असतो. अगदी आपल्या पक्षाचं सरकार आलं तरी ते लक्ष ठेवतील.”