राहुल गांधी शिवसेनेला समजून घेतायत की शिवसेनेचं काँग्रेसीकरण होतंय? वाचा सविस्तर

Shivsena Congress | मंगळवारी शिवसेनेने दिल्लीत आयोजित करण्यात आलेल्या 15 विरोधी पक्षांच्या बैठकीलाही हजेरी लावली होती. या बैठकीला शिवसेनेचे झाडून सर्व खासदार उपस्थित होते.

राहुल गांधी शिवसेनेला समजून घेतायत की शिवसेनेचं काँग्रेसीकरण होतंय? वाचा सविस्तर
संजय राऊत आणि राहुल गांधी

नवी दिल्ली: गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात नव्या राजकीय समीकरणांची जोरदार चर्चा सुरु आहे. शिवसेना, भाजप आणि राष्ट्रवादीतील शीर्षस्थ नेत्यांच्या भेटीगाठींमुळे या चर्चेला सातत्याने हवा मिळताना दिसत आहे. अशातच आता दिल्लीतील पावसाळी अधिवेशनाच्या (Monsoon Session 2021) पार्श्वभूमीवर घडणाऱ्या घडामोडींचे महाराष्ट्रातील राजकीय वर्तुळात पडसाद उमटण्याची शक्यता आहे.

काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी आणि संजय राऊत यांची दिल्लीत नुकतीच भेट झाली होती. या भेटीत राष्ट्रीय आणि राज्यातील राजकारणावर चर्चा झाल्याचे संजय राऊत यांनी सांगितले होते. राहुल गांधी यांनी महाविकासआघाडी सरकारच्या कामकाजाबाबत समाधान व्यक्त केले. तसेच मी त्यांना शिवसेनेची जडणघडण आणि कार्यपद्धतीची माहिती दिली, असेही संजय राऊत यांनी ट्विटमध्ये म्हटले होते.

त्यानंतर मंगळवारी शिवसेनेने दिल्लीत आयोजित करण्यात आलेल्या 15 विरोधी पक्षांच्या बैठकीलाही हजेरी लावली होती. या बैठकीला शिवसेनेचे झाडून सर्व खासदार उपस्थित होते. या बैठकीत शिवसेना नेते संजय राऊत यांनी आपली भूमिका मांडली. गेल्या काही दिवसांपासून काँग्रेसने बोलावलेल्या सर्व बैठकांना शिवसेना हजेरी लावताना दिसत आहे. गेल्या आठवड्यात राहुल गांधी यांनी विरोधकांची बैठक बोलावली होती. या बैठकीला संजय राऊत उपस्थित होते. आजही राहुल गांधी यांनी विरोधकांची ब्रेकफास्ट मिटींग आयोजित केली होती. त्यालाही शिवसेनेचे सर्व खासदार उपस्थित राहिले. एवढेच नव्हेतर या मिटिंगमध्ये संजय राऊत यांनी शिवसेनेची भूमिकाही मांडली. त्यामुळे शिवसेना यूपीएत सहभागी झाल्याची जोरदार चर्चा आहे.

राहुल गांधी शिवसेनेला समजून घेतायत की शिवसेनेचं काँग्रेसीकरण होतंय?

या सगळ्या घडामोडींमुळे शिवसेना आणि काँग्रेस एकमेकांच्या जवळ येत असल्याचे चित्र दिसत आहे. मात्र, संजय राऊत यांनी म्हटल्याप्रमाणे राहुल गांधी शिवसेनेला समजून घेतायत की शिवसेनेचं काँग्रेसीकरण होतंय, या प्रश्नाचा उलगडा अद्याप झालेला नाही. भाजपकडून सातत्याने शिवसेनेने हिंदुत्वाची कास सोडली, असा आरोप केला जातो. मध्यंतरी राज्यपालांनीही शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना हिंदुत्वाची आठवणा करुन दिली होती. त्यानंतरही शिवसेना मोठ्या नेटाने काँग्रेस-राष्ट्रावादीशी जुळवून सरकार चालवत आहे.  भविष्यातील राजकारणासाठी शिवसेना आणि काँग्रेस एकत्र येतीलही पण यावेळी होणाऱ्या वाटाघाटींमध्ये कोण बाजी मारणार, हेदेखील पाहावे लागेल. दोघांपैकी कुठल्या पक्षाला अधिक तडजोड करावी लागणार, हे पाहणेही औत्स्युकाचे ठरेल.

राऊत-गांधी भेटीमागचं कारण काय?

आगामी महापालिका आणि 2024 ची विधानसभा निवडणूक काँग्रेस स्वबळावर लढणार असल्याचं काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले सातत्याने सांगत आहे. राज्यात महाविकास आघाडीचं सरकार सत्तेत असताना आणि काँग्रेस त्यातील घटकपक्ष असूनही त्यांची स्वबळाची भाषा सुरु आहे. काँग्रेसनं स्वबळाचा निर्णय घेतल्यास महापालिका निवडणुकीत भाजपला फायदा होण्याची शक्यता नाकारता येत नाही. ही गोष्ट शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जाणून आहेत. त्यामुळे संजय राऊत यांनी थेट राहुल गांधी यांची भेट घेतली असावी, अशी शक्यता राजकीय वर्तुळात व्यक्त केली जात आहे.

संबंधित बातम्या:

आधी मोदींशी चर्चा, आता थेट अमित शाहांची भेट, शरद पवारांच्या दिल्लीत भेटीगाठी

राहुल गांधींचं ‘ब्रेकफास्ट पॉलिटिक्स’; 15 पक्षांचे 100 खासदार एकवटले; संसदेवर ‘सायकल मार्च’

पंतप्रधान तर आम्हाला पाणीही विचारत नाही, काँग्रेसच्या ‘ब्रेकफास्ट पॉलिटिक्स’ला शिवसेनेची साथ; यूपीएत सहभागी?

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI