ठाकरेच का, शिवसैनिक मुख्यमंत्री का नाही?, फडणवीसांच्या सवालाला अग्रलेखातून उत्तर, राऊत म्हणाले ‘तुम्ही कोण?’

फडणवीसांच्या प्रश्नाला आजच्या सामना अग्रलेखातून राऊतांनी उत्तर दिलंय. उद्धव ठाकरे यांनी एखाद्या शिवसैनिकाला मुख्यमंत्री करु असे सांगितले होते, पण ते स्वतःच झाले, असा आक्षेप घेणारे फडणवीस किंवा चंद्रकांत पाटील कोण?, असा उलटसवाल त्यांनी केला आहे. 

ठाकरेच का, शिवसैनिक मुख्यमंत्री का नाही?, फडणवीसांच्या सवालाला अग्रलेखातून उत्तर, राऊत म्हणाले 'तुम्ही कोण?'
देवेंद्र फडणवीस, संजय राऊत

मुंबई : उद्धव ठाकरेंच्या दसरा मेळाव्यातील तासभराच्या भाषणानंतर फडणवीसांनी 17 मिनिटांची पत्रकार परिषद घेऊन त्यांच्या भाषणाची चिरफाड केली. तसंच त्याच पत्रकार परिषदेत शिवसैनिक मुख्यमंत्री का नाही, असं विचारताना देसाई, रावतेंची त्यांनी नावं घेतली. एकप्रकारे त्यांनी ठाकरेच मुख्यमंत्री का? असं विचारुनच नेमक्या प्रश्नावर बोट ठेवलं. त्यांच्या याच प्रश्नाला आजच्या सामना अग्रलेखातून राऊतांनी उत्तर दिलंय. उद्धव ठाकरे यांनी एखाद्या शिवसैनिकाला मुख्यमंत्री करु असे सांगितले होते, पण ते स्वतःच झाले, असा आक्षेप घेणारे फडणवीस किंवा चंद्रकांत पाटील कोण?, असा उलटसवाल त्यांनी केला आहे.

फडणवीसांनी भडास बाहेर काढली

दसरा मेळाव्यातील शिवसेना पक्षप्रमुखांचे भाषण परंपरेप्रमाणे गाजले आहे. उद्धव ठाकरे हे शिवसेना पक्षप्रमुख व मुख्यमंत्री अशा दोन वेगळ्या भूमिकेत आहेत, पण दसरा मेळावा हा शिवसेनेचा असतो व शिवसेना पक्षप्रमुख मेळाव्यात आपले विचार मांडत असतात. भारतीय जनता पक्षाने ठाकरे यांच्या जोरदार भाषणावर बेंबीच्या देठापासून बोंबा मारायला सुरुवात केली आहे. फडणवीस यांनी तर ”उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झालेच कसे?” अशी ‘अलोकशाही’ भूमिका घेऊन मनातली भडास बाहेर काढली. उद्धव ठाकरे यांनी एखाद्या शिवसैनिकाला मुख्यमंत्री करु असे सांगितले होते, पण ते स्वतःच झाले, असा आक्षेप घेणारे फडणवीस किंवा चंद्रकांत पाटील कोण?

कड्याकुलुपात शपथ घेतली नाही, त्यामुळे तुमच्या मळमळीला अर्थ नाही

उद्धव ठाकरे हे शिवसैनिक आहेत व ते काही परकीय देशातील राजकीय पक्षाचे सदस्य नाहीत. दुसरे असे की, उद्धव ठाकरे हे कोणत्या परिस्थितीत मुख्यमंत्री झाले याचा खुलासा शरद पवार यांनी केला आहे. महाविकास आघाडीचे बहुमत झाले व त्यांनी आपला नेता निवडला. उद्धव ठाकरे यांनी शिवतीर्थावर लाखोंच्या उपस्थितीत वाजत गाजत शपथ घेतली. लोक झोपेत आणि गुंगीत असताना लपून छपून, कड्याकुलुपात शपथ घेतली नाही. हे काय राज्याच्या विरोधी पक्षनेत्यांना माहीत नाही? त्यामुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री कसे झाले या मळमळीस तसा अर्थ नाही.

महाराष्ट्रात भाजपचे डोळे तिरळे, त्यांना उपचारांची गरज

उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री म्हणून तुमच्याच राज्यपालांनी शपथ दिली आहे व त्या घटनात्मक विधीस स्वतः फडणवीस उपस्थित होते. शपथविधीचा झगमगता सोहळा पाहून त्यांचेही डोळे दिपलेच असतील. डोळे दिपणे व डोळे फिरणे यात पुन्हा फरक आहे. महाराष्ट्रात भाजपचे डोळे फिरले आहेत. त्यातून जो तिरळेपणा निर्माण झाला, त्यावर उपचारांची गरज आहे.

फडणवीस नेमकं काय म्हणाले होते?

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दसरा मेळाव्यात फडणवीसांना मुख्यमंत्रीपदावरुन डिवचलं होतं. त्यांच्या टीकेला फडणवीस यांनी सडेतोड उत्तर दिलं. तुम्हाला मुख्यमंत्री व्हायचं नव्हतं तर मग सुभाष देसाई, एकनाथ शिंदे आणि दिवाकर रावते यांना मुख्यमंत्री का नाही केलं? असा सवाल करतानाच जर तुम्हाला मुख्यमंत्री व्हायचं नव्हतं तर नारायण राणे आणि राज ठाकरे शिवसेना सोडून का गेले? असा सवाल देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.

(Sanjay Raut reply Devendra fadanvis Question over his Cm Post Criticism)

हे ही वाचा :

ठाकरे म्हणाले मला मुख्यमंत्री व्हायचं नव्हतं, फडणवीस म्हणतात मग रावते, राणे, राज ठाकरेंचं काय केलं?

VIDEO: मोठ्या भावाविरोधात ठाकरेंनी रणशिंग फुंकलं? दसऱ्याच्या भाषणात ड्रग्ज, अदानी, गांजा, निधीवर थेट मोदींना सवाल

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI