नरेंद्र पाटील-शिवेंद्रराजेंचा एकत्र मिसळीवर ताव, साताऱ्यात उदयनराजेंना धक्का?

सातारा: सातारा लोकसभा मतदारसंघात यंदा राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार उदयनराजे भोसले यांच्याविरोधात कोणता उमेदवार मैदानात उतरणार याबाबतची उत्सुकता आहे. यंदा उदयनराजेंविरोधात भाजपकडून माथाडी कामगार नेते आणि माजी आमदार नरेंद्र पाटील यांना तिकीट मिळण्याची शक्यता आहे. ही शक्यता वर्तवली जात असताना, आज साताऱ्यात वेगळंच चित्र पाहायला मिळालं. भाजपचे इच्छुक उमेदवार नरेंद्र पाटील यांनी राष्ट्रवादीचे आमदार शिवेंद्रराजे भोसली …

नरेंद्र पाटील-शिवेंद्रराजेंचा एकत्र मिसळीवर ताव, साताऱ्यात उदयनराजेंना धक्का?

सातारा: सातारा लोकसभा मतदारसंघात यंदा राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार उदयनराजे भोसले यांच्याविरोधात कोणता उमेदवार मैदानात उतरणार याबाबतची उत्सुकता आहे. यंदा उदयनराजेंविरोधात भाजपकडून माथाडी कामगार नेते आणि माजी आमदार नरेंद्र पाटील यांना तिकीट मिळण्याची शक्यता आहे. ही शक्यता वर्तवली जात असताना, आज साताऱ्यात वेगळंच चित्र पाहायला मिळालं. भाजपचे इच्छुक उमेदवार नरेंद्र पाटील यांनी राष्ट्रवादीचे आमदार शिवेंद्रराजे भोसली यांची भेट घेतल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या.

साताऱ्यातील एका प्रसिध्द हॉटेलमध्ये ही भेट झाली. या हॉटेलवर दोघांनी मिसळ खाल्ली. या भेटीने खासदार उदयनराजे भोसले आणि आमदार शिवेंद्रराजे भोसले यांच्यातील मनोमिलनावर मोठं प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे.

सातारा लोकसभा मतदारसंघातून भाजपकडून माथाडी कामगारांचे नेते आणि माजी आमदार नरेंद्र पाटील यांचे नाव पुढे आले आहे. त्यामुळे नरेंद्र पाटील यांनी साताऱ्यात येऊन राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या गाठी‌भेटी घेण्यास सुरवात केली आहे. आज त्यांनी आमदार शिवेंद्रराजे भोसले यांची भेट घेतली.

2014 च्या लोकसभा निवडणुकीत सातारा मतदारसंघ हा शिवसेनेने आरपीआयसाठी सोडला होता. मात्र, आता हा मतदारसंघ भाजपकडे राहणार असल्याची माहिती आहे. राष्ट्रवादीकडून उदयनराजे हे निवडणूक लढणार हे निश्चित आहे. त्यांच्याविरोधात मैदानात कोणाला उतरवायचे याची चर्चा भाजपमध्ये गेल्या काही दिवसांपासून सुरू होती.

आता नरेंद्र पाटील हे उदयनराजेंविरोधात निवडणूक लढवणार अशी चर्चा असताना, त्यांनी थेट शिवेंद्रराजेंची भेट घेतल्याने साताऱ्यात राजकीय मिसळ झाली आहे. शिवेंद्रराजे आणि उदयनराजे यांचं हाडवैर नुकतंच पक्षाध्यक्ष शरद पवारांनी मिटवलं होतं. त्यातच नरेंद्र पाटील हे सुद्धा मूळचे राष्ट्रवादीचे. मात्र त्यांनी काही महिन्यांपूर्वीच भाजपमध्ये प्रवेश केला. आता शिवेंद्रराजे आगामी लोकसभा निवडणुकीत पक्षनिष्ठा म्हणून उदयनराजेंना मदत करणार की जुना वचपा काढणार? की जुना राजकीय मित्र म्हणून नरेंद्र पाटलांना मदत करणार, असा प्रश्न आहे.

कोण आहेत नरेंद्र पाटील?

नरेंद्र पाटील यांची माथाडी कामगार नेते अशी ओळख आहे.

नरेंद्र पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसकडून आमदारकी भूषवली आहे.

काही महिन्यांपूर्वी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस सोडून भाजपमध्ये प्रवेश केला.

राष्ट्रवादीतून बाहेर पडल्यानंतर पाटील यांना अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे अध्यक्ष करण्यात आले होते.

पाटील हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विश्वासू गटातील ओळखले जातात.

नरेंद्र पाटील हे नवी मुंबईत कार्यरत असले, तरी सातारा,वाई, कोरेगाव, पाटण या भागात त्यांचा संपर्क आहे.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *