आठ जागांचा तिढा राहुल गांधी-शरद पवार सोडवणार, दिल्लीत बैठक

आठ जागांचा तिढा राहुल गांधी-शरद पवार सोडवणार, दिल्लीत बैठक

नवी दिल्ली : लोकसभा निवडणुका अगदी तीन ते चार महिन्यांवर येऊन ठेपल्या आहेत. त्यामुळे महाराष्ट्रासह देशभरात राजकीय हालचालींना वेग आला आहे. महाराष्ट्रातही युत्या-आघाड्यांची समीकरणं जुळू लागली असताना, पारंपरिक मित्रपक्ष असलेल्या काँग्रेस-राष्ट्रवादीनेही हालचाली सुरु केल्या आहेत. याच पार्श्वभूमीवर नवी दिल्लीत आज काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यात महत्त्वपूर्ण बैठक पार पडणार आहे. राज्यातील लोकसभेच्य जागावाटपाबाबत या बैठकीत चर्चा होईल.

काँग्रेसकडून राहुल गांधी यांच्यासह मल्लिकार्जुन खर्गे आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडून शरद पवार यांच्यासह प्रफुल्ल पटेल या बैठकील उपस्थित असतील. दोन्ही पक्षातील राष्ट्रीय आणि राज्यातील अत्यंत महत्त्वाच्या नेत्यांसह या बैठकीत लोकसभेच्या जागावाटपावर चर्चा पार पडेल. महाराष्ट्रातील लोकसभेच्य जागावाटपासह महाआघाडीबाबतही या बैठकीत चर्चा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

वाचा : त्या 6 जागा, जिथे काँग्रेस-राष्ट्रवादीला जिंकण्याची पूर्ण हमी!

काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये राज्यात 8 जागांवर काही प्रमाणात मतभेद आहेत. या आठ जागा नेमक्या कोण लढवेल, याबाबत खलबतं सुरु आहेत. त्यामुळे या 8 जागांवर वरिष्ठ नेत्यांच्या या बैठकीत काही तोडगा निघतो का, हे पाहणे सुद्धा महत्त्वाचे असेल. तसेच, पुणे, यवतमाळ, नंदुरबार, रत्नागिरी, औरंगाबाद हे सध्या काँग्रेसकडे असणारे मतदारसंघ राष्ट्रवादीकडे जाणार का, हेही पाहणे महत्त्वाचे ठरेल.

अहमदनगरमधील लोकसभेच्या जागेबाबतही काँग्रेस-राष्ट्रवादीमध्ये धुसफूस पाहायला मिळाली. अहमदनगरमधून विधानसभेतील विरोधी पक्षनेते आणि काँग्रेसचे राज्यातील वरिष्ठ नेते राधाकृष्ण विखे पाटील यांचे पुत्र सुजय विखे पाटील हे लोकसभा लढवण्याच्या तयारीत आहेत. मात्र, ही जागा सध्या राष्ट्रवादीकडे आहे. त्यामुळे सुजय विखेंसाठी राष्ट्रवादीकडून ही जागा काँग्रेससाठी सोडली जाणार का, हेही पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI