सुरुवातीला शरद पवारांना याविषयी माहिती होती… : अजित पवार

भाजपला पाठिंबा देण्याच्या निर्णयाविषयी (Sharad Pawar on BJP Support) सुरुवातीला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना कल्पना दिल्याचा गौप्यस्फोट राष्ट्रवादीचे विधीमंडळ नेते अजित पवार यांनी केला.

सुरुवातीला शरद पवारांना याविषयी माहिती होती... : अजित पवार


मुंबई : भाजपला पाठिंबा देण्याच्या निर्णयाविषयी (Sharad Pawar on BJP Support) सुरुवातीला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना कल्पना दिल्याचा गौप्यस्फोट राष्ट्रवादीचे विधीमंडळ नेते अजित पवार यांनी केला. अजित पवारांनी (Sharad Pawar on BJP Support) उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर हा दावा केला. त्यामुळे शरद पवारांच्या भूमिकेवर संशय व्यक्त केला जात आहे.

अजित पवार म्हणाले, “निवडणुकीचा निकाल 24 ऑक्टोबरला आला. तेव्हापासून कोणीही सरकार स्थापन करु शकले नाही. महाराष्ट्रात इतके वेगवेगळे प्रश्न आहेत. शेतकऱ्यांचे मोठे प्रश्न आहेत. ते प्रश्न सोडवण्यासाठी सरकार स्थापन होणं महत्त्वाचं होतं. म्हणूनच आम्ही हा निर्णय घेतला आणि आज सरकार स्थापन केले. बैठकीतील चर्चा संपतच नव्हती. मागील 1 महिन्यापासून ही चर्चा सुरु होती. कुठल्याही प्रकारचा मार्ग निघत नव्हता. नको त्या गोष्टींच्या मागण्या वाढल्या होत्या. त्यामुळे हे तिन पक्ष एकत्र येऊन असे प्रश्न तयार होत असतील, तर पुढे स्थिर सरकार कसं मिळणार असा मला प्रश्न पडला. राज्याला स्थिर सरकारची गरज आहे. स्थिर सरकारच्या दृष्टीनेच मी हा निर्णय घेतला. या निमित्ताने राज्यातील तमाम जनतेला मी शुभेच्छा देतो. जनतेने जो विश्वास टाकला आहे त्या विश्वासाला कोठेही तडा जाऊ न देता अतिशय चांगल्या पद्धतीचा कारभार करु.”

मी सुरुवातीच्या काळात या सर्व गोष्टी शरद पवारांना सांगितल्या होत्या. त्यांना याविषयी माहिती होती. परंतू नंतरच्या काळात… मी त्यांना सुरुवातीपासून सांगत होतो की आपण स्थिर सरकारविषयीच निर्णय घ्यायला हवा. लोकांनी असा कौल दिला की कुणत्याही पक्षाला बहुमत नाही. त्यामुळे कोणी तरी दोघांनी किंवा तिघांनी एकत्र आल्याशिवाय सरकार स्थापन होत नव्हतं. शेवटी दोघांनी एकत्र येऊन सरकार स्थापन करणं केव्हाही चांगलं असतं. मागे देखील काँग्रेस आणि आम्ही 15 वर्षे सरकार चालवलं. भाजप शिवसेनेने 5 वर्ष सरकार चालवलं. म्हणून आम्ही हा निर्णय घेतला.

सत्तास्थापनेनंतर बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, मी सर्वात प्रथम आमचे नेते पंतप्रधान नरेंद्र मोदी, अध्यक्ष अमित शाह यांचे आभार मानतो. महाराष्ट्राच्या जनतेने स्पष्ट जनादेश दिला होता, तरीही आमचा मित्रपक्ष शिवसेनेने युती तोडली. त्यामुळे अखेर आम्ही महाराष्ट्राला स्थिर सरकार देण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या विधीमंडळ नेत्यांनी आम्हाला पाठिंबा दिला. त्यानंतर आम्ही राज्यपालांकडे दावा केला. राज्यपालांनी राष्ट्रपतींकडे याबाबत माहिती देऊन आज आम्हाला शपथविधीसाठी बोलावलं. आम्ही स्थिर सरकार देऊ. शेतकऱ्यांच्या पाठीशी उभं राहू.”

अजित पवारांकडून राष्ट्रवादीच्या सर्व आमदारांचं पाठिंबा पत्र मिळालं : गिरीश महाजन

गिरीश महाजन म्हणाले, “भाजपकडे स्पष्ट बहुमत आहे. राष्ट्रवादीचे 54-55 आणि आमचे 105 भाजपचे आमदार आहेत. याव्यतिरिक्त अनेक अपक्ष आमदार देखील आमच्यासोबत आहेत. मला वाटतं आम्हाला पाठिंबा देणाऱ्या आमदारांची संख्या 170 च्या पुढे जाईल. आम्ही महाराष्ट्राला पुढील 5 वर्ष स्थिर सरकार देऊ. अजित पवार हे राष्ट्रवादीच्या विधीमंडळाचे नेते आहेत. त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्व आमदारांच्या पाठिंब्याचं पत्र राज्यपालांना दिलं आहे. याचाच अर्थ संपूर्ण राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार यांच्यासोबत आहे.”

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI