Sharad Pawar on Munde | पक्ष म्हणून काळजी घ्यावी लागेल, तातडीने निर्णय घेऊ : शरद पवार

पक्ष म्हणून आम्हाला निर्णय घ्यावे लागतील, कुणावर अन्याय होणार नाही, याची काळजी घ्यावी लागेल, अशी प्रतिक्रिया शरद पवार यांनी दिली आहे.

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 14:15 PM, 14 Jan 2021

मुंबई: सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आता निर्माण होऊ लागली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी या प्रकरणावर पहिल्यांदाच आपली भूमिका मांडली आहे. पक्ष म्हणून आम्हाला निर्णय घ्यावे लागतील, कुणावर अन्याय होणार नाही, याची काळजी घ्यावी लागेल, अशी प्रतिक्रिया शरद पवार यांनी दिली आहे. तसंच या प्रकरणावर तातडीने निर्णय घेऊ, असंही पवार म्हणाले.(Sharad Pawar’s first reaction to the allegations against Dhananjay Munde)

“माझ्या मते धनंजय मुंडे यांच्यावरील आरोपाचं स्वरुप गंभीर स्वरुपाचं आहे. साहजिकच याबाबत पक्ष म्हणून विचारविनिमय करावा लागेल. मुंडे यांनी त्यांची भूमिका वैयक्तिक माझ्यापुढे मांडली आहे. मात्र, अशा प्रकरणात निर्णय सर्वानुमते घ्यावे लागतात. त्यामुळे पक्षाच्या प्रमुख सहकाऱ्यांशी चर्चा करुन निर्णय घेऊ,” असं शरद पवार यांनी म्हटलंय.

धनंजय मुंडेंनी त्यांच्या भूमिका मांडली- पवार

“धनंजय मुंडे यांनी स्वत: माझी भेट घेतली आहे. मला भेटून एकंदर त्यांच्यावरील आरोपाची सविस्तर माहिती दिली आहे. त्यानुसार त्यांचे काही व्यक्तींशी घनिष्ठ संबंध होते. त्यानंतर काही तक्रारी झाल्या. त्याबाबत चौकशी सुरु झालेली असेल. हे प्रकरण इथपर्यंत येईल, व्यक्तिगत हल्ले होतील असा अंदाज त्यांना असावा. त्यामुळे त्यांनी उच्च न्यायालयात यापूर्वीच आपली भूमिका मांडली आहे”, असंही शरद पवार म्हणाले.

‘आधी मला निर्णय घेऊ द्या’

“धनंजय मुंडे प्रकरणात आधी मला निर्णय घेऊ द्या, नंतर मुख्यमंत्र्यांचं बघू. आम्हाला आमच्या सहकाऱ्यांशी चर्चा करुन पुढची भूमिका काय असावी याचा निर्णय विचाराने होईल. त्यासाठी आम्ही आमचा निर्णय घेऊ, निर्णयासाठी आम्हाला मुख्यमंत्र्यांची वाट पाहावी लागणार नाही. आम्हाला पक्षप्रमुख म्हणून निर्णय घ्यावा लागेल. त्यात कुणावरही अन्याय होणार नाही, हे ही पाहावं लागेल,” असंही पवार म्हणाले.

‘नवाब मलिकांवर वैयक्तिक आरोप नाही’

नवाब मलिक यांच्यावर वैयक्तिक आरोप नाही. त्यांच्या नातेवाईकांवर झाला आहे. त्याबाबत संबंधित यंत्रणेनं अटक केलं आहे. त्यामुळे त्या यंत्रणेनं पूर्ण सहकार्य केलं आहे. तपास यंत्रणा त्या पद्धतीनं काम करेल अशी अपेक्षा आहे. त्यांना पूर्ण सहकार्य केलं जाईल, अशा शब्दात शरद पवार यांनी नवाब मलिक यांची पाठराखण केलीय.

संबंधित बातम्या:

धनंजय मुंडेंवरील आरोपाचं स्वरुप गंभीर, पक्ष म्हणून विचारा करावा लागेल : शरद पवार रोखठोक

पक्ष म्हणून काळजी घ्यावी लागेल, तातडीने निर्णय घेऊ : शरद पवार

धनंजय मुंडेंनी राजीनामा दिला का? शरद पवार म्हणतात, “आरोप गंभीर…”