शिर्डी नगरपंचायत नगराध्यक्षपदी भाजपचा झेंडा, विखे समर्थकांमुळे तीन नगरसेवकात जादू

राधाकृष्ण विखे भाजपमध्ये आल्यावरही काँग्रेसच्या‌ चिन्हावर निवडून आलेले समर्थक नगरसेवक भाजपच्या पाठीशी होते

  • मनोज गाडेकर, टीव्ही 9 मराठी, शिर्डी
  • Published On - 17:41 PM, 4 Dec 2020

शिर्डी : विधानपरिषदेवरील पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघात भाजपला धक्क्यावर धक्के बसत असताना शिर्डीतून पक्षासाठी दिलासादायक बातमी आहे. शिर्डी नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदी भाजपने झेंडा रोवला आहे. विशेष म्हणजे केवळ तीन नगरसेवक असतानाही भाजपला नगराध्यक्षपदाची खुर्ची मिळाली. भाजपचे दिग्गज नेते आणि माजी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) समर्थक जगन्नाथ गोंदकर ‌यांनी अर्ज ‌माघारी घेतल्याने शिवाजी गोंदकर नगराध्यक्ष पदी विराजमान झाले. (Shirdi Nagar Panchayat Election BJP Shivaji Gondkar won)

विखे समर्थकांचा भाजप उमेदवाराला पाठिंबा

शिर्डी नगरपंचायतीत भाजपचे नेते राधाकृष्ण विखे पाटील यांचं वर्चस्व आहे. नगरपंचायतीत एकूण 17 पैकी अवघे तीन नगरसेवक भाजपचे आहेत. मात्र राधाकृष्ण विखे काँग्रेस सोडून भाजपमध्ये आल्यावरही काँग्रेसच्या‌ चिन्हावर निवडून आलेले विखे समर्थक नगरसेवक भाजपच्या पाठीशी होते. राधाकृष्ण विखेंच्या गटातील नगरसेवकांनी भाजप उमेदवाराला पाठिंबा दिला आणि जगन्नाथ गोंदकर ‌यांनी नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीतील अर्ज मागे घेतला. त्यामुळे भाजपचं नगराध्यक्षपदाचं स्वप्न साकार झालं.

अहमदनगरचा प्रवरा पॅटर्न

अहमदनगर जिल्ह्यातील ‘प्रवरा पॅटर्न’ नेहमीच चर्चेचा विषय ठरत असतो. शिर्डी नगरपंतायतीच्या नगराध्यक्षपदाच्या निवडीतही प्रवरा पॅटर्न नगराध्यपदी कोणाची वर्णी लावणार, याकडे शिर्डीकरांचं लक्ष लागलं होतं. विखे समर्थक जगन्नाथ गोंदकर, भाजपचे जुने नेते शिवाजी गोंदकर आणि शिवसेनेच्या अनिता जगताप नगराध्यक्षपदाच्या शर्यतीत होते. (Shirdi Nagar Panchayat Election BJP Shivaji Gondkar won)

शिर्डीत विखे पाटलांचं वर्चस्व

शिर्डी नगरपंचायतीत नगरसेवकांच्या बहुमतावर नगराध्यक्ष ठरवला जातो. माजी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा ‌नगरपंचायतीवर वरचष्मा राहिला आहे. पाच वर्षांच्या कालावधीत अडीच वर्ष एकाला तर सव्वा-सव्वा वर्ष अन्य उमेदवाराला संधी देण्याचा प्रवरा पॅटर्न प्रसिद्ध आहे. 2014 च्या नगरपंचायत निवडणुकीत विखे पॅनलचे 10, भाजपचे 03, शिवसेना आणि मनसेचे प्रत्येकी एक, तर दोन अपक्ष नगरसेवक निवडून आले आहेत.

शर्यतीत कोण-कोण होतं?

विखे पाटील भाजपमध्ये गेल्यानंतर हे संख्याबळ 10 वरुन 13 असे झाले. विखे समर्थकांतून जगन्नाथ गोंदकर, भाजपचे नगरसेवक शिवाजी गोंदकर आणि शिवसेनेच्या अनिता जगताप यांच्यात चुरस होती. जगन्नाथ गोंदकर हे विखे पाटील समर्थक तर शिवाजी गोंदकर हे भाजपचे एकनिष्ठ कार्यकर्ते आहेत. अनिता जगताप या शिवसेनेच्या चिन्हावर निवडून आल्या असल्या तरी त्यांनाही विखेंचा आशिर्वाद मिळतो का, याकडे सर्व शिर्डीकरांच्या नजरा लागल्या होत्या. मात्र भाजपच्या उमेदवारालाच खुर्ची मिळाली आहे.

संबंधित बातम्या :

शिर्डी मतदारसंघात काँग्रेसला मदत नाही, विखे समर्थकांचा पवित्रा

(Shirdi Nagar Panchayat Election BJP Shivaji Gondkar won)