शिवसैनिकांचा निर्धार, किरीट सोमय्यांना पाडणारच!

शिवसैनिकांचा निर्धार, किरीट सोमय्यांना पाडणारच!

मुंबई: आगामी लोकसभा निवडणुकीत शिवसेना भाजपची युती होणार की नाही याची चर्चा असताना, शिवसेनेने नवा पवित्रा घेतला आहे. शिवसेनेने थेट भाजप खासदार किरीट सोमय्या यांना विरोध केला आहे. कारण युतीचा उमेदवार जर किरीट सोमय्या असतील तर त्यांना पाडू असा थेट इशारा शिवसेना विभागप्रमुखांनी दिला.

लोकसभा निवडणुकीसाठी शिवसेनेनं जय्यत तयारी सुरु केली आहे. गेले तीन आठवडे ‘मातोश्री’वर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत पदाधिकाऱ्यांच्या आढावा बैठका सुरु आहेत. या बैठकीत प्रत्येक लोकसभा मतदार संघातील सखोल माहिती घेतली जात आहे. त्यानुसारच शिवसेनेची निवडणूक रणनीती ठरवली जात आहे. आज मुंबईतील लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेतला गेला आहे. मुंबईत सहापैकी शिवसेनेचे तीन विद्यमान खासदार आहेत. तर इतर तीन ठिकाणी भाजपचे खासदार आहेत. मात्र युती संदर्भात कोणतीच ठोस भूमिका स्पष्टं झालेली नसल्यामुळे, शिवसेना सर्वच लोकसभा मतदारसंघाची सज्जता ठेवताना दिसत आहे.

आजच्या बैठकीत सर्वाधिक लक्षवेधक बैठक झाली ती, ईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघाची. या मतदारसंघात खासदार आहेत भाजपचे किरीट सोमय्या. युती तुटल्यानंतर शिवसेनेवर सर्वाधिक टिका करुन, युतीत दरी निर्माण करणारे भाजप खासदार किरीट सोमय्यांवर शिवसैनिक आजही भयंकर संतप्त आहेत.

मुंबई महापालिका निवडणूक प्रचारात तर मुलुंडमध्ये किरीट सोमय्यांच्या अंगावरही शिवसैनिक धावून गेले होते. त्यामुळे दोन्ही पक्षातील वितुष्ट पाहता, ईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघात शिवसैनिकांनी आक्रमकपणा कायम ठेवला आहे. जर किरीट सोमय्या हें शिवसेना- भाजप युतीचे असतील, तर शिवसेना किरीट सोमय्यांना पाडणार, असा पण शिवसैनिकांनी केल्याचं शिवसेना विभागप्रमुखांनी टीव्ही 9 मराठीला सांगितले.

त्यामुळे किरीट सोमय्या यांची उमेदवारी युतीचं भवितव्यही आता ठरणार आहे. भाजपने किरीट सोमय्या यांची उमेदवारी कायम ठेवली तर संतप्त शिवसैनिक आक्रमकपणे विरोधात काम करणार आहेत.

Published On - 4:01 pm, Sat, 9 February 19

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI