आता 'एका युतीची दुसरी गोष्ट' सुरु : उद्धव ठाकरे

"मधल्या काळात शिवसेना आणि भाजपमध्ये दुरावा आला होता, मात्र आता तो दुरावा नाहीसा झालाय."

आता 'एका युतीची दुसरी गोष्ट' सुरु : उद्धव ठाकरे

मुंबई : मधल्या काळात शिवसेना आणि भाजपमध्ये दुरावा आला होता, मात्र आता तो दुरावा नाहीसा झालाय. आता ‘एका युतीची दुसरी गोष्ट’ सुरु झाली आहे, असे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी म्हटलं. मुंबईत शिवसेनेच्या 53 व्या वर्धापन दिनानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह शिवसेनेचे सर्व नवनिर्वाचित खासदार आणि पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपापल्या भाषणातून आगामी विधानसभेसाठी शिवसेना-भाजप एकदिलाने लढेल, हे स्पष्ट केले. त्यामुळे शिवसेनेच्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने शिवसेना-भाजपच्या विधानसभेसाठीच्या युतीवर शिक्कामोर्तबही झालं आहे.

शिवसेना-भाजप युतीवर उद्धव ठाकरे काय म्हणाले?

“वेडात मराठे वीर दौडले सात, आता आपण (शिवसेना-भाजप) सात नव्हे, ‘एक साथ’ लढायचंय. मधल्या काळातील शिवसेना-भाजपमधील दुरावा आता नाहीसा झालाय.”, असे उद्धव ठाकरे म्हणाले. तसेच, “आता ‘एका युतीची पुढची गोष्ट’ सुरु” असे म्हणत उद्धव ठाकरे यांनी विधानसभेत शिवसेना-भाजप युती असेल असे स्पष्ट करत देत कामाला लागण्याचे आदेश दिले.

काँग्रेसवर उद्धव ठाकरेंची सडकून टीका

“ज्यांचा पराभव झाला, त्याबद्दल मला आनंद आहे, कारण सावरकरांना डरपोक म्हणणाऱ्यांचा पराभव झाला आहे. नायक की खलनायक ठेवणारे तुम्ही कोण?” अशी टीका उद्धव ठाकरेंनी काँग्रेसवर केली. तसेच, देशद्रोहाचे कलम काढणाऱ्यांचा पराभव झाला, याबद्दल मला अभिमान आहे, असेही उद्धव ठाकरे म्हणाले.

पाहा उद्धव ठाकरेंचं अनकट भाषण :

मुख्यमंत्र्यांचीही उपस्थिती

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही शिवसेनेच्या वर्धापन दिनाच्या सोहळ्यात उपस्थिती लावली. यावेळी मुख्यंमत्र्यांनी शिवसेना-भाजप युतीवर भाष्य केले. ते म्हणाले, “शिवसेना-भाजप ही भारतात सर्वात जास्त काळ चाललेली युती आहे. भाजप आणि शिवसेना कार्यकर्त्या मना-मनामध्ये शिवसेना-भाजप युती व्हावी असे होते. देशात आणि महाराष्ट्रात युतीला मिळालेलं यश हे अभूतपूर्व आहे. शिवसेनेचे शिवसैनिक आणि भाजपाचे कार्यकर्ते हे या विजयाचे खरे शिल्पकार आहेत.”

मुख्यमंत्रिपदाच्या चर्चेवर फडणवीस काय म्हणाले?

“मुख्यमंत्री कोण याची चर्चा मीडियासाठी राहू द्या. माझ्या कार्यकर्त्यांचा माझ्यावर आणि शिवसैनिकांचा उद्धव साहेब ठाकरे यांच्यावर विश्वास आहे. त्यामुळे या चर्चा कडे दुर्लक्ष करा.” असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजप आणि शिवसेना कार्यकर्त्यांना केलं.

पाहा मुख्यमंत्र्यांचं अनकट भाषण :

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *