Anil Rathod | सलग 25 वर्ष आमदारकी, शिवसेनेचे माजी मंत्री अनिल राठोड यांचे निधन

अनिल राठोड यांनी अहमदनगर शहर मतदारसंघात सलग 25 वर्ष लोकप्रतिनिधित्व केले होते.

Anil Rathod | सलग 25 वर्ष आमदारकी, शिवसेनेचे माजी मंत्री अनिल राठोड यांचे निधन

अहमदनगर : शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री अनिल राठोड यांचे निधन झाले. कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने त्यांच्यावर खाजगी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु होते. (Shivsena Ahmednagar Ex Minister Anil Rathod Dies)

वयाच्या 70 व्या वर्षी अनिल राठोड यांनी अखेरचा श्वास घेतला. कोरोनाचे निदान झाल्यानंतर अहमदनगरमधील खाजगी रुग्णालयात उपचार सुरु होते, मात्र त्यांना हृदयविकाराचा जोरदार धक्का बसला. त्यानंतर आज (बुधवार 5 ऑगस्ट) पहाटे सहा वाजताच्या सुमारास त्यांचे निधन झाले.

अनिल राठोड यांनी अहमदनगर शहर मतदारसंघात सलग 25 वर्ष लोकप्रतिनिधित्व केले होते. शिवसेनेच्या तिकिटावर 1990 ते 2014 अशा सलग पाच टर्म ते आमदारपदी निवडून आले होते. 2009 मध्ये त्यांच्याकडे शिवसेना उपनेतेपदाची जबाबदारी सोपवण्यात आली. शिवसेना-भाजप महायुती सरकारच्या काळात त्यांच्याकडे महसूल राज्यमंत्रीपदाची धुरा होती.

अनिल राठोड यांच्या पश्चात पत्नी, कन्या, पुत्र विक्रम राठोड आणि सून असा परिवार आहे. त्यांच्या पार्थिवावर आज सकाळी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

शिवसैनिकांचा ‘अनिलभैया’ गेला

अनिल  राठोड यांच्या निधनाने जिल्ह्यातील शिवसैनिकांना मोठा धक्का बसला आहे. तर सर्वच स्तरातून हळहळ व्यक्त केली जात आहे. विशेष म्हणजे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दूरध्वनीवरुन त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली होती.

सहकार आणि साखरसम्राटांच्या जिल्ह्यात शिवसेनेची ताकद वाढवण्याचे काम राठोड यांनी केले. राठोड यांची ‘मोबाईल नेता’ अशी ओळख निर्माण झाली होती. सर्वसामान्यांच्या हाकेला एका फोनवर धावून जात ते लोकांचे प्रश्न सोडवत असत. तसेच सर्वत्र ते ‘भैया’ नावाने प्रसिद्ध होते.

हेही वाचा : माजी मुख्यमंत्री शिवाजीराव पाटील निलंगेकर यांचं निधन

महाराष्ट्र युवा काँग्रेसचे अध्यक्ष सत्यजित तांबे यांनी अनिल राठोड यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. “अनिलभैय्या राठोड आयुष्यभर मा. शिवसेनाप्रमुखांचे निष्ठावान सैनिक राहिले. चांगला माणूस गेला, भावपूर्ण श्रध्दांजली !” अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या आहेत.

माजी मुख्यमंत्री कालवश

दरम्यान, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री शिवाजीराव पाटील निलंगेकर यांचं निधन झालं. वयाच्या 91 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. निलंगेकर यांनी काही दिवसांपूर्वीच कोरोनावर मात केली होती, मात्र आज (बुधवार 5 ऑगस्ट) पहाटे 2.30 वाजताच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली.

(Shivsena Ahmednagar Ex Minister Anil Rathod Dies)

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *