LIVE | होऊ दे चर्चा! आजचा दिवस ‘अंतिम’ बैठका आणि चर्चांचा

सत्तास्थापनेच्या चर्चांचं केंद्र राजधानी दिल्लीवरुन आता पुन्हा मुंबईकडे शिफ्ट झालं असून आज अंतिम निर्णयाची शक्यता आहे

LIVE | होऊ दे चर्चा! आजचा दिवस 'अंतिम' बैठका आणि चर्चांचा

मुंबई : विधानसभा निवडणुकांचे निकाल लागून जवळपास एक महिना पूर्ण होत आला. परंतु महाराष्ट्रात सत्तास्थापनेच्या हालचालींनी म्हणावा तसा वेग पकडलेला दिसत नाही. काँग्रेस आणि राष्ट्रवादीमध्ये सर्व मुद्द्यांवर सहमती झाल्यानंतर आजच्या दिवसात ठोस निर्णय होण्याची शक्यता आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेचं अभूतपूर्व ‘महासेनाआघाडी’ सरकार दृष्टीक्षेपात असून आजच्या दिवसात बैठका आणि चर्चांच्या अखेरीस अंतिम निर्णय हाती येण्याची (Shivsena Congress NCP Meeting Updates) चिन्हं आहेत.

सत्तास्थापनेच्या चर्चांचं केंद्र राजधानी दिल्लीवरुन आता पुन्हा मुंबईकडे शिफ्ट झालं आहे. मुंबईत काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडीतील घटकपक्षांची बैठक होणार आहे. यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये आज सकाळी 11 वाजता निवडणुकीपूर्वी आघाडी केलेल्या मित्रपक्षांशी चर्चा करणार आहे. त्यांचं मत आजमावल्यानंतर पुढील दिशेने वाटचाल होईल.

आघाडीतील घटकपक्षांच्या बैठकीनंतर काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांची शिवसेना नेत्यांसोबत बैठक होईल. या बैठकीत ‘महासेनाआघाडी’बाबत एकमत झालं, तर तिन्ही पक्षांचे नेते एकत्रितपणे याची घोषणा करु शकतात.

काँग्रेस आमदारांची विधानभवनात संध्याकाळी चार वाजताच्या सुमारास बैठक होणार आहे. या बैठकीत काँग्रेसचा विधीमंडळ गटनेता निवडला जाईल.

भाजपचं एक पाऊल मागे, शिवसेनेला सुरुवातीची अडीच वर्ष मुख्यमंत्रिपदाची ऑफर?

महासेनाआघाडी शनिवार 23 नोव्हेंबरला सत्तास्थापनेचा दावा करण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यासाठी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे राजभवनात भेटीची वेळ घेण्यात येईल. येत्या सोमवारी नव्या सरकारचा शपथविधी सोहळा होण्याची शक्यता आहे. याच पार्श्वभूमीवर काँग्रेस नेते मल्लिकार्जुन खर्गे आणि के.सी. वेणूगोपाल मुंबईत येणार आहेत.

काल काय घडलं?

दिल्लीत काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या स्वतंत्र बैठका पार पडल्यानंतर आघाडीची एकत्रित बैठक झाली. त्यानंतर पृथ्वीराज चव्हाण आणि नवाब मलिक यांनी काँग्रेस-राष्ट्रवादीत सर्व मुद्द्यांवर एकमत झालं असून मुख्यमंत्रिपदाबाबत अद्याप ठरलेलं नाही, असं स्पष्ट केलं.

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार दिल्लीहून मुंबईत परतल्यानंतर रात्री 11.15 वाजताच्या सुमारास शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि आमदार आदित्य ठाकरे यांनी पवारांच्या मुंबईतील सिल्व्हर ओकमधील निवासस्थानी जवळपास 1 तास 10 मिनिटं चर्चा (Shivsena Congress NCP Meeting Updates) केली.

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI