'राष्ट्रवादीच्या आमदारांचे निधींबाबत लाड, आम्ही मात्र ताटकळत', शिवसेना आमदारांचा मुख्यमंत्र्यांकडे पुन्हा तक्रारींचा पाढा

"आपलं सरकार असतानाही कामं होत नाहीत", अशी तक्रार शिवसेना आमदारांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडे केली (Shivsena MLAs complaint to CM Uddhav Thackeray).

'राष्ट्रवादीच्या आमदारांचे निधींबाबत लाड, आम्ही मात्र ताटकळत', शिवसेना आमदारांचा मुख्यमंत्र्यांकडे पुन्हा तक्रारींचा पाढा

मुंबई : शिवसेना आमदारांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यापुढे पुन्हा तक्रारींचा पाढा वाचला आहे. उद्धव ठाकरे सध्या राज्यभरातील शिवसेना आमदारांशी संवाद साधत आहेत. त्यांनी काल (28 सप्टेंबर) पश्चिम महाराष्ट्रातील शिवसेना आमदारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे तक्रारी केल्या. विशेष म्हणजे त्यांच्या तक्रारींचा रोख उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे असलेल्या वित्त विभागाकडे होता (Shivsena MLAs complaint to CM Uddhav Thackeray).

“राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांचे निधींबाबत लाड होतात. आम्हाला मात्र ताटकळत ठेवलं जातं. एखाद्या योजनेअंतर्गत कामे देताना राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांना झुकते माप दिले जाते. विशेषतः राष्ट्रवादी काँग्रेसचे पालकमंत्री असलेल्या जिल्ह्यांमध्ये निधींबाबत दुजाभाव केला जातो”, अशी तक्रार शिवसेना आमदारांनी उद्धव ठाकरे यांच्याकडे केली.

“आपलं सरकार असतानाही कामं होत नाहीत. मतदारसंघासाठी निधी दिला जात नाही, निविदा प्रक्रिया पूर्ण झालेल्या कामांचे कार्यादेश काढले जात नाहीत”, असं आमदारांनी मुख्यमंत्र्यांना सांगितलं (Shivsena MLAs complaint to CM Uddhav Thackeray).

“लॉकडाऊनमुळे शासनाची आर्थिक स्थिती चांगली नाही. त्यामुळे आर्थिक अडचण आहे, असे आम्ही मतदारांना सांगतो. पण बाजूच्या मतदारसंघात कामे होत असतील आणि आमच्याकडे होत नसतील तर काय सांगायचे?”, अशीही कैफियत शिवसेनेच्या काही आमदारांनी मुख्यमंत्र्यांपुढे मांडली.

आमदारांच्या या तक्रारीवर मुख्यमंत्र्यांनी “संबंधितांशी बोलून, प्रसंगी आदेश देऊन तुमच्या तक्रारी दूर करेन”, असा शब्द दिला. दरम्यान, या बैठकांमध्ये मुख्यमंत्र्यांबरोबर प्रशासकीय अधिकारीही हजर राहत असल्याने, शिवसेना आमदारांना आपल्या भावना मनमोकळेपणाने मांडणे कठीण जात असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

शिवसेना आमदारांच्या याआधीही तक्रारी

शिवसेना आमदारांनी याआधीदेखील अशाप्रकारच्या तक्रारी मुख्यमंत्र्याकडे केल्या आहेत. उद्धव ठाकरे यांची गेल्या महिन्यात शिवसेना आमदारांसोबत पार पडलेल्या बैठकीतही अशाचप्रकारच्या तक्रारी करण्यात आल्या होत्या.  शिवसेनेच्या आमदारांपेक्षा राष्ट्रवादीच्या आमदारांची कामे जलद होतात, अशी तक्रार आमदारांनी केली होती.

“राष्ट्रवादी काँग्रेसकडे अर्थ खाते आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार अर्थमंत्री असल्याने त्यांच्या पक्षातील आमदारांची कामे पटापट होतात”, असा दावा सेना आमदारांनी केला होता. शिवसेनेच्या आमदारांच्या कामांना हवी तशी गती मिळत नसल्याची खंतदेखील आमदारांनी व्यक्त केली होती. त्यावेळीदेखील मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या सर्व समस्या सोडू, असा शब्द दिला होता. मात्र, शिवसेना आमदारांनी पुन्हा त्याच तक्रारी मुख्यमंत्र्याकडे केल्या आहेत.

संबंधित बातम्या :

शिवसेनेपेक्षा राष्ट्रवादीच्या आमदारांची कामे जलद, सेना आमदारांचा मुख्यमंत्र्यांकडे नाराजीचा सूर 

अजित दादा आऊट ऑफ वे जाऊन कामे करतात, एखाद्याचं नसेल झालं, त्याने मुख्यमंत्र्यांकडे तक्रार केली असेल : शशिकांत शिंदे

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *