तुम्ही सुरुवात केली असेल तर शेवट कसा करायचा हे आम्हाला माहिती : संजय राऊत

आम्ही लढत राहू, हे सरकार पुढील चार वर्ष नाही, तर त्यापुढे जाऊन हे सरकार कायम राहील,” असेही संजय राऊत म्हणाले. (Shivsena MP Sanjay Raut Criticism BJP On MLA Pratap Sarnaik ED Raid) 

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 13:20 PM, 24 Nov 2020

मुंबई : शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांच्या घरासह कार्यालयावर ईडीने सकाळीच छापेमारी केली. मनी लॉन्ड्रिंगप्रकरणी ही कारवाई सुरु असल्याची माहिती मिळत आहे. ईडीच्या या कारवाईच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेकडून आरोप-प्रत्यारोप केले जात आहे. तर भाजपकडून या कारवाईचे समर्थन केले जात आहे. (Shivsena MP Sanjay Raut Criticism BJP On MLA Pratap Sarnaik ED Raid)

आज जर तुम्ही सुरुवात केली असेल तर शेवट कसा करायचा हे आम्हाला माहिती आहे. आमच्या प्रत्येक आमदार, नेते, कार्यकर्त्याच्या घरासमोर ईडीने कार्यालय थाटलं, तरी आम्ही घाबरत नाही,” असा घणाघात संजय राऊत यांनी केला.

“ईडी किंवा अन्य कोणीही राजकीय पक्षाची शाखा असल्याप्रमाणे काम करु नये. ज्यांचे आदेश ते पाळत आहेत, त्या पक्षातील 100 लोकांची यादी मी पाठवून देतो. त्यांचे काय धंदे आहेत, ते काय उद्योग करतात, त्यांचं मनी लॉन्ड्रिंग कसं सुरु आहे, निवडणुकीत कसा पैसा येतो, कुठे ठेवला जातो, कसा वाटला जातो, बेनामी काय आणि नामी काय, ही कल्पना ईडीला नसली तरी आम्हाला आहे,” असा गौप्यस्फोटही राऊतांनी केला.

“आम्ही कोणालाही शरण जाणार नाही”

“केंद्रीय तपास यंत्रणांचा वापर करुन हे सरकार दबावाखाली येईल, असे कोणाला वाटत असेल, तर ते मूर्खाच्या अंदमानात फिरत आहे. सीबीआय ईडी काहीही असू द्या, काहीही झालं तरी सरकार, आमदार, नेते हे कोणालाही शरण जाणार नाहीत. आम्ही लढत राहू, हे सरकार पुढील चार वर्ष नाही, तर त्यापुढे जाऊन हे सरकार कायम राहील,” असेही संजय राऊत म्हणाले.

“काही यंत्रणांचा वापर करुन जे सरकारवर दबाव आणू इच्छितात किंवा आमदारांचे मनोबल तोडू इच्छिता त्यांनी लक्षात घेतलं पाहिजे हा महाराष्ट्र आहे. तुम्ही कितीही दबाव आणा, दहशत निर्माण करा. तुम्ही पुढची २५ वर्षे तुमचं सरकार येईल, हे स्वप्न विसरुन जा, ही आता काळ्या दगडावरची रेघ समजा,” असेही संजय राऊत म्हणाले.

“भाजपने सरळ लढाई करावी, यंत्रणांच्या आडून कारवाई करू नका”

“गेल्या काही दिवसांपासून ईडी, सीबीआय या यंत्रणा गुलाम आणि नोकर असल्यासारखे वागत असतील तरी आम्ही पर्वा करत नाही. आज प्रताप सरनाईक त्यांच्या घरी नाही आहेत. त्यांची मुले घरी आहेत. हे पाहून त्यांनी जी धाड टाकली ही नामर्दांगी आहे. भाजपने सरळ लढाई करावी. हे शिखंडीसारखे यंत्रणांच्या आडून कारवाई करू नका,” असेही राऊतांनी सांगितले.

“ED काय इंटरपोलला आणा, आम्ही घाबरत नाही. तपास करण्याची बंदी नाही. त्यातून पुरावे मिळाले तर कारवाई करू शकतात. पण तुम्हाला विरोधकाना गप्प करण्यासाठी जी नीती अवलंबतात ती तुमच्यावरही उलटू शकते. साम दाम दंड भेद यात आम्हीही डॉक्टरेट केली आहे. आमचा जन्म साम दाम दंड भेदातून झाला हे विसरू नका,” असेही राऊतांनी यावेळी भाजपला खडसावले. (Shivsena MP Sanjay Raut Criticism BJP On MLA Pratap Sarnaik ED Raid)

संबंधित बातम्या : 

MLA Pratap Sarnaik ED Raid Live | शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांच्या घर-कार्यालयावर ईडीचे छापे, सुपुत्र विहंग सरनाईक चौकशीसाठी ताब्यात

आम्ही कोणाच्या बापाला भीत नाही, नोटीसा कसल्या पाठवता, घरी या, संजय राऊतांचं थेट चॅलेंज

प्रताप सरनाईक यांच्यावरील ईडीची कारवाई योग्यच; सोमय्यांकडून समर्थन