Sanjay Raut News : वाल्मिक कराड, कृष्णा आंधळे हे सामाजिक कार्यकर्ते, म्हणून.. ; राऊतांची खोचक टीका
जिकडे सत्ता असणार टीकडे व्यभिचारी असणार. मुंडे, कराड, आंधळे सारखे लोक हे महायुतीच्या पक्षांतले सामाजिक कार्यकर्ते आहेत. त्यांनी मोठं सामाजिक काम केलेलं आहे, अशी टीका खासदार संजय राऊत यांनी केली आहे.
धनंजय मुंडे, कृष्णा आंधळे, वाल्मिक कराड हे सामाजिक कार्यकर्ते आहेत. गृहखातं सांभाळण्यासाठी आणि पोलीस खातं बघण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना राजकारणातून वेळच मिळत नाही. त्यामुळे त्यांचे हे सामाजिक कार्यकर्ते विनयभंग करतात, अशी खोचक टीका शिवसेना उबाठा गटाचे खासदार संजय राऊत यांनी केली आहे. आजपासून अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात होत आहे. तत्पूर्वी पत्रकार परिषद घेऊन राऊत यांनी महायुती सरकारवर निशाणा साधला. जिकडे सत्ताधारी तिकडे व्यभिचारी अशीही टीका त्यांनी केली.
यावेळी बोलताना संजय राऊत यांनी विधानसभा विरोधी पक्षनेतेपदावर शिवसेना उबाठाचा दावा असल्याचं देखील म्हंटलं. विधानसभेत विरोधी पक्षनेता नसेल तर भ्रष्टाचार वाढेल, असंही त्यांनी म्हटलं. देशातील अनेक राज्यात पाच सदस्य असताना देखील विरोधी पक्षनेतेपद दिले गेले असल्याची परंपरा आहे. महाराष्ट्रात तर विरोधी पक्षांकडे एकत्रित 50 आमदारांचे संख्याबळ आहे. महाराष्ट्राच्या विधानसभेला एक परंपरा आहे. त्यानुसार विरोधी पक्ष नेते नेतेपद देणे ही सरकारची जबाबदारी असल्याचंही राऊत म्हणाले. विरोधी पक्ष नेते पदावरील संभाव्य उमेदवार कोण असेल? याबाबत मात्र संजय राऊत यांनी उत्तर देण्याचं टाळलं.