जितेंद्र आव्हाडांविरुद्ध शिवसेनेच्या बड्या नेत्यांची थेट मुख्यमंत्र्यांकडे तक्रार

| Updated on: Jul 16, 2021 | 6:42 PM

आव्हाडांच्या कार्यशैलीवर शिवसेना नेते, आमदार आणि मंत्री नाराज आहेत. यामध्ये उद्योगमंत्री सुभाष देसाई, आमदार विनोद घोसाळकर, सुनील प्रभू यांनी मुख्यमंत्र्यांकडे तक्रार केली आहे. याआधी आमदार अजय चौधरी यांनीदेखील तक्रार केली होती.

जितेंद्र आव्हाडांविरुद्ध शिवसेनेच्या बड्या नेत्यांची थेट मुख्यमंत्र्यांकडे तक्रार
जितेंद्र आव्हाड, गृहनिर्माणमंत्री
Follow us on

मुंबई : शिवसेना विरुद्ध जितेंद्र आव्हाड असा संघर्ष पुन्हा एकदा बघायला मिळतोय. शिवसेना आमदारांनी जितेंद्र आव्हाडांची मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडे तक्रार केली आहे.   जितेंद्र आव्हाडांच्या कार्यशैलीवर शिवसेना नेते, आमदार आणि मंत्री नाराज आहेत. यामध्ये उद्योगमंत्री सुभाष देसाई, माजी आमदार विनोद घोसाळकर,राहुल शेवाळे, सुनील प्रभू यांनी मुख्यमंत्र्यांकडे तक्रार केली आहे. याआधी आमदार अजय चौधरी यांनीदेखील तक्रार केली होती. (Complaint of Shivsena leaders and MLAs to CM Uddhav Thackeray against the working style of Jitendra Awhad)

मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना नेते आणि आमदारांनी गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांच्याविरोधात तक्रार केली आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे. जितेंद्र आव्हाड यांच्या कार्यपद्धतीबाबत शिवसेनेच्या नेत्यांकडून मुख्यमंत्र्यांकडे ही तक्रार करण्यात आली आहे. यापूर्वीही शिवडीचे आमदार अजय चौधरी यांनी आव्हाडांविरोधात मुख्यमंत्र्यांकडे तक्रार करण्यात आली होती. तेव्हा मुख्यमंत्र्यांनी या तक्रारीची दखल घेत जितेंद्र आव्हाड यांनी टाटा रुग्णालयाला दिलेल्या सदनिकांच्या निर्णयाला स्थगिती दिली होती.

जयंत पाटील काय म्हणाले?

जितेंद्र आव्हाड यांच्याबद्दल जर सेनेच्या आमदारांनी मुख्यमंत्र्यांकडे तक्रार केली असेल. याबाबत आव्हाड आणि मुख्यमंत्र्यांची जर चर्चा होणार असेल तर काहीच चुकीचे नाही. तक्रार ही दुरुस्तीसाठीच असते. तीन पक्ष असल्यामुळे अशा छोट्या मोठ्या गोष्टी होत असतात, या फार महत्वाच्या आहेत असे वाटत नाही. तिन्ही पक्ष एकसंघपणे राज्य चालवत आहेत, असं मत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी व्यक्त केलंय.

जितेंद्र आव्हाडांच्या ड्रिम प्रोजेक्टला मुख्यमंत्र्यांची स्थगिती

गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या ड्रिम प्रोजेक्टला आणि पर्यायानं राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा धक्का बसला होता. कारण टाटा कॅन्सर रुग्णालयाला 100 सदनिका देण्याच्या जितेंद्र आव्हाड यांच्या निर्णयाला मुख्यमंत्री कार्यालयाकडून स्थगिती देण्यात आली. शिवसेनेचे शिवडीचे आमदार अजय चौधरी यांनी याबाबत तक्रार केली होती. त्यावर तपासून अहवाल सादर करावा तोपर्यंत स्थगिती देण्यात यावी असा शेरा मारत या निर्णयाला स्थगिती दिली होती. महत्वाची बाब म्हणजे काही दिवसांपूर्वीच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते टाटा कॅन्सर रुग्णालयाला या सदनिकांच्या चाव्या सुपूर्द करण्यात आल्या होत्या. मात्र आता या निर्णयाला स्थगिती दिली गेल्यामुळे आव्हाड आणि राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा धक्का मिळाल्याचं पाहायला मिळालं होतं.

जितेंद्र आव्हाड काय म्हणाले?

दरम्यान, मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या स्थगिती दिल्यानंतर जितेंद्र आव्हाड यांच्याशी संपर्क साधला असता, आपण हा निर्णय एका उदात्त भावनेनं घेतला होता. यामध्ये माझा कुठलाही स्वार्थ नाही. बाहेर गावाहून येणाऱ्या कॅन्सरच्या रुग्णांच्या नातेवाईकांची राहण्याची सोय व्हावी या एका उद्देशानं हा निर्णय घेण्यात आला होता. पण या निर्णयाला स्थगिती येणं ही दुर्देवाची बाब आहे. याबाबत आपण मुख्यमंत्र्यांपासून कुठलिही गोष्ट लपवून ठेवली नव्हती. ते आमचे विधिमंडळ पक्षाचे नेते आहेत. त्यामुळे मी कुठलाही निर्णय घेताना त्यांना कल्पना दिल्याशिवाय घेत नाही. म्हाडाच्या सदनिकांच्या चाव्या टाटा रुग्णालयाला सुपूर्द करतानाही आपण मुख्यमंत्र्यांना कल्पना दिली होती. मात्र, याबाबत काही गैरसमज झाले असावेत. आपण याबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा करू, अशी प्रतिक्रिया जितेंद्र आव्हाड यांनी दिली आहे. तर या निर्णयाला स्थगिती मिळाल्याबाबत त्यांनी खंतही व्यक्त केली होती.

मुख्यमंत्र्यांकडून 24 तासांत डॅमेज कंट्रोल

दरम्यान, मुख्यमंत्र्यांनी टाटा रुग्णालयाला म्हाडाच्या सदनिका देण्याच्या निर्णयाला स्थगिती दिल्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं होतं. त्यानंतर 24 तासांत मुख्यमंत्र्यांकडून डॅमेज कंट्रोल करण्याचा प्रयत्न झाल्याचं पाहायला मिळालं होतं. त्याबाबत खुद्द जितेंद्र आव्हाड यांनी माहिती दिली. टाटा रुग्णालयातील रुग्णांच्या नातेवाईकांसाठी 100 सदनिका देण्यात येत आहेत. काही स्थानिकांनी विरोध केल्याचं आमदारांनी मुख्यमंत्र्यांना सांगितलं, त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी त्याला स्थगिती दिली. पण मुख्यमंत्र्यांनी मला बोलावून घेतलं आणि सांगितलं की, त्याच परिसरात आजच्या आज जागा शोधून निर्णय घ्या. 15 मिनिटात निर्णय झाला. बॉम्बे डाईंगमध्ये 100 सदनिका देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, अशी माहिती आव्हाड यांनी त्यावेळी दिली होती.

संबंधित बातम्या :

कॅन्सर पेशंटच्या नातेवाईकांसाठी द्यायच्या घरांचं काय झालं?, आव्हाड भेटीला येताच शरद पवारांचा पहिला सवाल

थँक्यू आव्हाडसाहेब, टाटा कॅन्सर सेंटरला म्हाडाकडून 100 फ्लॅट्स

Complaint of Shivsena leaders and MLAs to CM Uddhav Thackeray against the working style of Jitendra Awhad