विजयानंतर श्रीपाद छिंदम शिवरायांसमोर नतमस्तक

अहमदनगर : महापालिका निवडणुकीतील विजयानंतर अहमदनगर महापालिकेचा वादग्रस्त माजी उपमहापौर श्रीपाद छिंदम छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून नतमस्तक झाला. महापालिका निवडणुकीत राजकीय पक्षांना धूळ चारुन विजय खेचून आणलेल्या श्रीपाद छिंदमने निवडणूक निकालानंतर छत्रपती शिवाजी महाराजांसमोर नतमस्तक होऊन विजय स्वीकारला. महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर श्रीपाद छिंदमला तडीपार करण्यात आलं होतं. ही मुदत संपल्यानंतर छिंदमने नगरमध्ये […]

विजयानंतर श्रीपाद छिंदम शिवरायांसमोर नतमस्तक
सचिन पाटील

| Edited By:

Jul 05, 2019 | 4:52 PM

अहमदनगर : महापालिका निवडणुकीतील विजयानंतर अहमदनगर महापालिकेचा वादग्रस्त माजी उपमहापौर श्रीपाद छिंदम छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून नतमस्तक झाला. महापालिका निवडणुकीत राजकीय पक्षांना धूळ चारुन विजय खेचून आणलेल्या श्रीपाद छिंदमने निवडणूक निकालानंतर छत्रपती शिवाजी महाराजांसमोर नतमस्तक होऊन विजय स्वीकारला.

महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर श्रीपाद छिंदमला तडीपार करण्यात आलं होतं. ही मुदत संपल्यानंतर छिंदमने नगरमध्ये येऊन स्वतःच्या कार्यालयात छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासह डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केलं.

शिवरायांबद्दल आक्षेपार्ह बरळल्यानंतर श्रीपाद छिंदमविरोधात राज्यभरात तीव्र संताप व्यक्त करण्यात आला होता. यानंतर त्याची भाजपमधूनही तातडीने हकालपट्टी करण्यात आली. श्रीपाद छिंदमवर अटकेची कारवाईही झाली होती. तो जामिनावर बाहेर आला आणि पुन्हा निवडणूक लढवली.

9 डिसेंबर रोजी अहमदनगर महापालिकेची निवडणूक झाली आणि 10 डिसेंबरला निकाल लागला. या निकालात श्रीपाद छिंदमने प्रतिस्पर्धी उमेदवारांना तब्बल 1970 मतांनी पराभूत केलं. श्रीपाद छिंदमच्या या विजयाबद्दल राज्यभर आश्चर्य व्यक्त केलं जातंय.

शिवरायांबद्दल आक्षेपार्ह बरळल्यामुळे सध्या तडीपारीची कारवाई भोगत असलेला श्रीपाद छिंदम प्रभाग क्रमांक नऊमधून तब्बल 1970 मतांनी निवडून आलाय. छिंदमला एकूण 4532 मतं मिळाली. तर त्याच्या विरोधातील भाजपचे उमेदवार प्रदिप परदेशी यांना 2562 मतं मिळाली. आपला विजय निश्चित असल्याचा दावा श्रीपाद छिंदमने मतदान केल्यानंतर केला होता.

कुणाला संपवायचं ते मतदारांच्या हातात असतं, मतदार हा राजा असून माझा विजय निश्चित आहे, असं श्रीपाद छिंदमने काल म्हटलं होतं. त्याच्यावर तडीपारीची कारवाई करण्यात आलेली असली तरी त्याला मतदानाची परवानगी देण्यात आली होती.

Non Stop LIVE Update

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें