मालेगाव बॉम्बस्फोट : प्रज्ञा ठाकूर, कर्नल पुरोहितला कोर्टात हजेरीचे आदेश

मालेगाव बॉम्बस्फोट : प्रज्ञा ठाकूर, कर्नल पुरोहितला कोर्टात हजेरीचे आदेश


मुंबई : मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपींना विशेष न्यायालयाने हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. या प्रकरणातील अनेक आरोपी जामिनावर असून ते सुनावणीसाठी हजर होत नाही. म्हणून न्यायालयाने त्यांना आठवड्यातून किमान एकदा हजर राहण्याचे सक्त आदेश दिले.

मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणाच्या सुनावणीला अनेकदा आरोपींचे वकीलही गैरहजर राहत होते. त्यामुळे सुनावणीत अडथळा येत होता. या पार्श्वभूमीवर आज विशेष न्यायालयाने हे आदेश दिले. त्यामुळे मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपी कर्नल पुरोहित आणि प्रज्ञा सिंग यांना यापुढे न्यायालयात हजर राहणे बंधनकारक करण्यात आले. न्यायालयाच्या पूर्वपरवानगीशिवाय यापैकी कोणीही गैरहजर राहू नये, असाच आदेश न्यायालयाने दिला आहे.

मालेगाव बॉम्बस्फोटाची तक्रार देऊन गुन्हा दाखल करणारे साक्षीदारही विशेष न्यायालयात उपस्थित राहणार आहेत. या साक्षीदारांची सरकारी वकीलांकडून तपासणी होईल. तसेच आरोपींच्या वकीलांकडून साक्षिदारांची उलट तपासणी होईल. मात्र, आज विशेष सरकारी वकील, तपास अधिकारी अनुपस्थित होते.

या प्रकरणी सरकारी वकिलांनी FIR ची मूळ प्रत आणि स्टेशन डायरी न्यायालयात दाखल केली होती. त्यावर आरोपी क्रमांक 10 च्या वकीलांनी त्यावर लेखी हरकत घेतली होती. यावर  आज सुनावणी होऊन आरोपी क्रमांक 10 च्या वकीलांचे म्हणणे फेटाळण्यात आले. तसेच सरकारी पक्षाने दाखल केलेला अभिलेख हा न्यायालयात जमा करुन घेण्याचे आदेश न्यायालयाने दिले. या प्रकरणाची पुढील सुनावणी आता 20 मे रोजी होणार आहे.