Special Story : मुस्लिम साबीर शेख, दलित बाळा नांदगावकर ते चंद्रकांत खैरे, बाळासाहेबांच्या हिंदुत्वाची धार!

मुस्लिम असलेल्या साबीर शेख यांना विधानसभेवर पाठवलं.... दलित असलेल्या बाळा नांदगावकरांना भुजबळांविरोधात उमेदवारी देऊन जायंट किलर ठरवलं आणि चंद्रकांत खैरे यांच्या जातीची मुठभर मतं नसताना त्यांना लोकसभेचं खासदार केलं हे बाळासाहेबांचं हिंदुत्व होतं...

Special Story : मुस्लिम साबीर शेख, दलित बाळा नांदगावकर ते चंद्रकांत खैरे, बाळासाहेबांच्या हिंदुत्वाची धार!
Follow us
| Updated on: Jan 23, 2021 | 12:54 PM

मुंबई : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांची आज 95 वी जयंती… बाळासाहेब ठाकरे यांच्या उत्तुंग व्यक्तिमत्त्वाचे किस्से, त्यांच्या खास आठवणी, पक्षीय राजकारणापलीकडची नाती, साहित्य, कला, क्रीडा, संस्कृती यांच्यावर असलेलं बाळासाहेबांचं प्रेम, बाळासाहेबांचे राजकीय निर्णय, त्यांचं व्यापक हिंदुत्व, त्यांच्या सहकाऱ्यांवर असलेलं त्यांचं विशेष प्रेम… यासंबंधी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते उल्हास पवार (Ulhas pawar) यांनी बाळासाहेबांच्या खास आठवणी जागवल्या आहेत. (Special report On  Shivsena Chief Balasaheb Thackeray Hindutva)

राज्यातल्या बदललेल्या नव्या राजकीय समीकरणांनुसार सध्या उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात महाविकास आघाडीचं सरकार सत्तेत आहे. परंतु हे सरकार बनलं कसं?, अगदी टोकाच्या विचारधारा एकत्र आल्या कशा? याची काही पूर्वपुण्याई आहे का?, याचा अभ्यास करताना बाळासाहेबांनी पक्षापलीकडे जात अनेकांशी जपलेली मैत्री, तिला वेळोवेळी घातलेलं खतपाणी, बुचकाळ्यात टाकणारे काही राजकीय निर्णय कारणीभूत असल्याचं उल्हास पवार सांगतात.

“अनेकदा भाषण करताना ‘अमुक तमुक फार उमद्या मनाचे नेते’ असं बोलण्याचा प्रघात आहे…. पण ते केवळ बोलण्यासाठी… मात्र मनाचा मोठेपणा आणि उमदेपणा काय असतो हे बाळासाहेबांनी दाखवून दिलं. जे आहे ते तोंडावर…. पाठीमागे बोलण्याची बाळासाहेबांना कधीच सवय नव्हती… त्यांच्या तोंडातून एखादं वाक्य निघालं की निघालं… त्यांचं वैशिष्ट म्हणजे ते त्यांच्या मतांवर ठाम राहायचे. मी हे बोललोच नव्हतो, असं त्यांनी त्यांच्या आयुष्यात कधीच म्हटलं नाही… याची आठवण सांगताना मराठवाडा विद्यापीठाच्या नामांतर संघर्षावेळी बाळासाहेबांनी एक वादग्रस्त वक्तव्य केलं. ‘घरात नाही पीठ मग कशाला हवंय विद्यापीठ’, या बाळासाहेबांच्या वक्तव्याने महाराष्ट्रात गदारोळ माजला. मोठी राजकीय कोंडी झालेली असताना देखील बाळासाहेबांनी त्यांचं वाक्य माघारी न घेता त्या वाक्यापाठीमागचा संदर्भ दिला. अशी अनेक उदाहरणे आपल्याला सांगता येतील”, असं उल्हास पवार सांगतात.

बाळासाहेबांची पक्षीय राजकारणापलीकडची नाती….

बाळासाहेब ठाकरे यांचं शरद पवार (Sharad Pawar) यांच्याशी खास नातं होतं. मैत्री कशी जपावी, याचा वस्तुपाठ जर कुणी घालून दिला असेल तर पवारसाहेब आणि बाळासाहेबांनी… वेगवेगळ्या राजकीय भूमिका परंतु मैत्रीच्या स्तरावर या भूमिका त्यांनी कधीच आड येऊ दिल्या नाहीत. अनेक मंचांवर या दोघांनी एकत्र हजेरी लावली. एकमेकांच्या कौतुकाचे सोहळे केले. गप्पांच्या मैफली रंगवल्या. सभा गाजवल्या. परंतु ज्यावेळी एखादी राजकीय भूमिका घेण्याची वेळ आली तेव्हा बाळासाहेबांनी खास ठाकरी प्रहार करत पवारांना झोडपून काढलं. कधी मैद्याचं पोतं म्हटलं तर स्काऊंड्रल (दुष्टपणा) असा नेमका शब्द वापरत पवारांवर हल्ला केला.

ज्यावेळी मैत्रीला जागण्याची वेळ आली (खरं तर ही सक्ती नव्हती) तेव्हा दोघांनीही ते कर्तव्य जबाबदारीने पार पाडलं. 2006 ला महाराष्ट्रातून राज्यसभेची एक जागा रिक्त होती. ती जागा काँग्रेसच्या वाट्याची होती. परंतु काँग्रेसने ही जागा राष्ट्रवादीला दिली. शरद पवार यांच्या कन्या सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांना राज्यसभेवर पाठवण्यात बाळासाहेबांचा मोठा वाटा होता. त्याचाही एक छानसा किस्सा आहे….

बाळासाहेबांच्या मनाचा मोठेपणा

“सुप्रिया राज्यसभेवर जाते आहे, असं मी ऐकलंय…. काय शरदबाबू….?” असं फोन करुन बाळासाहेबांनी शरद पवार यांना विचारलं. त्यावेळी, “होय पक्षातील लोकांचं तसं म्हणणं आहे. पण अजून चर्चा सुरु आहे…. मग सुप्रियाच्या विरोधात युतीचा उमेदवार कोण असेल?, असा प्रतिप्रश्न पवारांनी बाळासाहेबांना केला. त्यावर “हे काय विचारणं झालं? आपली सुप्रिया दिल्लीत जातीये आणि विरोधात उमेदवार….? आपली सुप्रिया बिनविरोध राज्यसभेवर जाईल”, असं बाळासाहेब पवारांना म्हणाले… त्यावर, “पण यासाठी भाजप तयार होईल का?”, असं पवारांनी बाळासाहेबांना विचारताक्षणी बाळासाहेब म्हणतात, “कमळाबाईची काळजी तुम्ही करु नका…!” आणि पुढे झालंही तसंच 2006 साली सुप्रिया सुळे यांची राज्यसभेवर बिनविरोध निवड झाली.

पुढे जेव्हा 2020 ला बाळासाहेबांच्या उपकाराची परतफेड करायची संधी पवारांना मिळाली तेव्हा मुंबईतल्या ट्रायडंट हॉटेलला बाळासाहेबांचे चिरंजीव उद्धव ठाकरे यांचं नाव मुख्यमंत्रिपदासाठी जाहीर करुन पवारांनी वर्तुळ पूर्ण केलं. यावेळी त्यांनी खास आपल्या मित्राची म्हणजेच बाळासाहेबांची आठवण जागवली. यावेळी ते भावविवश झालेले पाहायला मिळाले.

जॉर्ज फर्नांडिस आणि बाळासाहेब ठाकरे  (Balasaheb Thackeray George fernandes) यांची मैत्री विशेष होती. जॉर्ज यांची विचारधारा समाजवादी धारेतली तर बाळासाहेबांची विचारधारा प्रखर हिंदुत्ववादी… मात्र विचारधारेची आडकाठी त्यांनी कधी व्यक्तिगत जीवनात येऊ दिली नाही. दोघेही राष्ट्रीय दर्जाचे नेते. परंतु शेवटपर्यंत ते एकमेकांना अरे तुरे संबोधायचे. ‘अरे बाळ…. ते अरे जॉर्ज’ अशी हाक दोघेही एकमेकांना मारायचे. जॉर्ज आणि बाळासाहेब यांचे एकमेकांशी घरगुती आणि अगदी जिव्हाळ्याचे संबंध होते. अनेकवेळा ते ‘मातोश्री’वर यायचे ते खास मीनाताईंच्या हातच्या लज्जतदार जेवणासाठी… स्वत: जॉर्ज यांनी अनेकवेळा ही गोष्ट सांगितली. जॉर्ज यांचा शिवसेनेला केवळ राजकीय विरोधच नव्हता तर कामगार संघटनांच्या मुद्द्यांवर देखील जॉर्ज यांनी सेनेशी पर्यायाने बाळासाहेबांशी संघर्ष केला. मात्र हा संघर्ष केवळ मुद्द्यांवर झाला तो वैयक्तिक कधीच झाला नाही किंबहुना दोन्ही नेत्यांनी तो होऊ दिला नाही, असं उल्हास पवार सांगतात.

बाळासाहेब ठाकरेंच्या मनात यशवंतराव चव्हाण यांच्याबद्दल विलक्षण आदर होता. एक उत्तुंग व्यक्तिमत्व म्हणून बाळासाहेब यशवंतराव चव्हाणांकडे पाहायचे. 1960 साली मार्मिकच्या साप्ताहिकाचं उद्घाटन यशवंतराव चव्हाण यांच्या हस्ते बाळासाहेबांनी करवून घेतलं. तसंच बाळासाहेबांचे काँग्रेस नेते आणि दिवंगत माजी  मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्याशीही सलोख्याचे संबंध होते. नाईकांनी मुख्यमंत्रिपदाची धुरा हाती घेतल्यानंतर बाळासाहेबांनी खास मार्मिकमध्ये लेख लिहून महाराष्ट्राला वेगळ्या उंचीवर घेऊन जाणारा मुख्यमंत्री आपल्याला लाभला आहे”, अशी स्तुतीसुमने उधळली. याच काळात शिवसेनेला ‘वसंत सेना’ म्हणूनही हिणवलं गेलं.

बाळासाहेबांकडून काँग्रेसच्या कोणकोणत्या उमेदवारांचा प्रचार…?

कॉम्रेड डांगे यांच्या कन्या कम्युनिस्ट नेत्या रोझा देशपांडे यांच्याविरोधात रामराव आदिक यांना बाळासाहेबांना पाठिंबा दिला तसंच त्यांचा प्रचारही केला. हीच गोष्ट स.गो. बर्वे यांच्याबाबतही घडली. 1967 च्या निवडणुकीत सेनेने त्यांना पाठिंबा दिला होता. ग.दि. माडगुळकर यांचे ज्येष्ठ सुपुत्र श्रीधर माडगूळकर जेव्हा 1980 साली कॉंग्रेसकडून पुण्यात आमदारकीची निवडणूक लढवत होते तेव्हा बाळासाहेब छोटया राज ठाकरेंना घेऊन त्यांच्या प्रचारासाठी पुण्यात आले होते. शिवसेनेचा पाठिंबा होता तो केवळ गदिमा यांच्या प्रेमापोटी त्यात विशेष म्हणजे गदिमा काँग्रेसी विचारांचे… अशी किमया केवळ बाळासाहेबच करु शकतात, असं उल्हास पवार सांगतात.

बाळासाहेब ठाकरेंनी 1980 च्या निवडणुकीत शिवसेनेचा एकही उमेदवार उभा न करता काँग्रेसला पाठिंबा दिला होता. महाराष्ट्राचे दिवंगत माजी मुख्यमंत्री अब्दुल रहमान अंतुले आणि बाळासाहेब ठाकरे यांच्या मैत्रीमुळे बाळासाहेबांनी उमेदवार न देण्याचा निर्णय घेतला होता, असं सांगितलं जातं.

बाळासाहेबांच्या हिंदुत्वावर प्रबोधनकरांचे संस्कार

बाळासाहेब ठाकरे यांचं हिंदुत्व हे भाजपच्या हिंदुत्वापेक्षा खूप वेगळं होतं हे सांगताना उल्हास दादा पवार सांगतात, “प्रबोधनकारांनी जशी हिंदुत्वाची व्यापक व्याख्या सांगितली तसंच किंबहुना त्यांच्याच पावलांवर बाळासाहेबांनी पाऊल टाकलं. शिवसेनेच्या अनेक शाखांमध्ये ‘मानवतेची सेवा हाच खरा धर्म’ हा बोर्ड दिसतो हा त्याचाच परिपाक…” पुढे बोलताना ते म्हणतात की, “बाळासाहेबांनी राजकारण करताना कधी जात बघितली नाही. त्यांनी उमेदवाराला तिकीट देताना तू कोणत्या जातीचा आहेस? आणि तुझ्या जातीची त्या मतदारसंघात किती माणसं आहेत?, याची विचारपूस केली नाही… याचं जर उदाहरणच द्यायचं झालं तर तीन नावं प्रामुख्याने सांगता येतील…

पहिलं नाव साबीर शेख… बाळासाहेबांची मुस्लिम समाजावरची त्या काळची वक्तव्ये ऐकली तर मुस्लिम व्यक्ती शिवसेनेत काम करतोय, हे वाटणं अशक्यच… पण साबीर शेख यांना बाळासाहेबांनी ताकद दिली. त्यांच्या कधी जातीचा विचार केला नाही. त्यांना विधानसभेवर पाठवून खरी सेक्युलर भूमिका काय असते, हे बाळासाहेबांनी त्यांच्या कृतीतून दाखवून दिलं.

दुसरं नाव चंद्रकांत खैरे… चंद्रकांत खैरे हे औरंगाबादचे, मागास समाजातून आलेले…. पाचवीला पुजलेली गरिबी… पण बाळासाहेबांवर निस्सीम श्रद्धा… औरंगाबादेत त्यांच्या जातीची मुठभर मतं… पण त्यांच्यातलं संघटनकौशल्य आणि नेतृत्वगुण बाळासाहेबांनी हेरला आणि कडवट शिवसैनिक पुढे शिवसेनेचा प्रमुख नेता बनला… लोकसभेचा खासदार झाला…

तिसरं नाव बाळा नांदगावकर…. छगन भुजबळ यांनी शिवसेना सोडली होती. सेनेसाठी हा धक्का होता. भुजबळांना काहीही करुन ‘आस्मान दाखवायचं’ हे बाळासाहेबांनी ठरवलं. दलित समाजातून असलेल्या बाळा नांदगावकर यांना मुंबईच्या माझगावमधून बाळासाहेबांनी विधानसभेची उमेदवारी दिली. आणि नांदगावकरांनीही भुजबळांना पराभूत करत बाळासाहेबांचं स्वप्न पूर्ण केलं..

या तीनही नेत्यांच्या बाबतीत उमेदवारी देताना बाळासाहेबांनी कधी जात बघितली नाही. बघितली नाही म्हणण्यापेक्षा त्यांच्या जातीचा कधी उल्लेखही केला नाही, हे बाळासाहेबांचं मोठेपण होतं. बाळासाहेबांनी अशा अनेक माणसांना मोठं केलं. अनेक पदांवर बसवलं. बाळासाहेबांचं हिंदुत्व फक्त भाषणांपुरतं मर्यादित नव्हतं तर त्यांच्या कृतीतून त्यांनी पुरोगाम्यांनाही लाजवेल असा सेक्युलरपणा जपला, अशी खास टिप्पणी उल्हास पवार यांनी केली.

काँग्रेसने लादलेल्या आणीबाणीचं समर्थन आणि प्रतिभाताई पाटील, प्रणव मुखर्जी यांना राष्ट्रपतीपदासाठी पाठिंबा

बाळासाहेब ठाकरे यांच्या राजकीय जीवनातला सगळ्यात मोठा निर्णय म्हणजे त्यांनी आणीबाणीला दिलेलं समर्थन… बाळासाहेब ठाकरे त्यांच्या व्यंगचित्रातून इंदिरा गांधी यांच्यावर हल्लाबोल करायचे. पण तरीही इंदिरा गांधींनी 1975 साली देशावर लादलेल्या आणीबाणीचं समर्थन बाळासाहेबांनी केलं होतं. बाळासाहेबांनी आणीबाणीला दिलेल्या पाठिंब्याने सगळ्यांच्याच भुवया उंचावल्या होत्या.

2007 साली काँग्रेसच्या राष्ट्रपतीपदाच्या उमेदवार प्रतिभाताई पाटील आणि 2012 साली काँग्रेसचे राष्ट्रपतीपदाचे उमेदवार प्रणब मुखर्जी यांना बाळासाहेब ठाकरे यांनी एकमुखी पाठिंबा दिला होता. विशेष हे की दोन्ही वेळी ते भाजपसोबत युतीत होते. परंतु भाजप उमेदावारांच्या विरोधात मतदान करण्यास त्यांनी सेना नेत्यांना सांगितलं.

बाळासाहेबांचं कला साहित्य आणि खेळाबद्दलचं विशेष प्रेम

बाळासाहेब ठाकरे कलाप्रेमी होते. त्यांच्या हातात जादू होती. आपल्या व्यंगचित्रांनी ते प्रतिस्पर्ध्यांना घायाळ करायचे. आपल्या व्यंगचित्रातून अनेकांच्या वर्मी त्यांनी घाव घातले त्या घावाचे व्रण आजही ताजे आहेत. त्यांना कलाप्रेमी माणसांबद्दल नितांत आदर होता. बॅन बेरींची चित्र पाहायला त्यांना खूप आवडायची. बॉलिवूडच्या अनेक अभिनेत्यांशी त्यांचे मित्रत्वाचे संबंध होते. अनेकदा त्यांचं मातोश्रीवर जाणं-येणं असायचं.

पाकिस्तानी सुफी गायक राहत फतेह अली खान यांच्या सुफी गीतांचा कार्यक्रम खास मातोश्रीवर झाला. अली साहेबांची गीतं बाळासाहेबांना जाम आवडली. गीतांचा कार्यक्रम पार पडल्यानंतर खास स्नेहभोजन झालं. बाळासाहेबांनी राहतसाहेबांचा खास सत्कार केला.

हीच गोष्ट जावेद मियाँदादबद्दची… जावेद जेव्हा क्रिकेट खेळण्यासाठी भारतात (मुंबईत) आला होता. तेव्हा त्याने खास मातोश्रीवर जाऊन बाळासाहेब ठाकरे यांची भेट घेतली होती. तेव्हा त्याचंही अगदी यथोचित स्वागत बाळासाहेबांनी केलं होतं. भेटीनंतर ‘शेर को मिला’ अशी खास प्रतिक्रिया जावेदने प्रसारमाध्यमांना दिली. मायकेल जॅक्सननेही मातोश्रीवर येऊन बाळासाहेबांचे आशीर्वाद घेतले होते.

म्हणजे फक्त पाकिस्तानी आहेत किंवा मुस्लिम आहेत म्हणून बाळासाहेबांनी कधी विरोध केला नाही. त्यांच्या कलेचा बाळासाहेबांनी नेहमीच आदर केला. पण हे करताना त्यांनी तत्कालिन परिस्थिती विचारात घेतली. अनेकदा त्यांनी पाकिस्तानी खेळाडूंना किंवा गायकांना भारतात येण्यास विरोधही दर्शवला. त्या विरोधाला कारण ठरायचं पाकिस्तानने भारताशी केलेली आगळिक… बाळासाहेब नेहमी देशहिताचा विचार करायचे. देशहिताला समोर ठेऊन त्यांनी महत्त्वाचे निर्णय घेतल्याचं उल्हास पवार सांगतात.

बाळासाहेबांसारखा राजकारणी महाराष्ट्रातच नाही तर देशातही होणे शक्य नाही. बाळासाहेबांनी शेवटच्या भाषणात उद्धव आणि आदित्यला सांभाळा, असं महाराष्ट्राला सांगितलं. पण उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री म्हणून आज कोरोनाच्या संसर्गामध्ये ज्या प्रकारे महाराष्ट्राला सांभाळलं हे पाहायला जर बाळासाहेब असते तर ते ही भरुन पावले असते. पण हे सगळं बघायला खरंच बाळासाहेब असायला हवे होते…, अशी सरतेशेवटी उल्हास पवार म्हणाले. (Special report On  Shivsena Chief Balasaheb Thackeray Hindutva)

Non Stop LIVE Update
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?.
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?.
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका.
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल.
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?.
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?.
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?.
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ.
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा.
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?.