‘तांडव’ विरोधातील ठिय्या आंदोलन पोलिसांनी उधळलं, आमदार राम कदम ताब्यात

महाविकास आघाडीचे सरकार हे हिंदू विरोधी सरकार असल्याचा आरोप राम कदम यांनी केलाय.

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 14:36 PM, 19 Jan 2021
'तांडव' विरोधातील ठिय्या आंदोलन पोलिसांनी उधळलं, आमदार राम कदम ताब्यात

मुंबई : भाजप आमदार राम कदम यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. तांडव वेबसिरीजच्या निर्मात्यांवर कारवाई करण्यासाठी मुंबई पोलिस तयार आहेत. पण महाराष्ट्र सरकार त्यांना रोखत असल्याचा आरोप राम कदम यांनी केला आहे. त्याचबरोबर पालघर साधू हत्याकांड प्रकरण सीबीआयकडे सोपवण्याची मागणीही राम कदम यांनी केली आहे. त्यासाठी राम कदम यांनी घाटकोपरच्या चिराग नगर पोलिस ठाण्यासमोर ठिय्या आंदोलन सुरु केलं होतं. अखेर पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं आहे.(BJP MLA Ram Kadam in police custody)

महाविकास आघाडीचे सरकार हे हिंदू विरोधी सरकार असल्याचा आरोप राम कदम यांनी केलाय. संतांच्या भूमीतच संतांचा अपमान होत आहे. तांडव वेबसिरीजमध्ये हिंदू देवदेवतांचा अपमान झाल्याचा आरोप भाजपसह काही हिंदू संघटनांनी केला आहे. त्याबाबत तीन दिवस झाले तरी एफआयआर फाटला नाही. पालघर साधू हत्याकांड असो की हिंदूंचा अपमान करणाऱ्या घटना, महाविकास आघाडी सरकारकडून त्याबाबत पोलिसांवर दबाव टाकला जात असल्याचा आरोपही कदम यांनी केला आहे. हिंदूंचा अपमान करणाऱ्या या सगळ्यांना जोड्याने मारायला हवं, अशी उद्विग्न प्रतिक्रियाही राम कदम यांनी दिली आहे.

राम कदमांचं ठिय्या आंदोलन

घाटकोपरच्या चिराग नगर पोलिस ठाण्यासमोर ठिय्या आंदोलन केल्यानंतर राम कदम यांनी तिथे सरकार विरोधात नारेबाजी सुरु केली होती. त्यावेळी पोलिसांकडून राम कदम यांना ताब्यात घेण्यात आलं आहे. तशी माहिती वरिष्ठ पोलिस निरीक्षक जितेंद्र आगरकर यांनी टीव्ही 9 मराठीला दिली आहे. दरम्यान तांडव वेबसिरीज प्रकरणी भाजपसह अनेक हिंदू संघटनांनी आक्षेप नोंदवला होता. या वेबसिरीजमध्ये हिंदूंचा देवदेवतांचा अपमान केल्याचा आरोप करण्यात येत आहे.

‘तांडव’विरोधात FIR

अली अब्बास जफर दिग्दर्शित तांडव वेब सिरीज विरोधात अनेक तक्रारी दाखल होत आहेत. सोमवारी अली अब्बास जफरने एक निवेदन काढून हिंदू संघटनांची माफी मागितली आहे. तरीही तांडवच्या अडचणी कमी होताना दिसत नाहीत. कारण, आता गौतम बुद्ध नगरातील रबुपुरा पोलिस स्टेशनमध्ये निर्माते आणि कलाकारांविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. या वेब सीरीजमध्ये धार्मिक भावना दुखावल्या असून उत्तर प्रदेश पोलिसांची चुकीची प्रतिमा दाखवण्यात आल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.

निर्मात्याच्या माफीनामा

ही वेब सीरीज पूर्णपणे फिक्शन आहे. या सीरीजमधील घटनेचा कोणत्याही जिवीत व्यक्ती वा एखाद्या घटनेशी संबंध नाही. असलास तर तो योगायोग समजावा. कोणत्याही व्यक्ती, जाती, समुदाय आणि धार्मिक भावनांना ठेच पोहोचवण्याचा आमचा हेतू नाही. आम्ही सर्व तक्रारी समजून घेतल्या असून कुणाच्या भावना दुखावल्या असल्यास आम्ही सर्वांची विना अट माफी मागत आहोत, असं जफर यांनी म्हटलं आहे.

संबंधित बातम्या : 

Tandav | वादाचं ‘तांडव’ थांबणार?; वेब सीरिजच्या निर्मात्याची अखेर माफी

‘तांडव’ला भाजपचा विरोध, हिंदू धर्मियांच्या भावना दुखावल्याचा आरोप

BJP MLA Ram Kadam in police custody