पंतप्रधान मोदींच्या हेलिकॉप्टरची तपासणी करणाऱ्याची निलंबनानंतर आता बदली

  • टीव्ही 9 मराठी, डिजीटल टीम
  • Published On - 9:00 AM, 22 Apr 2019
पंतप्रधान मोदींच्या हेलिकॉप्टरची तपासणी करणाऱ्याची निलंबनानंतर आता बदली

बंगळुरु : ओडिशामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हेलिकॉप्टरची तपासणी करणाऱ्या आयएएस अधिकारी मोहम्मद मोहसिन यांच्या निलंबन प्रकरणाला नवे वळण मिळाले आहे. निवडणूक आयोगाने निलंबनानंतर आता हेलिकॉप्टर तपासणी करणारे IAS अधिकारी मोहम्मद मोहसिन यांची संबलपूरमधून कर्नाटकमध्ये बदली केली आहे.

आयोगाने आयएएस अधिकारी मोहसिन यांना संबलपूर सोडून कर्नाटकमध्ये बंगळुरु येथे मुख्य निवडणूक अधिकारी म्हणून हजर होण्यास सांगितले आहे. आयोगाच्या आदेशानंतर मोहम्मद मोहसिन रविवारी ओडिशातून बंगळुरुला रवाना झाले.

काय आहे प्रकरण?

16 एप्रिलला पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या (PM Narendra Modi) हेलिकॅाप्टरची तपासणी केल्याप्रकरणी निवडणूक आयोगाने IAS अधिकारी मोहम्मद मोहसिन यांना निलंबित केले होते. निवडणूक आयोगाने (EC) ‘एसपीजी सुरक्षे’च्या निवडणूक आयोगाच्या निर्देशांच्या विरुद्ध काम केल्याचे कारण सांगत त्यांना निलंबित केले होते.

माजी मुख्य निवडणूक आयुक्तांची नाराजी

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हेलिकॉप्टरची तपासणी करणाऱ्या अधिकाऱ्याच्या निलंबनावर माजी मुख्य निवडणूक आयुक्त डॉ. एस. वाय. कुरेशी यांनी नाराजी व्यक्त केली आहे. हेलिकॉप्टरची तपासणी केल्यावर मुस्लीम आयएएस अधिकारी मोहम्मद मोहसिन यांच्या निलंबन केले. मात्र, त्यानंतर आपली प्रतिमा सुधारण्याची मोठी संधी पंतप्रधान मोदी आणि निवडणूक आयोगाने गमावली, असेही कुरेशी यांनी नमूद केले.

कुरेशी म्हणाले,

“आयएएस अधिकाऱ्याचे निलंबनाने निवडणूक आयोग आणि पंतप्रधान मोदींनी कायद्यासमोर सर्व सारखे असल्याचे सिद्ध करण्याची मोठी संधी गमावली आहे. या दोन्ही संस्थांवर नागरिकांचे लक्ष्य आहे. पंतप्रधान मोदी वांरवार आचार संहितेचे उल्लंघन करत आहेत आणि निवडणूक आयोग त्याकडे वारंवार दुर्लक्ष करत आहे.”

यावेळी कुरेशी यांनी ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांचे कौतुक केले. पटनायक यांनी तपासणी अधिकाऱ्यांना कोणताही विरोध न करता आपल्या हेलिकॉप्टरची तपासणी करु दिली होती. कुरेशी म्हणाले, “हेच वर्तन आपल्या राजकीय नेत्यांनी करायला हवे. पटनायक यांना सलाम.”