शिवसेना शिंदे गटाकडून पुन्हा एकदा ऑपरेशन टायगर? मुहूर्त कधी? उदय सामंताच्या विधानाने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण
दिल्लीमध्ये महाराष्ट्राच्या दालनाच्या उद्घाटनासाठी आलेल्या उदय सामंत यांनी 'ऑपरेशन टायगर'बाबत मोठं विधान केलं आहे. याशिवाय सुनील तटकरे, राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणाचा मुद्दा आणि गणेश नाईक यांच्यावरही त्यांनी भाष्य केलं.

दिल्लीमध्ये महाराष्ट्राच्या दालनाच्या उद्घाटनासाठी गेलेल्या शिवसेनेचे मंत्री उदय सामंत यांनी ‘ऑपरेशन टायगर’बाबत मोठं विधान केलं आहे. त्यामुळे राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा ‘ऑपरेशन टायगर’ची चर्चा रंगण्याची शक्यता आहे. हे ऑपरेशन नक्की होणार असल्याचा दावा सामंत यांनी केला. विशेष म्हणजे, चार वर्षांपूर्वी झालेल्या मोठ्या ऑपरेशनचा दाखला देत त्यांनी यावेळी तारीख आणि वेळ सांगण्यास स्पष्ट नकार दिला. त्यामुळे या विधानाचे राजकीय अर्थ काढले जात आहेत.
‘ऑपरेशन टायगर नक्की आहे, तारीख आणि वेळ सांगणार नाही,’ असं सूचक विधान उदय सामंत यांनी केलं. चार वर्षांपूर्वी फार मोठं ऑपरेशन झालं होतं, त्यावेळीही तारीख आणि वेळ कोणालाच माहिती नव्हती, असं त्यांनी सांगितलं. त्यामुळे आता या ऑपरेशनमध्ये नेमकं काय घडणार आणि कोणत्या राजकीय नेत्यांना त्याचा फटका बसणार, याबाबतच्या चर्चांना पुन्हा सुरुवात होण्याची शक्यता आहे.
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांच्या विलीनीकरणाच्या मुद्द्यावरही सामंत यांनी भाष्य केलं. सुनील तटकरे यांनी चार महिन्यांपूर्वी विलीनीकरण होणार नसल्याची भूमिका घेतली होती. त्यामुळे जनतेच्या मनात संभ्रम आहे आणि तोच संभ्रम आपल्या मनातही असल्याचं त्यांनी म्हटलं. शरद पवार, सुनेत्रा पवार आणि इतर संबंधित नेत्यांनी याबाबत आपली भूमिका स्पष्ट करावी, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
यावेळी त्यांनी शरद पवार यांच्यामुळेच आपण राजकारणात आलो, असं सांगितलं. मात्र, महाराष्ट्रात खरी ओळख एकनाथ शिंदे यांनी करून दिल्याचंही सामंत म्हणाले. सुनील तटकरे यांच्या वक्तव्यावर अधिक भाष्य करणं त्यांनी टाळलं. कोणाचीही मनं दुखावण्याची इच्छा नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं.
भाजप नेते आणि मंत्री गणेश नाईक यांच्याबाबत बोलताना सामंत यांनी प्रकल्पांच्या मुद्द्यावर थेट मुख्यमंत्र्यांशी चर्चा करण्याचा सल्ला दिला. नाईक यांच्याकडे वन विभागाची जबाबदारी आहे. त्यांनी उद्योग विभागाच्या विषयांवर भाष्य करण्यापेक्षा संबंधित प्रकल्पांबाबत मुख्यमंत्र्यांशी बोलावं, असं सामंत यांनी म्हटलं.
मात्र, या सगळ्या विधानांमध्ये सर्वाधिक लक्ष वेधलं ते ‘ऑपरेशन टायगर’बाबतच्या त्यांच्या दाव्याने. ऑपरेशन होणार असल्याचं ठामपणे सांगतानाच त्याची तारीख आणि वेळ गुलदस्त्यात ठेवल्याने महाराष्ट्राच्या राजकारणात आता कोणती नवी घडामोड घडणार, याकडे लक्ष लागलं आहे.
