शेतकऱ्यांचं 2 लाखांपर्यंतचं संपूर्ण कर्जमाफ, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची मोठी घोषणा

शेतकऱ्यांचं 2 लाखांपर्यंतचं संपूर्ण कर्जमाफ, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची मोठी घोषणा

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्र विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला (CM Announcements of Uddhav Thackeray).

प्रविण शिंदे, टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

|

Dec 21, 2019 | 5:34 PM

नागपूर : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्र विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या अखेरच्या दिवशी मोठी घोषणा केली. यानुसार राज्यातील प्रत्येक शेतकऱ्याची 2 लाख रुपयांपर्यंतची कर्जमाफी होणार आहे. या कर्जमाफीसाठी कोणत्याही अटी नसल्याची माहिती अर्थमंत्री जयंत पाटील यांनी दिली. मात्र, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सातबारा कोरा न केल्याचा निषेध करत सभात्याग केला.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलेल्या घोषणेनुसार 30 सप्टेंबर 2019 पर्यंतची कर्जमाफी होणार आहे. मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले, “ज्या गोरगरिब शेतकऱ्याचं 30 सप्टेंबर 2019 पर्यंत कर्ज थकीत आहे. त्या शेतकऱ्यांचं 2 लाखांपर्यंतचं संपूर्ण कर्ज माफ केलं जाईल. मी आज महात्मा ज्योतिबा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेची घोषणा करतो. ही योजना मार्चपासून लागू होईल. मधले दोन महिने सरकारला तयारीसाठी पाहिजे आहेत. ही संपूर्ण योजना पारदर्शक असेल. या योजनेतील पैसा थेट शेतकऱ्यांच्या कर्जखात्यात जाईल. याला कोणत्याही अटी शर्तींचा अडथळा येणार नाही.”

जास्तीत जास्त शेतकऱ्यांना कर्जमुक्त करण्याचा आमचा प्रयत्न आहे. या हंगामाचे जे कर्ज जूनमध्ये थकीत होईल ते कर्ज देखील पुनर्गठित करण्याच्या सुचना प्रशासनाला देण्यात आल्या आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांच्या आर्थिक व्यवहारांना कोठेही अडचण येणार नाही, याचंही वचन मी महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना देतो, असंही ठाकरे यांनी नमूद केलं.

नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांसाठी काय?

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांसाठी देखील सरकार एक योजना आणणार असल्याचं सांगितलं. या योजनेवर काम सुरु असून लवकरच या योजनेची घोषणा करु, अशी हमी उद्धव ठाकरेंनी दिली. ते म्हणाले, “राज्याची स्थिती चांगली असेल, नसेल हे कालांतराने लोकांसमोर येईलच. राज्याची परिस्थिती कशीही असली तरी ती परिस्थिती सुधारण्याची हिंमत आणि ताकद या सरकारमध्ये आहे. सर्व गोष्टींचं सोंग आणता येतं मात्र, पैशांचं सोंग आणता येत नाही. त्यामुळे सर्वजण सहकार्य करतील, अशी अपेक्षा आहे. एक नवं आणि धाडसं पाऊल हे सरकार टाकत आहे.”

सातबारा कोरा करण्याचा शब्द पूर्ण होत नाही : राजू शेट्टी

राजू शेट्टी यांनी या कर्जमाफी दुष्काळाने कर्जबाजारी झालेल्या शेतकऱ्यांना थोडाफार फायदा होईल असं म्हणत सातबारा कोरा करण्याचा शब्द पूर्ण होत नसल्याचं मत व्यक्त केलं. ते म्हणाले, “या कर्जमाफीमुळे सात बारा कोरा करण्याचा शब्द पूर्ण होत नाही. मागील वर्षीच्या दुष्काळामुळे थकीत असणाऱ्या शेतकऱ्यांना थोडाफार लाभ मिळेल. पण महापूर , अतिवृष्टी यामुळे जे प्रचंड नुकसान झाले आहे. त्या पिकांना नुकसान भरपाईही नाही आणि कर्जाची मुदत जून 2020 पर्यंत असल्यामुळे ते थकीत नाहीत म्हणून त्यांच्या पदरात काहीच पडणार नाही.”

महाविकासआघाडी सरकारची कर्जमाफी म्हणजे शेतकऱ्यांची फसवणूक : फडणवीस

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस म्हणाले, “सरसकट कर्जमाफीवरुन मुख्यमंत्र्यांनी पलटी मारली आहे. ऑक्टोबर महिन्यात अतिवृष्टीने शेतकरी उद्ध्वस्त झाला आहे. त्यांनी कर्ज घेतलं असेल, तर त्यांना या कर्जमाफीचा लाभ मिळणार नाही. उद्धव ठाकरे यांच्या सरकारने शेतकऱ्यांच्या विश्वासघात केला. शेतकऱ्यांना आता तातडीची मदत अपेक्षित होती. अवकाळी पावसाने मोठं नुकसान झालं आहे. उद्धव ठाकरेंनी हेक्टरी 25 हजारची मागणी केली होती, पण अद्याप एक पैसाही शेतकऱ्याला दिलेला नाही. ”

पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला (CM Announcements of Uddhav Thackeray). पंतप्रधान मोदी मंगोलियाला 4 हजार कोटी रुपये देऊ शकतात, मग महाराष्ट्रातील शेतकऱ्याला मदत द्यायला काय अडचण आहे, असा सवाल ठाकरेंनी केला. यावेळी त्यांनी केंद्राने मदत न केल्यास राज्य सरकार स्वतः जबाबादारी घेऊन मदत करेल, असंही सांगितलं.

उद्धव ठाकरे म्हणाले, “मुंबई महापालिकेच्या ठेवी या मुंबईकरांच्या हक्काच्या आहेत. केंद्र सरकारने त्यांची जबाबदारी पार पाडावी. पंतप्रधान मंगोलियाला 4 हजार कोटी देऊ शकतात, तर महाराष्ट्रातील शेतकऱ्याला मदत द्यायला काय अडचण आहे?”

प्रत्येक विभागात मुख्यमंत्री कार्यालय

मुख्यमंत्री ठाकरे यांनी यावेळी प्रत्येक विभागात मुख्यमंत्री कार्यालय सुरु करण्याची घोषणा केली. ते म्हणाले, “मंत्रालय मुंबईत आहे त्यामुळे प्रत्येक सर्वसामान्याला मुंबईचा हेलपाटा मारावा लागतो. हा हेलपाटे मारावे लागू नये म्हणून आमचं सरकार प्रत्येक विभागात मुख्यमंत्री कार्यालय सुरु करेल. जिल्ह्याची कामं त्या त्या विभागात होतील, हेलपाटे वाचतील.”

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें